PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पुन्हा कट्यार पुन्हा खाँसाहेब पुन्हा कट्यार पुन्हा खाँसाहेब ================================================================================ वैभव वझे on 27 February, 2010 08:30:00 AM ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक २४ डिसेंबर १९६७ रोजी सर्वप्रथम रंगमंचावर आलं. डॉ. वसंतराव देशपांडे आणि त्यांच्यानंतर चंद्रकांत लिमये यांनी ‘खाँसाहेब’ साकारले होते. ‘सदाशिव’ची भूमिका प्रसाद सावकार आणि त्यानंतर प्रकाश घांग्रेकर यांनी केली होती. पहिल्या प्रयोगानंतर ४३ वर्षांनी पुण्यात ‘कट्यार’ पुन्हा अवतरलं, तेही संपूर्ण तरुण तुर्काच्या संचात. या नाटकाच्या पुनर्जन्माचा योगही अजबच. जुलै २००९मध्ये फिलाडेल्फिया इथं भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात सुबोध भावे आणि राहुल देशपांडे यांची भेट, हे या नाटकाच्या पुनर्जन्माचं निमित्त ठरलं. राहुलच्या विनंतीवरून सुबोधनं या नाटकात काम करायचं मान्य केलं. त्यानं हे संगीत नाटक यापूर्वी पाहिलं नव्हतं, कामाचा अनुभवही नव्हता. स्क्रिप्ट वाचल्यावर सुबोधला या नाटकाचा आवाका लक्षात आला. सुखद धक्का बसावा, अशी दिग्दर्शनाची जबाबदारीही सुबोधवर पडली आणि वर कविराज ही भूमिकाही. ‘खाँसाहेब’ अर्थातच राहुल देशपांडे साकारणार होता. राहुल-सुबोध या द्वयीला ‘सदाशिव’ सापडला महेश काळेच्या रूपाने. महेश हा पंडित जितेंद्र अभिषेकींचा शिष्य. गुरुजींनी संगीत दिलेल्या नाटकात काम करणार का, अशी विचारणा होताच त्यानं चटकन ‘हो’ म्हटलं. राहुलच्या पत्नीने, नेहाने त्याची बहीण दीप्ती माटे हिला ‘झरीना’ या व्यक्तिरेखेसाठी तयार केलं. रवी बापट झाले ‘दीवाण’, अमेय वाघ हा तरुण नट बनला ‘उस्मान’, तर सौरभ कारगावकर झाला ‘चाँद’. आशाताई खाडीलकरांची मुलगी वेदश्री ओक हिने ‘उमा’ साकारली. या सगळ्या तरुण कलावंतांनी नाटकाची निर्मिती करताना आपापसातच काही पथ्यं पाळली. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पथ्यं म्हणजे राहुलनं त्याच्या आजोबांनी म्हटलेली या नाटकातली पदं न ऐकणं. हा आग्रह सुबोधनं धरला आणि त्याला राहुलनं होकारही दिला. कारण त्यामुळे आजोबांच्या सुरावटीचा प्रभाव नकळत राहुलवर पडला असता. मात्र वसंतरावांचा नातूच ‘खाँसाहेब’ साकारणार आहे, हा भावनिक धागा या नाटकाच्या यशस्वितेसाठी फार महत्त्वाचा ठरला आहे. राहुलच्या मनात अनेक दिवस संगीत नाटक करायचं होतं. मग ‘कटय़ार’च का करू नये? असं त्याच्या मनानं घेतलं. पण इथं त्याच्या डोक्यात आणखी एक भन्नाट कल्पना आली, आग्रहच होता म्हणा ना- तो असा की, त्याला या नाटकाचं दिग्दर्शन बुजुर्गाकडून करून घ्यायचं नव्हतं. राहुलला अशी टीम हवी होती की, जिनं ‘कटय़ार’ कधीच पाहिलेलं नाही! राहुलनंही आजोबांचं, वसंतरावांचं काम प्रत्यक्ष पाहिलेलंच नव्हतं. मग त्यातून आधी वर्णन केलेली सगळी माणसं त्यानं जमवली. नाटकात खाँसाहेब आणि सदाशिव या दोन व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत. सदाशिवचं आव्हान महेश काळेनं लीलया पेललंय. इथं पुन्हा या टीमनं एक नवा विचार केला. सुबोधनं हे नाटक वाचलं तेव्हा त्याला जाणवलं की, या नाटकाचा हिरो खाँसाहेब नाहीत तर, सदाशिव आहे! दोन संगीत घराण्यांचा संघर्ष, एका घराण्याची संगीतविद्या दुस-या घराण्याला न देणं, विद्या चोरून ठेवणं या सगळ्या अपप्रवृत्तींवर हे नाटक भाष्य करतं. असं असेल तर मग खाँसाहेबांइतकंच सदाशिवलाही महत्त्व द्यावं लागेल, या मुख्य विचारानं नायकाची पुनर्बांधणी सुरू झाली. महेशने सदाशिवच्या भूमिकेतून अभिषेकी बुवांच्या संगीताचा प्रभावी आविष्कार पेश केला आहे.4 फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात यशवंतराव चव्हाण सभागृहात वसंतोत्सवाच्या निमित्ताने झाला. अर्थात वेळेचं गणित जुळवण्यासाठी मूळ ‘कटय़ार’ दोन अंकांत रूपांतरित करावं लागलंय. म्हणूनच पंडित- सदाशिव हा गुरूशिष्य संबंध दाखवणारे प्रवेश आणि ‘दिन गेले भजनाविण सारे’ हे पद गाळावं लागलं आहे. ‘कलासाधका तूच विधाता, प्रतिभेचे सुखधाम, हे नंदलाल’ असं म्हणत या सर्वानी ‘कटय़ार’ साकारलंय. खाँसाहेबांचं काम पाहताना सदाशिवलाही महत्त्व दिल्याचं सुजाण प्रेक्षकाच्या लक्षात आलंय. इथंच या नाटकाचं यश आहे, असं म्हणावंसं वाटतं. ‘या भवनातील गीत पुराणे’ असं म्हणताना ‘हवा नवा तो नूर’ या ध्यासानं ‘कटय़ार’कडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या नाटकानं दिलाय. त्यामुळेच हे नाटक पाहताना आपल्या मनातल्या डॉ. वसंतराव देशपांडेंनी साकारलेल्या खाँसाहेबांना धक्का लागत नाही. तरीही राहुलनं साकारलेले खाँसाहेब मनात ठसतात. ‘तूच स्वरेश्वर, तू लयभास्कर’ असं म्हणत प्रसाद सावकार यांनी साकारलेला सदाशिव कुठंच पुसला जात नाही. अन् तरीही महेश काळेचा सदाशिव सुस्थापित होतो. तसंच फैयाज यांची ‘लागी करजवाँ कटार’ म्हणणारी झरीना अमर राहतानाही दीप्ती माटेची झरीनाही लक्षात राहाते. राहुलचे वडील आणि वसंतरावांचे पुत्र विजय देशपांडे यांना, या मुलांवर देवानंच अभिजात संगीत आणि संगीत नाटक पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी टाकली आहे, असं वाटतं ते यामुळेच. ‘लेपल माईक’ वरची नाट्यपदं मराठी रंगभूमीवर ‘काँपॅक्ट’ संगीत नाटकांची लाट आणण्याची सुरुवात करण्याबरोबरच या नाटकात मराठी रंगभूमीवर प्रथमच ‘लेपल माईक’चा वापर करण्यात आला आहे. यामुळे कलावंतांचा दमसास टिकून राहण्यास आणि संपूर्ण नाटक उत्साहात करण्यास मदत मिळत आहे. कलावंतांना नाटय़पदं म्हणताना अकारण ओरडावं लागू नये, यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे गायनाबरोबरच अभिनयही सहजसुंदर होण्यास मदत मिळाली आहे.