PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राइट ही राइट सनी राइट ही राइट सनी ================================================================================ राजेश शिरभाते on 06 March, 2010 07:30:00 AM ‘ये ढाई किलो का हात जब किसीपे पड जाता है तो आदमी उठता नही उठ जाता है’. सनी देओलबरोबर हस्तांदोलन करताना का कोण जाणे हा डायलॉग पुन:पुन्हा कानात वाजत होता. मनातल्या मनात प्रश्नांची उजळणी करून झाली. यात काही तिरकस नाही ना, असं स्वत:लाच विचारून झालं. मुलाखत कोणताही नवा खेळ वा खेळखंडोबा न होता खेळीमेळीत संपावी ही वाहे गुरु चरणी प्रार्थना करून झाली. या ढाई किलो हातात खरोखरच मार्दव जाणवलं, (हे वाक्य खरं असून ते भीतीपोटी आलेलं नाही). दिलखुलास बोलताना कधी कधी अघळपघळपणा करण्याचा पंजाबी स्वभावही त्यातून जाणवला. सनी देओल. धर्मेद्र पुत्र म्हणून ‘बेताब’ झालेल्या सनीने पुढे आपलं स्वत:चं स्थान निर्माण केलं. त्याच्या शब्दाशब्दातून ही सेल्फमेड मेंटलिटी जाणवत राहिली. या सनी देओलबरोबर ‘थोडा झुठ थोडा सच’ या चित्रपटाच्या निमित्ताने मारलेल्या या गप्पा... जुहू चौपाटीच्या अगदी काठावर उभा असलेला सनी स्टुडिओ. स्टुडिओ तर आहेच त्याचबरोबर सनीची ती हक्काची विश्रांतीची व कामाची जागा आहे. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत सोफ्यावर अस्ताव्यस्त बसलेला. समोर लॅपटॉप त्यावर काही काम चाललेलं. अरे भाई चाय लाईये. पुन्हा तो पंजाबी अघळपघळपणा. हा बोलिये. जसं की आता पंजाबातल्या शेतीवर चर्चा करायची आहे असा भाव किंवा फार फार तर लस्सी बरी की ताक यावर *तू होतास कुठे? (उत्तरादाखल येतं एक अघळपघळ हास्य). काय आहे की मला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करायच्या नव्हत्या. मात्र माझ्याकडे नव्या कथाही येत नव्हत्या. मधल्या काळात चित्रपटसृष्टीतही अनेक बदल झाले. मोठय़ा प्रमाणावर कॉपरेरेट पैसा आला. त्यामुळे काही रसिकांना आवडतील असेच चित्रपट आले. मी ज्या प्रकारच्या भूमिका केल्या होत्या त्या पुन्हा करण्यापेक्षा शांत राहिलेले बरं, असं वाटलं. त्यातच काही महिने मी पाठीच्या दुखण्याने त्रस्त होतो. त्यामुळे काम न करता आराम केला असं म्हणायला हरकत नाही अर्थात आता पुन्हा कामाला लागलो आहे. ‘राइट या राँग’ या चित्रपटाच्या पाठोपाठ दुस-याही दोन चित्रपटांमध्ये काम करत आहे. मात्र तुर्तास याच चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. *या चित्रपटाची थीम काय? सगळीच थीम सांगता येणार नाही मला मात्र हा एक सस्पेन्स थ्रीलर अशा प्रकारचा चित्रपट आहे. नात्याची जडणघडण कशा प्रकारची असते. या नात्यांचं संवर्धन कसं करायचं हे तर आहेच त्याचबरोबर दोन मित्रांमधला संघर्षही या चित्रपटात मांडण्यात आला आहे. यात मी एका पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. मात्र एका प्रसंगात मला अपंगत्व येतं. त्यानंतर जे काही घडतं ते फारचं वेगळ्या पद्धतीने सांगणारी ही कथा आहे. *आजकाल अभिनेत्याला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप काही करावं लागतं. आता ते बदलत्या काळावर अवलंबून असतं. एक काळ असा होता जेव्हा मी माझे इतर सहकारी यांचे आपापले ठराविक असे फॅन्स होते. ते आमच्या चित्रपटांची वाट पाहत असत. चित्रपट घोषित करण्याचं माध्यम केवळ ट्रेलर असे. तो पाहूनच हा चित्रपट पाहण्याचा निर्णय प्रेक्षक घेत आणि चित्रपटाला निश्चित गर्दी करत. अर्थात, त्यावेळी चित्रपट हे सगळय़ात स्वस्त मनोरंजनाचे माध्यम होतं. २५ रुपयात एका माणसाचं पूर्ण मनोरंजन होत असे. अगदी सहज येता-जाताही चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर होती. आता चित्रपट पाहणं ही एक कौटुंबिक योजना असते त्यामुळे साहजिकच त्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. मला हा प्रकार तितकासा आवडत नाही. चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक स्वत:हूनच येतील. मात्र बदलत्या काळानुरूप आपल्याला राहावं लागतच त्यामुळे मीही प्रमोशनमध्ये उतरणार आहेच. एक मात्र निश्चित आहे की जर चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक तो पाहायला येतोच. जर चित्रपट चांगला नसेल तर कुणीही प्रमोशन केलं तरी प्रेक्षक चित्रपट पाहणार नाहीत. *तुझ्या चित्रपटाचं ठळक वैशिष्टय़ कोणतं ?’ ही कथा माणसांच्या विचारांवर आहे. त्यात नाटय़ आहे. भावना आहेत. प्रत्येकाला असं वाटत असतं की तो योग्य ते करत आहे. मात्र आपण जे करतो त्याबाबत समोरचा माणूस काय विचार करतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याला काय वाटेल यांचा विचार न केल्यामुळे संघर्ष निर्माण होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सध्या जिथे-तिथे पैशाला अधिक महत्त्व आलं आहे. त्यामुळे सगळी मूल्यं सोडून माणूस पैशाच्या मागे लागलेला दिसतो, हेच या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. *चित्रपटातल्या इतर कलाकारांबद्दल काय सांगशील ? या चित्रपटात माझ्याबरोबर इरफान खान आहे. आम्ही दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. त्याच्याबरोबर काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आमच्यामधली केमिस्ट्री चांगल्या प्रकारे जुळलेली असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कथानक अधिक प्रभावीपणे लोकांच्या समोर येतं. इतर कलाकारही चांगले आहेत. शक्तिशाली आहेत. आपापल्या परीने मेहनती आहेत. अभिनयाकडे गंभीरपणे पाहणारे आहेत. या कलाकारांमुळे हा चित्रपट एका ठराविक उंचीवर नेणं आम्हाला शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे इतर घटकांच्या आणि एकंदरीत प्रत्येकाच्या पूर्ण सहकार्यामुळे या चित्रपटाचं काम चांगलं झालं आहे. *या व्यतिरिक्त इतर काय सुरू आहे? थोड्याच महिन्यांत म्हणजे जूनच्या आसपास ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट येत आहे. यात मी, पापाजी आणि बॉबीच्या प्रमुख भूमिका आहेत. त्या बरोबरच आणखी एक-दोन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. अर्थात ते ज्यावेळी येतील त्याविषयी नंतर तुम्हाला सांगेनच आता तरी केवळ ‘राइट या राँग’ या चित्रपटाचाच विचार करत आहे. *सनी तुला असं वाटतं नाही का की भारतात जर बाँडपटाची मालिका केल्यास त्यात तुला काम करायला आवडेल. होय ना, कुणाला आवडणार नाही. जगभरात बाँडपटांची जबरदस्त क्रेझ आहे. त्या प्रकारचे अ‍ॅक्शन चित्रपट आपल्याकडेही निर्माण व्हावेत असं वाटतं. अर्थात, सध्या आपल्याकडेही तांत्रिकदृष्टय़ा चांगले चित्रपट तयार होत आहेत. त्यामुळे आता असं वाटतं की बाँडपटासारखे सस्पेंन्स थ्रिलर आपल्याकडे तयार व्हावेत आणि त्यात मी नायकाची भूमिका करावी. त्यातला नायक हा काही एकसुरी नसतो. ती भूमिका बहुआयामी असते. तशी भूमिका कोणालाही करायला आवडेल. *कधी मराठी चित्रपट पाहिले आहेत का? मला कुणी सांगितलं तर मी नक्कीच पाहतो. आता तुमच्याशी बोलताना मला ‘जोगवा’ या चित्रपटाविषयी कळलं. मी नक्कीच तो चित्रपट पाहीन. मागे मी ‘डोंबिवली फास्ट’ पाहिला होता. त्यानंतर माझ्यामध्ये आणि निशिकांत कामत यांच्यात काही चर्चाही झाल्या होत्या मात्र तो विषय तसाच राहिला. तो चित्रपट मला फारच आवडला होता. *ती भूमिकाही तुझ्या इमेजला साजेशी आहे? हो, त्या चित्रपटाने मला फारच प्रभावित केलं होतं. तशा प्रकारच्या चित्रपटात भूमिका करणं कोणालाही आवडेल. *कोणत्याही चित्रपटाच्या यशाचं काय गणित असतं असं तुला वाटतं? चित्रपटाची कथा ही फार महत्त्वाची असते. अर्थात, मी नेहमीच सगळय़ांना हे सांगत आलेलो आहे. आता ते सगळय़ांनाच पटायला लागलेलं आहे. तुम्ही हिंदी चित्रपटांचा इतिहास पाहिलात तर तुमच्या हे लक्षात येईल की ज्या चित्रपटांच्या कथा चांगल्या आहेत तेच चित्रपट आतापर्यंत चाललेले आहेत. इतर कोणत्याही घटकावर चित्रपट चालणं अवलंबून नसतं जितकं ते कथेवर असतं. एक चांगली गोष्ट घडत चालली आहे की निर्माते आणि दिग्दर्शकही चांगल्या कथानकांना महत्त्व देत आहेत. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. सनी देओलच्या त्या स्टुडिओतून बाहेर पडताना सनीचं बोलणं आठवत होतं. त्याची पडद्यावरची इमेज जरी ‘माचो’ असली तरी त्याचं बोलणं, संवाद साधणं, समोरच्याशी गप्पा मारणं हे अगदी दिलखुलास असतं. एकंदरीत त्याचं वागणं राइट ही राइट असतं.