पहिले पान | रिलॅक्स | ..म्हणे आल्फ्रेड हिचकॉक

..म्हणे आल्फ्रेड हिचकॉक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्कर पारितोषिक विजेत्या चित्रपटासंबंधीचं आल्फ्रेड हिचकॉकचं मत त्याच्याच चित्रपटाप्रमाणे भन्नाट आणि धक्का देणारं होतं. ‘इंट्रोडक्शन’ म्हणून लिहिलेल्या मजकुरात हिचकॉक धक्कातंत्राचा वापर करत खालील मतं व्यक्त करतो

यंदाचा ऑस्कर पारितोषिक वितरण सोहळा उद्यावर येऊन ठेपला आहे. योगायोग असा की, जुनी पुस्तके चाळताना अचानक एका पुस्तकात हिचकॉकचे या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्सबद्दलचं- म्हणजे ऑस्कर पारितोषिकांबाबतचं भाष्य वाचायला मिळाले.

 

आल्फ्रेड हिचकॉकने निवड केलेल्या कथांचा एक संग्रह आल्फ्रेड हिचकॉक्स गेम्स किलर्स प्लेया नावाने 1968 साली प्रकाशित झाला होता. या भयकथासंग्रहाची ओळख - इंट्रोडक्शन’- म्हणून हिचकॉकने लिहिलेला हा मजकूर आहे. खास हिचकॉकच्या धाटणीतला. त्यानं म्हटलंय.. साधारण तासाभरापूर्वी मी मोठ्या मजेत एक अगदी सुंदर पुस्तक वाचत होतो. पुस्तक होतं, अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्डस आणि ती स्थापना झाल्यापासून ती मिळवणारे चित्रपट यांना वाहिलेलं. ते सर्वच चित्रपट खरंच अगदी ग्रेट आहेत- पण मी आपलं तुम्हाला म्हणून सांगतो, मला अनेकदा असं वाटतं की, या अ‍ॅवॉर्ड्ससाठी जे मतदान करणारे असतात त्यांची मनं तशी संकुचित, बुरसटलेली असतात आणि त्यांची जाण म्हणाल तर या व्यवसायाच्या ज्ञानाबाबत खूपच मर्यादा असलेली अशी असते. ती त्यांनी केलेल्या निवडीतून वारंवार प्रकट होते. कारण वर्षानुर्वष त्यांनी काही अप्रतिम रहस्यपटांना योग्य न्याय दिलेला नाही.

 खरं सांगायचं तर या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स विजेत्या चित्रपटाबाबत, ती अ‍ॅवॉर्ड्स अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या वतीने 1928 सालापासून दिली जाऊ लागली, तेव्हापासूनच एक दोष सातत्याने आढळून येतो. तो म्हणजे हे बक्षीसपात्र चित्रपट अगदी सपक, मिळमिळीत आणि साधेसरळ असतात. हे मी म्हणतो आहे ते प्रामुख्याने त्या चित्रपटांच्या शेवटाबाबत. अगदी पहिल्या वर्षीच्या विजेत्या विंग्जपासून ते अगदी अलिकडील काही वर्षाच्या विजेत्या चित्रपटांकडे बघा. तुम्हाला असं आढळेल की, त्या चित्रपटांचा शेवट म्हणजे- केवळ (हवा म्हणून केलेला) शेवटच असतो. बस्स, फक्त शेवट, तिथं खरं तर जोरदार आश्चर्य, धक्का किंवा कलाटणी अशी नसतेच! त्या चित्रपटांचे लेखक आणि दिग्दर्शक यांनी थोडा शांतपणे, वास्तववादी विचार केला असता, तर त्यांना खराखुरा चांगला शेवट निश्चितच सुचला असता, असं वाटतं. पण तसं होत नाही. आणि जे चित्रपट खरोखरच चांगले, अगदी प्रभावी, परिणामकारक शेवट असणारे असतात त्यांची निवड पारितोषिकसाठी होतच नाही. जाऊ दे झालं, सोडून द्या ते.

मी काय म्हणतो आहे ते नीट कळावं म्हणून मी तुम्हाला दाखविण्यासाठी मी काही गाजलेल्या, अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्ड विजेत्या अमेरिकन चित्रपटांचा शेवट त्यांचे लेखक आणि दिग्दर्शक यांनी नीट विचार करून वेगळय़ा प्रकारे केला गेला असता तर, त्यांच्या एकूण दर्जात, सामर्थ्यांत आणि परिणामकारकतेत किती मोठी भर पडली असती, अशा शेवटांची उदाहरणं तयार केली आहेत. आता तुम्हीच बघा ना..

गॉन विथ द विंड : या चित्रपटाच्या अखेरीस ऱ्हेट बटलर स्कार्लेट ही काय प्रकारची स्त्री आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे हे कळल्यामुळे तिला सोडून जाऊ लागतो. त्यावेळी ती त्याला विचारते की, तू आता मला एकटीला सोडून गेलास तर माझं कसं होईल? आणि त्यावर चित्रपटात तो तिला म्हणतो, लाडके, खरं सांगायचं तर तुझं काय होईल याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी कशाला त्याची काळजी करू? (फ्रँकली, माय डिअर, आय डोन्ट गिव्ह डॅम.)

आणि तुम्हाला आठवलं की झालं. त्यानंतर एकदम पडदा पडतो. चित्रपट तिथेच संपतो.

 चित्रपटगृह प्रकाशानं उजळतं. प्रेक्षक बाहेर जाऊ लागतात. कंटाळून जांभया देत, कारण सारं कसं साधं असतं. कुठं काही आश्चर्याचा धक्का नाही की काही अनपेक्षित कलाटणी नाही. फक्त ऱ्हेटचे उद्गार, ‘लाडके, खरं सांगायचं तर तुझं काय होईल याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी कशाला त्याची काळजी करू?’

पण आता कल्पना करा की, हाच शेवट पुढीलप्रमाणे असता, तर चित्रपटाअखेर कसा जबरदस्त धक्का प्रेक्षकांना बसला असता.. म्हणजे बघा, -हेट म्हणतो, ‘लाडके, खरं सांगायचं तर तुझं काय होईल याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी कशाला त्याची काळजी करू?’ त्याच्या उद्गारांनंतर काही क्षण गहन शांतता आणि मग स्कार्लेट म्हणते, ‘अरे, दक्षिण भागातल्या महिलांतील एक नाजूक फुलाशी- (त्या महिलांच्या या प्रतिनिधीशी) बोलताना तू अशी भाषा करण्यास धजावतोसच कसा?’ (यू कान्ट यूज दॅट काइन्ड ऑफ लँग्वेज टु अ फ्लॉवर ऑफ सदर्न वुमनहूड!) आणि मग जवळच्याच टेबलावरील बंदूक घेऊन थेट त्याच्या डोक्यात गोळी घालते. तत्क्षणी तो मरतो.

 गिगी : आता गिगीया चित्रपटाचा शेवट आठवा. चित्रपटाच्या शेवटी लुइस जॉर्डनला जाणवतं की, गिगी (जी लेस्ली कॅरॉननं साकारली होती) ही अगदी आकर्षक, गोड आहे आणि ती तिच्या प्रेमात पडला आहे. आता यात आश्चर्य वाटण्याजोगं काय आहे? कारण हा चित्रपट पाहणा-या सगळय़ांना तुमच्याप्रमाणेच सुरुवातीपासून हे अगदी असंच होणार हे ठाऊक आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. पण विचार करा की हाच चित्रपट, त्याचा हा शेवट थोडा बदलला असता तर किती वरच्या पातळीवर गेला असता, अधिक चांगला, दर्जेदार बनला असता! म्हणजे शेवट अगदी वेगळय़ा प्रकारे झाला असता, कथेला अनपेक्षित कलाटणी देणारा, प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणारा असा करण्यात आला असता तर.. उदाहरणार्थ, जॉर्डनला माहीत नसलेलं एखादं गुपित उघड करण्यात आलं असतं तर. म्हणजे असं की, गिगी ही प्रत्यक्षात सरकारची गुप्तहेर खात्यात काम करणारी हस्तक आहे आणि अखेरीला कारण तो एक बनवाबनवी करणारा आहे, या कारणाने ती जॉर्डनला अटक करते, असा शेवट कितीतरी प्रभावी आणि वास्तव झाला असता. (कारण चित्रपटभर काहीही काम न करणा-या जार्डनकडे वारेमाप खर्च करण्यासाठी पैसा कुठून येतो, या प्रश्नाचं उत्तरही प्रेक्षकांना त्यामुळे मिळालं असतं.)

वेस्ट साइड स्टोरी : मी जे सांगितलं त्याच्या अगदी जवळपास येणारा शेवट या चित्रपटाचा आहे. म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारा. कारण शेवटी नायक मारला जातो आणि ज्या प्रेक्षकांनी रोमियो अ‍ॅँड ज्युलिएट पाहिला आहे किंवा ते नाटक वाचलं आहे, त्यांनाच फक्त अखेरीला काय होणार याचा अंदाज बांधता येतो, पण असे प्रेक्षक सध्या आहेत तरी किती? पण असं असलं तरीही तुम्ही मान्य कराल की या चित्रपटाचा शेवट पुढीलप्रमाणे केला असता, तर तो अधिक प्रभावी झाला असता. म्हणजे असं की..

नायिका-नायकाच्या अंगावर पडून हुंदके देत आहे. धाय मोकलून शोक करीत आहे आणि अचानक नायक तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळय़ांत मृत्यू स्पष्ट दिसत आहे. तो नायिकेला म्हणतो, नीच स्मिये, तुझ्यामुळे मला हे भोगावं लागतंय, तुझ्यामुळं आणि असं म्हणून तो तिलाही गोळी घालतो.

 मला वाटतं की, आता मला काय म्हणायचं आहे, ते साधारणपणे तुम्हाला उमगलं असेल. म्हणजे आता माझं काम झालंय.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0