PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘दल्-लॅक’ च्या काठावरून ‘दल्-लॅक’ च्या काठावरून ================================================================================ हर्षद रा. रेनगुंटवार on 21 August, 2010 05:30:00 AM पु. ल. देशपांडेंनी ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ या त्यांच्या अनुभवकथनात प्रवासाला जाऊन आल्यावर तिथले फोटो तासन्तास दाखवणा-यांची गंमत मोठय़ा खुबीने सांगितली आहे. त्यातच एक जोडपे काश्मीरच्या ‘दल लेक’ चा उल्लेख ‘दाळ लेक’ कसा करते हेही सांगितले आहे. ‘दल लेक’च्या माझ्या भेटीत या उच्चारांचा मला एक अनुभव आला. जगाच्या कानाकोप-यातून पर्यटक श्रीनगरला येतात व प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार ‘दल-लेक’ हा शब्द उच्चारतो; पण तिथे भेटणारा प्रत्येक काश्मिरी माणूस आपल्याला अभिमानाने त्यांच्या ‘दल्-लॅक’ विषयी नवनवीन माहिती देत राहतो. ‘दल्-लॅक’ हा त्यांच्या तोंडून कानाला अतिशय गोड वाटणारा उच्चार ऐकून मी तो प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच त्या ‘दल्-लॅक’च्या प्रेमात पडलो होतो. काश्मिरमधील प्रत्येक गोष्टीला स्वत:ची अशी ओळख आहे. याचा प्रत्यय मला काश्मीरच्या भूमीवर पाय ठेवल्यापासूनच आला होता. तिथला निसर्ग, हवा, प्रकाश, पाणी या प्रत्येक गोष्टीवर काश्मीरचा असा एक वेगळात छाप आहे. ‘दल्-लॅक’ ही पण अशीच एक काश्मिरी ओळख असलेली निसर्गाची किमया आणि ही ओळख ‘दल्-लॅक’च्या चहुबाजूंनी असलेल्या काठावरून आणि शिकाऱ्यातून ‘दल्-लॅक’च्या आतमधून फिरल्याशिवाय पटत नाही. साडेपंधरा किलोमीटरचा परीघ असलेल्या या ‘दल्-लॅक’च्या काठावरून मी संपूर्ण दुपार आणि संध्याकाळ फिरत होतो. विविधरंगी शिका-यांची चाललेली लगबग, काठावर शांतपणे बसून मासेमारी करणारे तरुण आणि ‘दल्-लॅक’चे सौंदर्य अनुभवत फिरणारे पर्यटक हे सगळेच नवनवीन फ्रेम्सचं दान माझ्या पदरात टाकत होते. काश्मीरच्या सफरचंदांसारखी तिथली माणसं, असं आपण नेहमीच ऐकलेलं असतं. तिथे जातानाच मी तिथल्या माणसांचं हे सफरचंदासारखं दिसणं कॅमे-यात पकडायचं ठरवलं होतं. ‘दल्-लॅक’च्या काठावर बसून निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी मासेमारी करणारा एक तरुण मला दिसला. त्याचा चेहरा काश्मीरची ओळख सांगत होताच पण त्याचं ते सफरचंदासारखं दिसणं टिपताना मला हे कळलं की तो तिथल्या हवामानाचा परिणाम आहे. दुपारी साडेतीनच्या उन्हातही तिथला प्रकाश फोटोसाठी प्रखर ठरत नव्हता. उलट त्या प्रकाशाने ‘आऊट डोअर’ मध्येही त्याच्या चेह-याचे ‘डिटेल्स’ पकडणं शक्य झालं. समोर नितळ पाणी, त्या पाण्यात शिकारा, मागे उमा पर्वत आणि पांढ-या शुभ्र ढगांनी भरलेलं आकाश या साऱ्यांना पार्श्वभूमीला घेऊन त्याचं मनासारखं ‘पोट्र्रेट’ काढेस्तोवर त्याच्या गळाचा एक मासा लागला आणि ‘दल्-लॅक’च्या आणखी एका सुंदर पैलूचं दर्शन मला झालं. सोनेरी झाक असलेला तो मासा ‘दल्-लॅक’च्या ‘आयडेंटिटी’ सहित कॅमे-यात पकडून पुढे निघालो. ‘दल्-लॅक’च्या काठावर पुढे तीन जुन्या बोटींनी असाच एक छान शॉट मिळवून दिला. वापरात नसलेल्या त्या बोटी अशाच बांधून ठेवल्या होत्या. कधीकाळी त्यासुद्धा वापरात असतील या विचाराने मग एक वेगळा अ‍ॅँगल वापरून त्या फ्रेमला ‘नॉस्टॅल्जिक टच’ देण्याचा प्रयत्न केला. या बोटींच्या बाजूलाच पाच मित्रांनी एक टोळी गप्पा मारत बसली होती. त्या सर्वानी पारंपारिक ‘फेरन’ परिधान केलेले होते. ‘फेरन’ हा त्यांचा पारंपारिक वेश. पायघोळ असलेला हा झगा थंडीपासून वाचवतो त्याचप्रमाणे डावा हात या ‘फेरन’च्या आतमध्येच ठेवून त्यात ते उबेसाठी कांगडी- निखा-यांचं भांडं पकडतात ही माहिती त्यांनी दिली. काश्मिरला जातानाच एक ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ सीरीज करायचं मनात होतं. त्या माणसांशी गप्पा मारून पुढे निघालो तेव्हा या सीटीजसाठी मला एक शॉट मिळाला. मासेमारी हा ‘दल्-लॅक’मधला एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. तिथल्या एका मासे मारणा-याने आपली कापडं लहान बांबूंच्या आधारे सुकत घातली होती. वापरून जीर्ण झालेल्या त्या कापडांच्या पुढे तलावात एक शिकारा बांधून ठेवला होता. स्तब्ध पाण्यामुळे त्याचं पाण्यातलं प्रतििबबही टिपता आलं. मागे दूरवर दिसणारा तलावाचा दुसरा काठ आणि आकाशात पांढ-या ढंगासोबतच तळपणारा सूर्य या सगळय़ांना एकाच फ्रेममध्ये घेऊन मी एक सुंदर ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ कंपोझिशन कॅमे-यात अलगद साठवून घेतलं. हे आणि असं बरंच काही साठवून परत जायला निघालो होतो. सूर्यास्त झाल्यामुळे अंधार होऊ लागला होता. किना-यावरच्या हाऊस बोटींमध्ये ‘दिवेलागण’ झाली होती. त्या दिव्यांची पाण्यात सांडणारी प्रतिबिंबं बघत चाललो होतो आणि तेव्हाच एक शिकारावाला मोठय़ाने एक काश्मिरी धून आळवत उभा राहून शिकारा वल्हवत होता. सूर्यास्तानंतरच्या आकाशाच्या त्या वेगळय़ाच रंगात आणि हाऊसबोटीच्या त्या दिव्यांच्या पार्श्वभूमीवर त्या शिका-याची व त्या गाणा-याची एक काळी- फक्त आउटलाइन असलेली प्रतिमा कॅमे-यात पकडली व समाधानाने परतलो. काश्मीरचं वेगळेपण आहे ते तिथल्या हवामानात तिथल्या निसर्गात, तिथल्या प्रकाशात. ‘दल्-लॅक’ म्हणजे या सगळ्या वेगळेपणाची एक अनुभूती आहे. हे सर्व वेगळेपण ‘दल्-लॅक’ आपल्याला दाखवतो, त्या वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव करून देतो. ‘दल्-लॅक’ला म्हणूनच कदाचित ‘ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर’ म्हणलं जातं. ‘दल्-लॅक’वर अजून मी आतून पाहिलाच नव्हता. तरी पण पहिल्याच भेटीत तो केवळ एक उच्चार नूसन काश्मिरी हुंकारच असल्याची खात्री पटली होती.