उपरोधाची ऊर्मी...
कलाक्षेत्रातही वस्तूकरण अटळ असल्याची खूणगाठ वारंवार पटते आहे. या वातावरणाला गृहीत धरून, त्याची अटळता मान्य करून; पण त्या वातावरणाला शरण जाण्याऐवजी त्याला चिमटे काढून प्रांतिक चट्टोपाध्याय त्याच्या चित्रांमध्ये त्याचं म्हणणं मांडतो.
आपली ओळख काहीही असेल, पण आपण ‘गि-हाईक’ असतोच, असं कबूल करायला लावणारा आपला हल्लीचा काळ आहे. वस्तू आणि त्यांचा उपभोग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्यानं वस्तू-वापर जितका (संख्यात्मक वा गुणात्मकदृष्टय़ा) जास्त, तितका माणूस मोठा (- उदाहरणार्थ, ‘आमच्याकडे मारुतीच आहे रे, ते काय लोगानवाले!’) असं आपण मानतो. हे असं मानणं आणि त्यानुसारच जगणं म्हणजे चंगळवाद आहे, याचा आपल्याला जणू विसरच पडलाय. कलाक्षेत्रातही वस्तूकरण अटळ असल्याची खूणगाठ वारंवार पटते आहे. या वातावरणाला गृहीत धरून, त्याची अटळता मान्य करून; पण त्या वातावरणाला शरण जाण्याऐवजी त्याला चिमटे काढून प्रांतिक चट्टोपाध्याय त्याच्या चित्रांमध्ये त्याचं म्हणणं मांडतो.
प्रांतिक शिकला बडोद्यात. चंगळवाद गुजरातच्या सर्व शहरांमध्ये विविधांगी शॉपिंग सेंटरांतून बोकाळत होता आणि टीव्हीवरून चेकाळत होता, अशा गेल्या दहा वर्षाच्या काळात प्रांतिकनं त्याच्या कोलकात्याऐवजी हे बडोदाच जास्त पाहिलं आहे. हे गाव आपल्याला आवडतं ते इथल्या सहपाठी, सहकारी आणि ज्येष्ठ चित्रकारांमुळे; एरवी आपण या गावचेच नाही, याचीही जाणीव प्रांतिकला असल्याचं त्याच्या मित्रांना जाणवतं. प्रांतिकनं चंगळवादाला चिमटे काढण्यासाठी जाहिरातींच्या ‘दृश्यभाषे’ला वाकुल्या दाखवणं सुरू केलं, त्याला आता सहाएक वर्षं होतील. जाहिराती ज्या ‘उपबोधा’ला (हा शब्द सलील वाघ यांनी अलीकडे ‘खेळ’च्या अंकात वापरलाय. उपबोध म्हणजे प्रत्येकाचा आणि सामूहिकही सबकॉन्शस) बहकवतात, त्याचं जवळून निरीक्षण करणारं काम प्रांतिकनं ‘साक्षी गॅलरी’त भरलेल्या ताज्या प्रदर्शनात मांडलं आहे. जाहिरातींसारखं हे काम अर्थातच दिसत नाही.
चित्रचौकटीच्या कडा कापून जुन्या आल्बममधल्या फोटोंसारख्या केलेल्या. लाकडावरल्या या चित्रांच्या एका बाजूला ‘ममी’- औषधबांधलं प्रेत ठेवण्यासाठीची शवपेटिकेसारखी काचबंद पेटी. या पेटीत एकेका प्रॉडक्टचं प्रेत, जणूकाय जतन करून ठेवल्यासारखं कापड गुंडाळलेलं. मोटरसायकल, गोरेपणाचं क्रीम, डासांची चक्राकार ‘उदबत्ती’(?), अशा ‘रोजमर्रा’च्या वस्तू मेल्यावर त्यांच्याबद्दलची मिथकं कदाचित तयार होतील आणि पुढं, या मिथकांचं चित्ररूप मी करतो आहे, असा उपरोधिक पवित्रा घेऊन मगच ही चित्रं झाली आहेत. यातल्या जाहिराती वा वस्तूही थेट ओळखू येणार नाहीत, पण ‘निरमा’तली मुलगी किंवा ‘मॉर्टीन’चा साय-फाय हल्लेखोरासारखा डास अशा काही प्रतिमाच तुम्हाला ओळखता येतील. जीन्सचे पंख ल्यालेला एक घोडा आणि चित्रात दगडासारखे खिळलेले जीन्सचे केवळ पायच पाय, किंवा ‘दिल्ली मेट्रो’चं कार्ड आणि त्याच्या ‘झूऽम झूऽम’ जाहिरातीप्रमाणे झिंगल्यासारखे स्वप्नील रस्ते नि बिल्डिंगा, यांची संगती लावण्याचं आव्हानच प्रेक्षकांपुढे राहतं. ‘सात दिन मे गोरापन’ची टर उडवणा-या चित्राखाली खाच आणि त्यात फिरत्या कॅलेंडर-तारखांसारखी चकती आहे. ती फिरवूनच तिच्यावरली सात चित्रं पाहायची. काळी कपिला गाय सात दिवसांत पांढरीधोप होतेय! मधल्या एका दिवशी ती झेब्रापट्टय़ांची झालीय. हा दृश्यविनोद समजण्याइतका वेळ प्रेक्षकांकडून प्रांतिकचं प्रदर्शन मागतं.
हाच या चित्रांचा दोषही मानता येईल, पण म्हणून प्रांतिकची उपरोधाची ऊर्मी आणि त्याची दृश्यविनोदाची खुमखुमी संपणार नाही. तो अन्य प्रकारे आणि वरकरणी छान दिसणा-या चित्रांमधून ही ऊर्मी आणि खुमखुमी दाखवतच राहील, असंही या प्रदर्शनात दिसलं. मध्यभागी दातांची (कुणीतरी वापरलेली, झिजलेली) उघडी कवळी आणि तिच्या एका बाजूला ‘दातांचे भक्षक’ तर दुस-या बाजूला ‘रक्षक’ यांच्या कल्पक प्रतिमा आहेत. ही कल्पकता ‘पोरवय जपू पाहणारी’ (बॉयलाइक) असल्याचा कुणाचातरी उल्लेख कोरियात भरलेल्या एका मोठय़ा समूहप्रदर्शनाच्या कॅटलॉगमध्ये प्रांतिकबद्दल सापडतो. तो खरा आहे. पण प्रांतिकला कदाचित इथून पुढे, निर्णय घ्यावे लागतील. किती दिवस ‘बॉयलाइक’ कल्पकतेनंचकाम करायचं आणि एवढी उपरोधाची ऊर्मी थेट राजकीय आशयासाठी का नाही वापरायची, हे - किंवा याप्रकारचं काहीतरी- ठरवावं लागेल. विचारी माणसं एरवीही चंगळवादाची, जाहिरातींतल्या उपबोधाची टर उडवू शकत असतात. (ते तसं किती वेळा करतात ही बाब अलाहिदा, पण) त्यामुळे ज्या विचारीपणाची अपेक्षा प्रांतिकच्या प्रतिमा करतात, तसा विचारीपणा धारण करणा-यांना त्या प्रतिमा नवं काही न सांगता निव्वळ रिझवतात!


Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा