पहिले पान | रिलॅक्स | हैदराबादी

हैदराबादी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

‘होय, माझ्या ‘आशायें’ मध्ये तुम्हाला हृषिदांच्या ‘आनंद’ची झलक पाहायला मिळेल. किंबहुना ‘आनंद’ला मी वाहिलेली ही आदरांजली आहे, असं म्हणायलाही हरकत नाही.’ नागेश कुकनूरच्या इतक्या रोखठोक बोलण्याने आपण क्षणभर अवाक होतो. माझा चित्रपट कसा वेगळा आहे आणि इतर कुठल्याही चित्रपटाशी त्याचं कसं साधम्र्य नाही; असेलच तर मी ‘तो’ चित्रपट कसा बघितलेलाच नाही, हे सांगताना इथले दिग्दर्शक, निर्माते थकत नाहीत आणि हा पठ्ठय़ा मात्र ‘आनंद’शी ‘आशायें’चं असलेलं कनेक्शन सांगून मोकळा होतो. अर्थात हा प्रामाणिकपणा निदान नागेशच्या फॅन्सना तरी नवा नाही; त्याच्या चित्रपटांमध्ये हा पारदर्शीपणा नेहमीच असतो, अगदी पहिल्या ‘हैदराबाद ब्ल्यूज’पासून. या अस्सल हैदराबादी दिग्दर्शकाशी साधलेला हा संवाद

भारतात कंटेंपररी दिग्दर्शकांच्या कामगिरीचं मूल्यमापन करायची पद्धत नाही आणि तो दिग्दर्शक व्यावसायिक चित्रपटांचा असेल तर त्याचा फार विचार करायचा नसतोच, अशी बुद्धिवाद्यांची ठाम धारणा आहे. पण गेल्या काही वर्षात आलेल्या तरुण आणि प्रतिभाशाली दिग्दर्शकांच्या कामगिरीचं मूल्यमापन आताच होणं गरजेचं आहे, कारण ही मंडळी हिंदी चित्रपटांना नवी दिशा देण्यासाठी धडपडताहेत आणि या सगळ्याची सुरुवात नागेश कुकनूरने केली का? बहुदा होय! मल्टिप्लेक्सचं नामोनिशाणही नसताना नागेशने 12 वर्षापूर्वी हैदराबाद ब्ल्यूजबनवला. तो आजच्या मल्टिप्लेक्स संस्कृतीशी नातं सांगणा-या यंग, अर्बन सिनेमाशी थेट नातं सांगतो. शहरी तरुणांच्या सेन्सिबिलिटीज, कामानिमित्त, शिक्षणानिमित्त काही वर्ष परदेशात राहून भारतात परतलेल्या एनआरआय तरुणांचं इथल्या सामाजिक परिस्थितीला रिअ‍ॅक्ट होणं यापूर्वी पडद्यावर इतक्या नैसर्गिकपणे, सहजपणे कधीच आलं नव्हतं. चोप्रा-जोहर मंडळींच्या एनआरआयपेक्षा हा एनआरआय वेगळा होता, अधिक वास्तव होता, खरा होता. पण मल्टिप्लेक्सच्या आगमनापूर्वीच अस्सल मल्टिप्लेक्स सिनेमा बनवणारा नागेश आज अशा प्रकारच्या सिनेमापासून काहीसा दूर जातोय, अधिक व्यावसायिक, सर्वसमावेशक होऊ पाहतोय, असं का? ‘तसं मी काहीही जाणीवपूर्वक करत नाहीये,’ नागेश सांगू लागतो, ‘मला जी गोष्ट भावते, तिच्यावर मी सिनेमा लिहितो आणि माझ्याच पद्धतीने करतो. तो लिहिताना माझ्यासमोर शहरी-निमशहरी प्रेक्षक असतो कारण माझ्या सेन्सिबिलिटीज इथल्या प्रेक्षकांशी जुळणाऱ्या आहेत. मल्टिप्लेक्सचा प्रेक्षक हाच आहे. त्यामुळे मी या प्रेक्षकापासून किंवा मल्टिप्लेक्स सिनेमापासून लांब गेलोय, असं नाही म्हणता येणार. पण इक्बालच्या यशामुळे आपण अधिक मोठय़ा, मल्टिप्लेक्स पलिकडच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो, हे मला पहिल्यांदाच जाणवलं. अर्थात प्रत्येक वेळी तसं होतंच असंही नाही.

 

पण विशिष्ट प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवूनच मी सिनेमा लिहितो, असंही नाही. माझ्या सेन्सिबिलिटीज जरी शहरी असल्या तरी गावातल्या कथाही मला तितक्याच अपिल होतात. अ‍ॅटलांटात तीन र्वष थिएटर करताना तिथल्या आमच्या मार्गदर्शकाकडून एक महत्त्वाची गोष्ट मी शिकलो. तो म्हणायचा, ‘सव्‍‌र्ह द प्ले, सव्‍‌र्ह द ऑडियन्स’. म्हणजे प्रेक्षकाला चांगलं नाटक हवंय. त्यासाठी प्रयत्न करा. प्रेक्षकाच्या आवडीनिवडी जपण्यासाठी नाटकात वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आजही सिनेमा लिहिताना, करताना मी ते तत्त्व पाळतो,’ नागेश सांगतो.

 

पण, पूर्वी सिनेमा बनवताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातील प्रेक्षकाच्या आवडीनिवडीचा विचार व्हायचा, सिनेमा एकाचवेळी शहरातल्या उच्चभ्रू वर्गातील आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यालाही आवडायला हवा, यादृष्टीने सिनेमात सर्व घटक कोंबले जात. त्यातूनच भारतीय मसाला चित्रपट जन्माला आला. आज मल्टिप्लेक्स संस्कृतीने या हार्डकोअर मसाला चित्रपटालाच अखेरची घरघर लावल्याचं दिसतं. लगानकिंवा वाँटेडसारखे पॅन इंडियनप्रेक्षकाला अपिल होणारे चित्रपटच हल्ली बनत नाहीत. पण आता पॅन इंडियन ही संकल्पनाच कुठे शिल्लक राहिली आहे?’ नागेश विचारतो. तो म्हणतो, ‘दोन गटांमधली दरी इतकी वाढत चालली आहे की, पॅन इंडियन असं काही राहिलेलंच नाही. आणि प्रत्येक सिनेमाचा एक ठरलेला ऑडियन्स असतो. माझ्या सेन्सिबिलिटीजशी मेळ खाणारा माझा प्रेक्षकवर्ग आता ठरून गेला आहे. त्या पलिकडच्या प्रेक्षकाला आकर्षित करून घेण्यासाठी मी माझ्या संवेदनांशी तडजोड करून एखादा चित्रपट करणार नाही. आणि एकूणच चित्रपट व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर जास्तीत व्यवसाय आज मल्टिप्लेक्समधून होतो. तिथला प्रेक्षकवर्ग धंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिथल्या प्रेक्षकाला रुचणारे सिनेमेच बनणार, हे उघड आहे. दुसरं म्हणजे आजचे 80 टक्क्यांहून अधिक तरुण दिग्दर्शक हे शहरांमधले, उच्च शिक्षित, हायफाय इंग्रजी बोलणार आहेत. त्यांनी ग्रामीण भारत पाहिलेलाच नाही, तेव्हा तिथले विषय, तिथल्या सेन्सिबिलिटीज सिनेमांत येणार कशा?’

 अनुराग कश्यपच्या उडानवर सध्या तो फिदा आहे. तो सांगतो, ‘हा चित्रपट मी कान महोत्सवात पाहिला. तिथल्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादामुळे मी हरखून गेलो होतो. या चित्रपटाला असाच प्रतिसाद भारतात मिळाला तर किती बरं होईल, असं मला वाटून गेलं होतं. खरोखरच भारतीय प्रेक्षकांनीही हा चित्रपट उचलून धरला, ही फार सुखावणारी गोष्ट आहे.आजच्या तरुण दिग्दर्शकांचं हे आणखी एक वैशिष्टय़. अत्यंत गळेकापू स्पर्धा असतानाही ही मंडळी दुस-या दिग्दर्शकांच्या चांगल्या कलाकृतीचं कौतुक करताना कचरत नाहीत. अनुराग, दिबाकर बॅनर्जी, नागेश, विशाल भारद्वाज, रजत कपूर, सौरभ शुक्ला, श्रीराम राघवन, इम्तियाज अली ही मंडळी एकमेकांशी स्क्रिप्टवर चर्चा करतात, त्यात सुधारणा सुचवतात, एकमेकांचे चित्रपट पाहतात, एकमेकांच्या कामाचं कौतुक करतात. कारण चित्रपट या माध्यमावर त्यांचं निरातिशय प्रेम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्वत:वर विश्वास आहे. त्यामुळेच स्पर्धेची त्यांना भीती वाटत नाही. कदाचित या खुलेपणातून, निरोगी स्पर्धेतूनच अर्थपूर्ण चित्रपटांची वाट अधिक प्रशस्त होत चालली आहे आणि नागेशसारखे दिग्दर्शक अधिक घट्टपणे पाय रोवून उभे राहात आहेत.

नागेशचा आशायेंप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कालच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. जॉन अब्राहम यात प्रमुख भूमिकेत आहे. अक्षयकुमार बरोबर 8 बाय 10 तस्वीरआणि आशायेंत जॉन वगळता नागेशने आतापर्यंत प्रामुख्याने नव्या कलाकारांबरोबरच काम केलंय. या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो, या प्रश्नावर नागेश हसतो आणि म्हणतो, ‘माझ्या सुदैवाने अक्षय आणि जॉन हे दोघेही असे कलाकार आहेत की जे आपलं स्टारपद मिरवत नाहीत. त्यांचे फार नखरे नसतात. एकदा भूमिकेच्या गरजा काय आहेत ते समजलं, दिग्दर्शक म्हणून माझ्या कामाची पद्धत समजली की त्यांनी माझ्या कामात कधीही ढवळाढवळ केली नाही आणि कुठल्याच अभिनेत्याने तशी करू नये. कारण कुठलाही अभिनेता कितीही म्हणाला की, मी चित्रपट चांगला होण्यासाठीच हे करतोय, तरी ते तसं नसतं. अभिनेता केवळ स्वत:चाच विचार करत असतो आणि दिग्दर्शक संपूर्ण चित्रपटाचा.

 

अक्षय, जॉनबरोबर मोठय़ा बजेटचे, पूर्ण व्यावसायिक सिनेमे बनवल्यानंतर नागेश पुन्हा छोटय़ा बजेटच्या, अर्थपूर्ण सिनेमाकडे वळेल? ‘अर्थातच’, नागेश तात्काळ उत्तरतो, ‘माझी पसंती छोटय़ा किंवा मीडियम बजेटच्या चित्रपटालाच असेल. कारण कमी बजेटमध्ये तुम्हाला धोका पत्करायला वाव असतो. बिग बजेट चित्रपटांत तुम्ही ते करू शकत नाही. तिथे धंद्याची गणितं सांभाळावीच लागतात. कमी बजेटमध्ये ती डोकेदुखी नसते.

 बोलता बोलता विषय हृषिदांवर येतो. हृषिदांच्या अखेरच्या काळात चित्रपटसृष्टीतल्या ज्या मोजक्या लोकांशी त्यांनी संपर्क ठेवला होता, त्यातला नागेश होता. त्याविषयी तो सांगतो, ‘माझ्या चित्रपटातला ह्युमर त्यांना आवडे. जो दिग्दर्शक दोन-अडीच तासांत एकदाही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत नाही, तो दिग्दर्शकच नाही, असं ते म्हणत. माझ्या आशायेंला त्यांचा आशीर्वाद होता. आशायेंबनायला वेळ लागत होता, तेव्हा ते मला म्हणाले होते, मला आनंदबनवायला 10 वर्ष लागली. पण तुझं तुझ्या कथेवर प्रेम असेल आणि विश्वास असेल तर एक दिवस नक्कीच तू हा चित्रपट बनवशील. हा तुझा आनंदआहे. माझ्यासाठी यापेक्षा अधिक धीराचे शब्द दुसरे असू शकत नाहीत आणि यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंटही कोणती असू शकत नाही,’ हे सांगताना नागेशच्या चेह-यावर आपल्याला समाधान दिसतं. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0