PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: येतोय वाट चुकलेला पानसिंग येतोय वाट चुकलेला पानसिंग ================================================================================ संजीव पाध्ये on 28 August, 2010 07:55:00 AM हिंदी चित्रपट आता नवी वाट चोखाळू लागलाय. बरेच नवे - नवे प्रयोग आणि वेगळी कथानक असलेले चित्रपट येऊ घातलेत. त्यापैकीच एक आहे ‘पानसिंग तोमर’. दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया याने बराच अभ्यास करून हा चित्रपट बनवलाय. एकेकाळी भारतासाठी धावणारा धावपटू असलेला पानसिंग अचानक डाकू बनतो आणि एका त-हेने देशाचा शत्रू बनतो, असे हे वास्तवात घडलेलं नाटय़ धुलिया रुपेरी पडद्यावर मांडतोय. हा खरोखर स्वागतार्ह प्रयत्न म्हणायला हवा. या आधीचे ‘चरस’ आणि ‘हासिल’ हे त्याचे चित्रपटही वेगळे होते. शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’च्या वेळी सहायक असताना जे संशोधन झाले, त्यात धुलियाला पानसिंगची कहाणी सापडली आणि तेव्हापासून त्याच्या डोक्यात पानसिंगवर चित्रपट करायचे चक्र फिरू लागले. पानसिंग हा 3000 मी. धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमवीर होता. कटक येथे 1958च्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने 9 मिनिटे 12.4 सेकंदची वेळ घेत राष्ट्रीय विक्रम रचला होता. त्यानेच 1964 मध्ये आपलाच विक्रम मोडीत काढताना 9.04 सेकंदची वेळ दिली होती. त्याच्या सोबत धावणारे प्रतिस्पर्धी खेळाडू. त्याचे प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना त्याचे कौतुक होते. तो स्वभावानेसुद्धा खेळकर होता अणि सर्वात मिसळणारा होता. रागीट, खूनशी असा तो कुणालाच वाटला नव्हता. नाही म्हणायला मिल्खासिंगबरोबर एकदा एका स्पर्धेत त्याला मात खावी लागली होती. मिल्खासिंग हा स्प्रिंटर म्हणजे छोटय़ा पल्ल्याच्या शर्यतीत अधिक तरबेज होता. त्याने मध्यम आणि दीर्घ पल्ल्याचा शर्यतीत आपल्याला हरवले, ही बाब पानसिंगला दुखावून गेली होती; पण एरवी तो मिल्खालिंगचाही दोस्त होता. मिल्खालिंगबरोबर त्याने अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला होता. मात्र, त्याला आशियाई स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायचे होते. ते त्याचे स्वप्न काही साकार झाले नाही. त्याची निवड थोडक्यात हुकली होती. 1963 पर्यंत तो चांगला फॉर्मात होता. तेव्हाचे एक धावपटू आणि प्रशिक्षक सैनी यांनासुद्धा पानसिंग सभ्य आणि सद्गृहस्थच वाटला होता. तो कुटुंबवत्सल होता. धावण्याचे तंत्र खूपच छान होते, असे सैनी सांगतात. मिल्खासिंग याच्या माहितीनुसार त्याने गावाला जमीन विकत घेतली. त्यावरून भांडणे झाली आणि त्यातून त्याचा ‘ट्रॅक’ बदलला. चंबळ खो-यात त्याचे गाव. तिथे त्याकाळी दरोडेखोर बनणे ही सहजसोपी बाब होती. शिवाय दरोडेखोराला गावकरी मानसन्मानसुद्धा द्यायचे. पानसिंगच्या खांद्यावरही परिस्थितीवश बंदूक आली; पण त्याला दरोडेखार झाल्याचा अभिमान वाटायचा नाही. उलट खंत वाटायची, असे त्याचे नातेवाईक सांगतात. आपण खेळाडू असताना आपली जेवढी दखल घेतली गेली नाही, तेवढी दरोडेखोर झाल्यावर घेतली जात असल्याचे पाहूनही तो निराश झाला होता. विशेष म्हणजे पोलिस सतत पाठीवर घेऊन तो नंतर धावत राहिला आणि पोलिसांच्या गोळीचा बळी ठरला. त्याची ही कहाणी खरोखर करुणच आहे. धुलिया यांनी पानसिंगची भूमिका हरहुन्नरी कलाकार इरफान खान याच्याकडे सोपवली आहे. याखेरीज ‘देव डी’ आणि ‘गुलाल’फेम माही गिल या चित्रपटात पुन्हा एकदा ग्लॅमर नसलेल्या भूमिकेत आहे. तिला अशा तऱ्हेच्या वेगळ्या भूमिका करायलाही आवडतात, हे विशेष. नवोदित असूनही तिने ‘ग्लॅमर’च्या मागे धावण्याऐवजी अभिनयाला वाव देणा-या भूमिका करायचे नक्की कले आहे. धुलिया यांनी ‘पानसिंग तोमर’ बनवून भारतीय क्रीडाक्षेत्रात उपेक्षित राहिलेल्यांवर झोत टाकायचा प्रयत्न केलाय. स्टार खेळाडूंना अशीच प्रसिद्ध वेळोवेळी मिळालेली आहे; पण फारसे न चमकल्याने विस्तृतीत गेलेल्या अनेक खेळाडूंच्या कहाण्या भारतात हजारोंनी आढळतील. स्वत: धुलिया अशा अनेक खेळाडूंना भेटलेसुद्धा आहेत आणि त्यांचा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न पाहून अवाकही झालेत. पानसिंग हा वाट चुकलेला खेळाडू. त्याच्यावरचा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल, असे वाटते.