PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: छोटी, तरीही एक कारकीर्द छोटी, तरीही एक कारकीर्द ================================================================================ अरविंद मुखेडकर on 28 August, 2010 04:30:00 AM आज दिवसभराच्या आपल्या जीवनक्रमात कुठून तरी छानसं काही ऐकू आलंय आणि त्यामुळं आपलं चित्त तिकडे आकर्षित झालंय, असं कधी घडलेलं फारसं आठवत नाही. जाता येता आपल्या तंद्रीत कुणी सुरेलसं काहीतरी गुणगुणतोय, हेही दिसून येत नाही़ एकूण वातावरणामधली नादमयताही हरवल्यासारखं जाणवतंय. कुठे नादमय ध्वनी उमटलाच तर तो कल्लोळात दडून जात असावा़ त्यातून संगीत ऐकण्याचा एक महत्त्वाचा ‘सोर्स’ हा इयरफोन्स झालाय़ त्यामुळं ओपन म्युझिकचा दरवळ कुठेही भासत नाही़ खरंतर उठबाशीत होणाऱ्या गाण्यांच्या चर्चेतून देखिल संगीताचा स्वाद पसरत असतो पण तेही नाही़ आणि मुख्य म्हणजे संगीताच्या चहलपहलला अनुसरून अशी लोकांची मानसिकताही उरली नाही़ त्यामुळं जे संगीत आपल्यापर्यंत येतंय ते क्षणजीवी वाटतंय़ वास्तविक संगीत हे क्षणजीवी कधीच असू शकत नाही़. याला सरळ सरळ कारणीभूत आजच्या गाण्यांमधली आपण एक्स्पोर्ट केलेली गायकी ढब ही देखिल आह़े जिथे शब्दांच्या जाणूनबुजून केलेल्या मोडतोडीमुळे व्याकरण धाब्यावर जाऊन बसते (अर्थात काव्य असेल तरच) किंवा ‘फीलिंग्ज’ म्हणतात ते ‘यालाच’ असा गैरसमजही असू शकतो़ असो, हेही दिवस जातीलच. आज गायक कलावंत किंवा संगीतकार यांची कारकीर्दही खरोखरंच ‘शॉर्ट लाइफ’ झालीय़ म्युझिक लिसनर्सची वर्गवारी वाढून म्युझिक प्रोड्यूस होण्याचं प्रमाणही इतकं भडिमार झालेलं आहे की, एखाद्या लिसनर्स कॅटेगरीतला एखादा गायक फेमस होऊन तो लुप्त होईपर्यंत दुस-या कॅटेगरीला त्याचा थांगपत्ताही नसतो़ आजचं गतिमान जीवन हेही त्याचं एक मोठं कारण आहे. सिने पार्श्वगायक कलावंतांमध्येही असे कितीतरी आहेत की, त्यांची कारकीर्द दीर्घकाळ नव्हती पण ते पडद्याआड गेल्याचं लोकांना अजूनही वाटत नाही़ काहींची ब-याच वर्षापासून वाटचाल शांत गतीनं सुरू आहे आणि कसलाच खळखळाट न होता आजही त्यांचं काम लोकांसमोर येतंय़. पंजाब मधल्या अमृतसर जिल्ह्यात धार्मिक कुटुंबात जन्मलेला नरेंद्र नावाचा एक खोडकर मुलगा जो शाळेमध्ये वर्गात निरनिराळ्या गमती करायचा, म्हणून त्याच्या हिंदीच्या गुरुजींनी त्याचं नाव चंचल ठेवलं होतं. या नावाचा पुढे त्याला इतका सराव झाला की, नरेंद्रनं चंचल हेच आपलं आडनाव म्हणून धारण केलं. संगीतात सुरेल व खड्या आवाजाची ईश्वरीय देणगी आणि घरातून प्रोत्साहन या गोष्टी नरेंद्रला लहानपणीच मिळाल्या होत्या़ कालांतरानं देवीची भजनं आणि बुल्लेशाहाच्या काफिया गात असताना नरेंद्रला कलापारखी राजकपूरनं एकदा ऐकलं आवाजातली धार, तारसप्तकातून गात असतानाही आवाजात दर्द या सगळ्या गुणांचं भांडार असलेला एक ‘स्पेशल व्हॉइस’ लोकांसमोर प्रस्तुत करण्याच्या हेतूनं नरेंद्रला त्याने मुंबईला बोलावलं आणि 1973 साली राजकपूरच्या ‘बॉबी’करता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतात पार्श्वगायक ‘नरेंद्र चंचल’ यांचं पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झालं ‘बेशक मंदिर मस्जिद तोडमे बुल्लेशाह ये केहेंदा..’ राजकपूर, गुरुदत्त, व्ही़ शांताराम, बिमल रॉय आदींचे सिनेमे म्हणजे संगीताची मेजवानीच असायची़ राजकपूरच्या ‘बॉबी’च्या प्रत्येक गाण्यात लक्ष्मी प्यारेंनी फक्त कसच नाही, जीवही ओतला होता़. ‘बेशक मंदिर.’ हे चंचलच्या आवाजातलं करुण गीत केवळ पडद्यावरच नाही तर बाहेरही तितकंच प्रभावी सिद्ध झालं. हिंदी फिल्म संगीताच्या इतिहासातलं तार स्वरांमधलं अशा प्रकारचं ऑफ बिट असलेलं हे बहुदा पहिलंच गाणं असावं. डफ, मटका आणि चिमटा यांसारख्या तालवाद्यांबरोबर मेंडोलिनचा तालासोबत सतत वाजणारा एक ‘टिंग’ गाण्यातल्या भाषेबरोबरच पंजाबचा लोकरंग त्याच्या संगीतातूनही आणतो. फक्त एक गाणं एखाद्याचं भवितव्य कसं बदलू शकतं, याची या गाण्यानं सगळ्या जगाला प्रचीती दिली़ पुढे नरेंद्र चंचल यांना याच गाण्याकरता त्या वर्षीचं ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर ऑफ द इयर’चं फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डही मिळालं. त्यानंतर 74 साली अमिताभ बच्चन आणि मौशुमी चटर्जी यांच्या ‘बेनाम’ सिनेमात चंचलचं एक गाणं आलं़ चंचलची लोकप्रियता लक्षात घेऊन दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांनी या सिनेमात नरेंद्र चंचलच्याच स्टेज शोची सिच्युएशन तयार केली आणि सिनेमातून त्यांनाच गाताना दाखवलं होतं़ आऱ डी़ बर्मनचं संगीत असलेल्या या लोकप्रिय गाण्याचे शब्द होते ‘यारा ओ यारा इष्क ने मारा हो गया मैं तो तुझमें तमाम़....मैं बेनाम हो गया’.. चंचलचं हे गाणं चांगलं जरी झालं असलं तरी हा सिनेमा ‘बॉबी’इतका चर्चित सिनेमा नव्हता. 74 सालातच मनोज कुमारचा ‘रोटी, कपडम और मकान’ हा मल्टीस्टारर सिनेमा आला होता़ मनोज कुमारनं 72 सालातल्या ‘शोर’ पासून संगीताची बाजू लक्ष्मी प्यारेकडे दिली होती. गाण्यांसाठी तीन वेगवेगळे फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स मिळवलेल्या या सिनेमात लता मंगेशकर, मुकेश, जानीबाबू कव्वाल, नरेंद्र चंचल आणि कोरसनी गायलेलं ‘.बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई’ हे एक मोठं गाणं आह़े तिन्ही गायकांनंतर नरेंद्र चंचलचा पार्ट वरच्या स्वरांमधून सुरू होतो (हरनाम सिंग नावाची शिख व्यक्तिरेखा असलेल्या प्रेमनाथवर चित्रित) आणि पंजाबी बाजात भैरवीमधून केलेलं महागाईच्या परिस्थितीचं वर्णन नरेंद्र चंचलच्या आवाजातून होताना गाणं संगीताबरोबरच तितकंच भावनिक उंचीलाही जातं. पाठोपाठ कबीर बेदी हिरो असलेल्या ‘डाकू’ या सिनेमातलं चंचलचं आणखी एक गाणं गाजलं होतं... श्यामजी घनश्यामजी यांचं संगीत असलेल्या या सिनेमातल्या आपली व्यथा सांगणा-या ह्या गाण्याचे शब्द होते ‘कभी गम्म से दिल लगाया, कभी अश्कम् के सहारे, कभी शबे गुजमरी रो के, कभी गिन के चाँद तारे’... 80 साली ‘आशा’ या जीतेंद्र आणि रीना रॉय यांच्या सिनेमात महंमद रफी आणि नरेंद्र चंचल या दोघांचं एक माता गीत होतं ‘तूने मुझे बुलाया शेरावालीये, मैं आया मैं आया जोतावालीये’... आपल्या हाय पीचच्या नोट्समुळे यातला चंचलचा पार्ट रफीपेक्षा ब्राइट वाटणं साहाजिक आहे. या गाण्यातला चंचलचा प्रझेन्सच चांगला इस्टॅब्लिश झाला होता़ तसंच, हा रफीचाही पडता काळ होता़ परंतु, एव्हाना चंचलच्या गाण्याला लोक कंटाळले जरी नसले तरी त्याचं फार आकर्षणही उरलं नव्हतं... त्यामुळे या आधीही व नंतरही त्याची गाणी आली काय गेली काय, ही स्थिती झाली़ दरम्यान स्वत: एक लेखक व कवी असलेल्या चंचलनं ‘मला फिल्मी करियर नको आहे, कारण मी देवभक्त परिवारातला आह़े माझा मूळ हेतू माझ्या संगीतातून देवीची सेवा हा आहे,’ असं म्हटलं होतं... मोठय़ा प्रमाणावर देवीचा भक्तगण हा चंचलजींच्या ध्वनिमुद्रित तसेच लाइव्ह गाण्याचा तितकाच वेडा आह़े आजही त्यांच्या कारकीर्दीतली वर उल्लेख केलेली गाणी लक्षपूर्वक ऐकली की खरोखरंच पटतं की, होय्! गाणी ही क्षणजीवी कधीच नसतात.