‘मोजकीच पण दर्जेदार कामं करायची आहेत’
अभिनयातली सहजता आणि नैसर्गिकता हे अभिनेत्री हेमांगी कवीच्या कामाचे प्लस पॉइण्ट आहेत. याचमुळे हेमांगीला दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘पारध’मध्ये भूमिका मिळालीय. काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानिमित्त हेमांगी कवीशी मारलेल्या या गप्पा...
- तुझी या क्षेत्राची निवड ‘आवड’ की ‘करिअर’?
कॉलेजमध्ये असताना आवड म्हणून नाटकांतून कामं केली. पण, आता करिअर म्हणूनच अभिनय क्षेत्राचा विचार करतेय. दहावीपर्यंत माझा अभिनय या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. नाटकातला ‘न’ही ठाऊक नव्हता. मात्र, घरी सिनेमा, डान्स सगळं काही आवडीने बघितलं जायचं. मी स्वत: चित्र खूप उत्तम काढते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आल्यावर पहिल्यांदाच मी ‘क्रौर्य’ नावाच्या एकांकिकेत काम केलं. तेही मॉबमधलं. ती फूल विक्रेतीची भूमिका होती. कोणतंही काम मन लावून करण्याच्या माझ्या स्वभावामुळे ‘क्रौर्य’मधल्या कामाच्या बळावर मला ‘सेल्फ पोर्ट्रेट’नावाच्या एकांकिकेत काम मिळालं. ‘सेल्फ पोर्ट्रेट’ला पुरुषोत्तम करंडकही मिळालाय. ‘सेल्फ पोर्ट्रेट’मधलं माझं काम दिग्दर्शक विजू मानेंना (ती रात्र, गोजिरी) आवडलं. ते ठाणे एकांकिका महोत्सवासाठी ‘भीती’ नावाची एकांकिका करत होते. त्यांनी मला लीड रोलसाठी विचारलं.
- या क्षेत्रात येण्यासाठी तुला कितपत स्ट्रगल करावं लागलं?
- तुला पहिला कर्मर्शियल ब्रेक कसा मिळाला?
ठाणे करंडक बघायला सुभाष फडके आले होते. त्यांना मी ‘भीती’त साकारलेली लढाऊ मध्यमवर्गीय स्त्रीची व्यक्तिरेखा आवडली होती. त्यांच्यामुळे मला ‘शेम टू शेम’ या नाटकात काम करायला मिळालं. त्यात अशोक सराफ यांच्याबरोबर मी काम केलं. ‘शेम टू शेम’नंतर लेखक शिरीष लाटकर आणि दिग्दर्शक अशोक कार्लेकर यांचा चित्रपट ‘अनधिकृत’ केला. त्यादरम्यान ‘विघ्नहर्ता’, ‘शाश्वती’, ‘लग्नकर्ता विघ्नहर्ता’ या नाटकांतून कामं केलीत. ‘लग्नकर्ता विघ्नहर्ता’ मध्ये तर मला मच्छिंद्र कांबळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो तर अनुभव छानच होता. त्यांनी मला त्या नाटकात खूप वाव दिला. त्यानंतर अभय परांजपेंच्या ‘वादळवाट’ मालिकेत श्रावणीची व्यक्तिरेखा साकारली. मग दिग्दर्शक गिरीश मोहितेंचा ‘मनातल्या मनात’, त्यानंतर ‘धुडगुस’, ‘डावपेच’, ‘कोण आहे रे तिकडे’ हे चित्रपट केले. पैकी ‘डावेपच’ अजून प्रदर्शित व्हायचाय.
- तू इतकी निवडक कामं का करतेस?
मला मोजकीच, पण दर्जेदार कामं करायला आवडतात. मग ती भूमिका छोटीशी का असेना. आपलं काम लक्षात राहिलं पाहिजे, असं मला वाटतं.
- तुझा आवडते सहकलाकार कोण?
अशोकमामा, मच्छिंद्र कांबळी आणि सुबोध भावे. पैकी मच्छिंद्र कांबळी आपल्यात नाहीयेत.
- ‘पारध’ सिनेमा तुला कसा मिळाला?
गजेंद्र अहिरेंच्या ‘पारध’मध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी मला त्यांच्या एका वेगळ्या चित्रपटात काम करणार का, म्हणून विचारलं होतं. पण तारखांच्या घोळामुळे त्यांना होकार कळवणं मला काही जमलं नाही. अनायसे त्यांनी मला ‘पारध’विषयी विचारलं. मी हो म्हटलं.
- त्यात तू कोणती भूमिका करत आहेस?
‘पारध’मध्ये सिद्धार्थ जाधवच्या बहिणीची भूमिका मी करतेय. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे इंदू्. संधीचं सोनं कसं करायचं, हे या इंदूला चांगलंच ठाऊक असतं. तिची स्वप्नं मोठी असली तरी ती स्वप्नाळू नसते. सतत भावाला पाठिंबा देत असते. तिचा भाऊ राजकारणी आहे. पण, घरच्यांचा त्याला पाठिंबा नसतो. ‘पारध’मध्ये प्रेक्षकांना बहीण-भावाच्या नात्यांचा वेगळा पैलू पाहायला मिळेल.
- ‘पारध’नंतर तुझे येणारे चित्रपट कोणते?



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा