PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बाइट्स ते बीट्स! बाइट्स ते बीट्स! ================================================================================ वैभव वझे on 28 August, 2010 03:30:00 AM नेटवर्क इंजिनिअरिंग करताना कुणी अचानक सात सुरांचं नेटवर्किंग करू लागला तर, संगणकीय प्रणालीची सुरक्षितता जपताना कुणी कवितेला सुरांच्या सुरेल कोंदणात बसवू पाहात असेल तर आणि बाइट्सची भाषा बोलताना कुणी बीट्सची भाषा बोलू लागला तर आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बी.एससी. ही पदवी मिळवलेल्या ओंकार घैसासने बाइट्सबरोबर बीट्सची कास धरली आणि त्यातून तयार झाला ‘आता उजाडेल’ हा अल्बम. या अल्बमचं प्रकाशन नुकतंच झालं. एक वेगळा अल्बम संगीतसृष्टीत अवतरला. ओंकारचं शास्त्रीय संगीताचं, हार्मोनियम वादनाचं शिक्षण डोंबिवलीच्या मकरंद कुंडले यांच्याकडे झालंय. ओंकारची आई गायिका आहे तर बहिणीने अनिल मोहिले यांच्याबरोबर कार्यक्रम केले आहेत. ओंकारला कविता वाचण्याची आवड आहे. कविता वाचताना तो कधी एकाच कवीच्या प्रभावाखाली येत नाही. जे चांगलं वाटतं, मनाला भावतं ते तो टिपून घेतो. यातून त्याच्या हाती काही कविता लागल्या आणि त्याला त्यानं चाली दिल्या. या अल्बमला ‘आता उजाडेल’ हे नाव देण्यामागे त्याचा विशेष उद्देश असावा, असं वाटतं. त्याच्याशी बोलताना तसं त्यानं सांगितलं नाही. परंतु, हा अल्बम ऐकल्यावर असं जाणवतं की, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर), सुरेश भट या दिग्गज कवींबरोबरच श्रेयसी वझे, सौरभ वैशंपायन, स्पृहा जोशी, मेधा आठवले आणि उदय सप्रे या नव्या कवींनाही त्यानं स्थान देताना काही एक विचार केला आहे. गझल, भावकविता, प्रेमकविता या वेगवेगळ्या बाजांना हाताळताना दिग्गज आणि नवोदित असे दोन्ही कवी त्यानं निवडले आहेत. जणू काही भावकवितेच्या प्रांतात पुन्हा शब्दमाधुर्याची पहाट उजाडेल, असंच त्याला सांगायचं आहे! या अल्बममध्ये एकूण 10 गीतं आहेत. ओंकार नवोदित संगीतकार असला तरी तो बिनधास्त आहे. सुरेश वाडकरांसारख्या दिग्गज गायकाकडून गाऊन घेताना ओंकार त्याचं समाधान होईपर्यंत ते गाऊन घेतो. तो अजिबात बिचकत नाही, अशी ‘काँप्लिमेंट’ही त्याला ध्वनिमुद्रक सौरभ काजरेकरनं दिली आहे! श्रीरंग भावे या तरुण गायकानेही ओंकारच्या स्वरसाज चढवण्याच्या प्रक्रियेला मनमोकळी दाद दिली आहे. एखाद्या नव्या गायकाकडून अशी दाद मिळणं फार महत्त्वाचं असतं. कारण या नव्या गायकांनी ‘लाइमलाइट’मध्ये येताना बव्हंशी जुन्या संगीतकारांची, गाजलेली गीतंच गायलेली असतात. मग हळुहळू त्यांच्या डोक्यात त्या चाली बसण्याची शक्यता वाढते. पण तसं ओंकारच्या बाबतीत झालेलं नाही. भावसंगीतात स्वरांना महत्त्व आहेच. परंतु, स्वर हे शब्दांवर स्वार होऊनही चालत नाहीत, तर ते हातात हात घालून पुढे जावे लागतात. ही कसरत होऊ न देता, ओंकारनं ती एक साहजिक प्रक्रिया करून टाकली आहे. बायनरी भाषा बोलणारा ओंकार साहित्यिक भाषा बोलतो, बाइट्समध्ये फाइलची व्याप्ती मोजणारा ओंकार सूरतालाचे बीट्स मोजू लागतो तेव्हा खरंच वाटतं.. आता उजाडेल! ‘आता उजाडेल’मधील चाली या कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त नाहीत. त्याचवेळी त्या भरकटलेल्याही नाहीत. कवितेतील शब्दांचा भाव जाणत या चाली पुढे जात राहतात. हां, पण उगीच या चाली कवितेतल्या शब्दांना आपणच काय तो न्याय देणारे असा आवही आणत नाहीत. कविता सजीव करण्यासाठीच ओंकारने या चालींची योजना केली आहे. त्यामुळे ही गीतं ऐकल्यानंतर आपण त्यात रंगून जाऊन ती कविता मूर्त करू लागतो.. अगदी नकळत! म्हणूनच अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळी ‘आता उजाडेल’ पं. उल्हास बापटांची दाद घेऊन जातो. ‘आता उजाडेल’ असं हा अल्बम ऐकल्यावर पुन्हा एकदा खरंच वाटू लागतं, पटू लागतं.. दिसूही लागतं!