पहिले पान | रिलॅक्स | ‘हर्बेरियम’चं तात्पर्य

‘हर्बेरियम’चं तात्पर्य

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

रंगभूमीकडून जे मिळालं, त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून सुनील बर्वेने आपल्या अभिनय कारकीर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षात ‘हर्बेरियम’ हा उपक्रम राबवला. उत्तम पॅकेज हे ‘हर्बेरियम’चं वैशिष्टय़ होतं. मराठी प्रेक्षकांना स्मरणरंजनात रमायला आवडतं हे गृहितक त्या मागे होतं. रंगभूमीशी बांधिलकी असलेले उत्तम दिग्दर्शक आणि कसलेले कलावंत हे ‘हर्बेरियम’चे प्रमुख?आधारस्तंभ होते. त्याचबरोबर, मर्यादित प्रयोग हा त्याचा यूएसपी होता. पहिल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल्लचे बोर्ड नाटय़गृहांवर झळकल्यानंतरही सुनीलने हा शिरस्ता मोडला नाही.

दीडशे वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर आजवर अनेक प्रयोग झाले आहेत. मग ते संहितांचे वैविध्य असो की, सादरीकरणाचे नवनवे फॉर्म असोत की, आशयाचे आविष्कार असोत. या वेगवेगळ्या या प्रयोगांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केलं. तिला सतत चैतन्यशील ठेवलं. नवी दिशा देण्याचा प्रयत्नही केला आणि प्रेक्षकांनाही सकस नाटय़ानुभव दिला आहे. अलीकडे मराठी नाटकातील प्रयोगशीलता काहीशी कमी झाली होती. मराठी नाटक साच्यात अडकलं होतं. एक प्रकारची कुंठितावस्था आली होती. कसदार संहिता असलेली नवी, चांगली नाटकं येत नव्हती. परिणामी प्रेक्षकही मराठी नाटकांपासून दूर जाऊ लागला होता. मराठी नाटय़व्यवसायात गेली काही र्वष मंदीचा एकपात्री प्रयोग चालू होता. या मंदीतून बाहेर पडण्यासाठी काय करायचं, हे कुणालाच सुचत नव्हतं. या बिघडलेल्या नेपथ्याच्या पार्श्वभमीवर सुनील बर्वेने हर्बेरियमनामक सुबकप्रयोग केला. या प्रयोगाचं प्रेक्षकांनी केवळ उत्स्फूर्त स्वागतच केलं नाही, तर त्याला उचलून धरलं. तिकिटाचे भाव 300 रुपयांपर्यंत वाढवूनही हर्बेरियमच्या नाटकांचे सगळे प्रयोग हाउसफुल्ल होऊ लागले. हा एक चमत्कार होता. प्रेक्षक मराठी नाटकं पाहायला येत नाहीत, ही ओरड करणा-यांसाठी ती चपराक होती. सुरुवातीला अनेकांनी या प्रयोगाबद्दल नाकं मुरडली, पण हर्बेरियमची तिकिटबारीवरची जादू इतकी होती की, इतर निर्मात्यांनीही त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. एकदम शंभर जुन्या नाटकांचे हर्बेरियमस्टाइलमध्ये प्रयोग करण्याच्या घोषणाही झाल्या. पण या घोषणा करणा-यांचं अवसान एक-दोन नाटकांतच गळलं. हर्बेरियमची कॉपी करणाऱ्या बहुतेक नाटकांना हर्बेरियमसारखी लोकप्रियता कमावता आली नाही. सुनील बर्वे का यशस्वी झाला आणि तोच प्रयोग करूनही आपण कुठे चुकलो, असा प्रश्न हर्बेरियमची सांगता होत असताना या निर्मात्यांना आता पडला असणार.

 

मुळात कल्पना सुचणं ही महत्त्वाची गोष्ट असते. मराठी रंगभूमीवर अनेक वर्ष कार्यरत असणा-या निर्मात्यांना जी कल्पना सुचली नाही, ती अभिनेत्याचा निर्माता बनलेल्या सुनील बर्वेला सुचली, याचं श्रेय त्याला द्यायला हवं. हर्बेरियमसाठी त्याने जुन्या नाटकांचीच निवड का केली, याचं सगळ्यात सोपं उत्तर असं असू शकतं की, लोकांना स्मरणरंजनात रमणं आवडतं आणि मराठी नाटकांचा सुवर्णकाळ ही तर मराठी प्रेक्षकांच्या मर्मबंधातलीच ठेव आहे, हे सुनीलने नेमकं ताडलं. जुन्या नाटकातलं हमखास यशस्वी होण्याचं पोटेन्शियल त्याने ओळखलं. किंबहुना एकदम पाच नव्या संहिता शोधण्यापेक्षा हा मार्ग त्याला अधिक सोपा वाटला असावा. तरीही हे एक खूप मोठं धाडस होतं. एक तर निर्माता म्हणून त्याच्या गाठीशी अनुभव नव्हता. नाटकाच्या यशापयाशाची गणितं बांधताना कसलेल्या निर्मात्यांचीही जिथे फसगत होते तिथे सुनील तर नवोदित होता. शिवाय गेल्या काही वर्षातील मंदीमुळे प्रेक्षकांच्या अभिरूचीचा अंदाज बांधणंही अवघड बनलं होतं. त्यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांना भावेल अथवा नाही, याबद्दल काहीही सांगता येण्यासारखं नव्हतं आणि तो यशस्वी झाला नसता तर सुनीलला जबर आर्थिक नुकसान सोसावं लागलं असतं. नाचक्की झाली असती ती वेगळीच.

 

जुनी गाजलेली नाटकं नव्या रंगरूपात आणण्याचा सुनीलचा प्रयोग खरं तर नवा होता, असंही नाही. जुनी नाटकं नव्याने सादर करण्याची मराठी रंगभूमीवरची परंपरा जुनीच आहेत. संगीत मानापमान’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशकल्लोळया अभिजात समजल्या गेलेल्या नाटकांचे प्रयोग किती वेळा नव्याने सादर झाले याची गणतीच नसेल. फार लांब जायची गरज नाही, पण अगदी चाळीस-पन्नास वर्षापूर्वीच्या नाटकांचे प्रयोगही रंगभूमीवर गेली काही वर्ष होतच आहेत. अत्र्यांची जुनी नाटकं अनेकदा रंगभूमीवर आलीत. एकटय़ा सुयोगसंस्थेने पस्तीसहून अधिक जुनी नाटकं रंगभूमीवर आणलीत. मग हर्बेरियमचं वेगळेपण काय होतं, तर सुनीलने पाच नाटकं निवडून त्यांचे प्रत्येकी केवळ पंचवीसच प्रयोग केले. त्यातही प्रत्येक नाटकांचे तेराच प्रयोग मुंबईत, तर बारा प्रयोग मुंबईबाहेर अशी विभागणी होती. जुनी नाटकं नव्याने करणाऱ्या निर्मात्यांनी आपल्यावर प्रयोगांचं बंधन कधीच घालून घेतलं नव्हतं. त्यामुळे लिमिटेड स्टॉक, त्वरा कराची जाहिरात लोकांच्या मनात जशी भुरळ उत्पन्न करते, तशी भुरळ हर्बेरियमने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली.

 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकांमध्ये कलाकार निवडताना त्याने जानेमाने चेहरे घेतले. अगदी टीव्ही-सिनेमात सगळ्यात व्यग्र असणा-या कलाकारांना सुनीलने हर्बेरियमसाठी निवडलं. या कलाकारांभोवती असलेलं लोकप्रियतेचं वलय एनकॅश करण्याची चलाखी सुनीलने दाखवली. तिथे त्याचं अर्ध काम झालं. हे नवे कलाकार जुन्या कलाकारांनी ताकदीने साकारलेल्या भूमिका कशा साकारतात, याचं प्रेक्षकांना कुतुहल होतं. ते तिकीट खिडकीवर प्रतिबिंबित झालं. या सगळ्याला सुनीलने प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीची यथायोग्य जोड दिली. प्रत्येक नाटकाच्या शेवटच्या प्रयोगात नव्या नाटकाचं नाव जाहीर करून त्याने उत्सुकता आणि हाइप टिकवून ठेवली. हे तंत्र त्याला फायद्याचं ठरलं. थोडक्यात, सुनीलने हर्बेरियमचं छान पॅकेज तयार करून प्रेक्षकांना दिलं होतं. त्याच्या या आकर्षक रंगरूपाला प्रेक्षक भुलले. कारण त्यांना यातून स्मरणरंजानाचा आनंद मिळणार होता आणि त्यांच्या आवडत्या कलाकारांचा अभिनयही त्यांना पाहायला मिळणार होता.

 

हर्बेरियमसाठी निवडलेली पाच जुनी नाटकं वेगवेगळ्या जातकुळीतील होती. सूर्याची पिल्लेहे निखळ मनांरजन करणारं, ‘लहानपण देगा देवाही कौटुंबिक, ‘हमिदाबाईची कोठीहे सामाजिक, ‘आंधळं दळतंयहे लोकनाटय़, तर झोपी गेलेला जागा झालाहा फार्स होता. याच्यामागे सुनीलचं काही गणित नव्हतं. कारण त्याने केवळ दिग्दर्शकांची निवड केली होती. या दिग्दर्शकांनी कुठली नाटकं करायची, हे त्यांच्यावर सोडलं होतं. दिग्दर्शक म्हणून सुनीलने त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता, हे महत्त्वाचं होतं. या पाच दिग्दर्शकांनी आपल्या आवडीची पाच नाटकं आपपल्या शैलीत सादर केली तरी हर्बेरियमया एका बॅनरखाली ती सादर झाल्याने त्यांचा एक वेगळाच दर्जा राहिला. या पाच नाटकांतलं एकमेव फसलेलं किंवा फारसं न जमलेलं नाटक म्हणजे शाहीर साबळे यांचं आंधळं दळतंय’. एरवी इतर चारही नाटकांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.

 

हर्बेरियमची नाटकं पाहायला येणारा प्रेक्षक नक्की कशासाठी थिएटरमध्ये येत होता, तो पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी येत होता, की, निव्वळ आपले लाडके कलाकार पाहायला येत होता, हा प्रश्न पहिल्या नाटकापासून विचारला गेला. हर्बेरियमच्या यशात कलाकारांचा वाटा मोठा असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे हे एक पूर्ण पॅकेज होतं. जे प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरलं. म्हणूनच त्यातून एक ट्रेंड सुरू झाला. हर्बेरियमला उसळणारी गर्दी पाहून इतर निर्मातेही या प्रकारची नाटकं करायला पुढे सरसावले. पण ट्रेंडच्या मोहाला बळी पडणाऱ्यांचं जे होतं तेच त्यांचं झालं. मिळेत ती जुनी नाटकं कुठलीही तयारी न करता, पुरेशी मेहनत घेता त्यांनी घाईगडबडीत सादर केली. त्यामुळे घडायचा तोच प्रकार घडला. ही नाटकं कधी आली आणि कधी त्यांचे पंचवीस प्रयोग झाले, हे कळलंच नाही. हा दोष ट्रेंडचा नव्हता तर निर्मात्यांचा होता.

अर्थात, ट्रेंड कायमस्वरूपी कधीच नसतो. तो काही काळापुरताच टिकतो, हे लक्षात घ्यायला हवं. सुनील बर्वेने हर्बेरियमच्या नावाखाली आणखी काही निवडक नाटकांचे प्रयोग केले तर त्यांना पुन्हा असाच प्रतिसाद मिळेल का, हाही प्रश्नच आहे. एक मात्र खरं की, ‘हर्बेरियममधून नाटकवाल्यांना एक धडा नक्की मिळाला असेल की, मराठी रंगभूमीवरची मरगळ दूर करायची तर नव्या प्रयोगाशिवाय गत्यंतर नाही. हे हर्बेरियमचं तात्पर्य म्हणता येईल.      

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0