संमेलनाची परंपरा

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ११ मे १८७८ रोजी पुण्यात पहिले ‘मराठी ग्रंथकार संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर १८८५ मध्ये म्हणजेच सात वर्षानंतर पुण्यातच कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे संमेलन झाले. त्यानंतर झालेली सर्व संमेलन ‘मराठी ग्रंथकार संमेलन’ या नावाने रघुनाथ पांडुरंग करंदीकर, गोविंद वासुदेव कानिटकर, विष्णू मोरेश्वर महाजनी, चिंतामणी विनायक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

मराठी साहित्य, भाषा यांचे आदानप्रदान होण्यासाठी सुरू झालेले ‘ग्रंथकार संमेलन’ १९०८ मध्ये ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ या नावाने आयोजित करण्यात आले. पुढे १९३५ ते १९५३ या कालावधीतील सर्व साहित्य संमेलने याच नावाने आयोजित झाली. पुण्यात १९०६ मध्ये झालेल्या चौथ्या संमेलनात ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ स्थापन करण्यात आली. तेव्हापासून सर्व संमेलने ‘मसाप’ आयोजित करत असे. १९६५मध्ये हैदराबाद येथे झालेले संमेलन साहित्य साहित्यमहामंडळाने आयोजित केले. महाराष्ट्राबाहेरील साहित्य संस्था साहित्य महामंडळाशी संलग्न झाल्यानंतर हे संमेलन ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ या नावाने घेण्यात येऊ लागले.