PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ईश्वर विश्वाचा निर्माता नाही.. ईश्वर विश्वाचा निर्माता नाही.. ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 08:55:00 PM लंडन- ‘विश्वाची निर्मिती परमेश्वराने केली नाही.. भौतिकशास्त्राच्या अपरिहार्य नियमांचा ती परिणती आहे’, असा निष्कर्ष ख्यातनाम ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी काढला आहे. सतराव्या शतकातील महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा ‘विश्वनिर्मितीला ईश्वराने चालना दिली’, हा सिद्धान्त हॉकिंग यांनी ‘द ग्रँड डिझाइन’ या ताज्या पुस्तकात फेटाळला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या 12 वर्षापूर्वीच्या पुस्तकात त्यांनी न्यूटनच्या या सिद्धान्ताला आव्हान दिले नव्हते. विश्वाच्या निर्मितीबद्दल अनेक खगोलशास्त्रज्ञ, भौतिकीतज्ज्ञ आणि अंतराळसंशोधकांनी विविध सिद्धान्त मांडले असले तरी ‘बिग बँग थिअरी’ला सध्या सर्वात जास्त पाठबळ आहे. सुमारे 13 अब्ज 70 कोटी वर्षापूर्वी अंतराळाच्या पोकळीत झालेल्या महास्फोटातून विश्वनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली, असे हा सिद्धान्त सांगतो. आरंभीच्या काळातील विश्व म्हणजे अतितप्त आणि सघन स्थितीतील द्रव्य होते. त्याचा झपाटय़ाने विस्तार झाला आणि या प्रक्रियेतच तापमान कमी होत ते सध्याच्या स्थितीत आले, असे महास्फोट सिद्धान्तात म्हटले आहे. आधुनिक भौतिकशास्त्राचा प्रणेता मानले जाणारे न्यूटन यांनी ‘विश्वाने आपोआप आकार घेण्यास आरंभ केला नाही. त्या प्रक्रियेला देवाने प्रेरणा दिली’, असा सिद्धान्त सतराव्या शतकात मांडला होता. ‘द ग्रँड डिझाइन’ या ग्रंथात हा सिद्धान्त खोडून काढला आहे. ‘लहानशी ठिणगी टाकून विश्वनिर्मितीला चालना देण्यासाठी परमेश्वराला आवाहन करण्याची काहीएक गरज नाही’, अशी मिश्किल टिप्पणी हॉकिंग यांनी केल्याचे ‘द डेली टेलिग्राफ’ वर्तमानपत्र म्हणते. मात्र 1998मध्ये हॉकिंग यांनी न्यूटनच्या त्या सिद्धान्ताचा प्रतिवाद केला नव्हता. ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकात ते म्हणतात : ‘जर विश्वनिर्मितीचा एखादा परिपूर्ण सिद्धान्त आपल्याला गवसला, तर तो मानवी विचारशक्तीचा अंतिम विजय असेल.. तेव्हा आपल्याला ईश्वराच्या मनाचा ठाव घेता येईल’. पण हेच हॉकिंग 12 वर्षानी न्यूटनचा तो सिद्धान्त नाकारण्याच्या टप्प्यावर येऊन दाखल झाले आहेत. ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम अस्तित्वात आहे. या नियमाच्या आधारावरच, शून्यातून विश्वनिर्मिती शक्य असल्याचे सिद्ध होते. आकस्मिक निर्मिती हेच विश्व अस्तित्वात येण्याचे, विश्व अस्तित्वात राहण्याचे आणि आपल्या अस्तित्वाचेही स्पष्टीकरण ठरते’, असे सिद्धान्तन ते ‘द ग्रँड डिझाइन’ ग्रंथात करतात. हॉकिंग आणि सहलेखक असलेले लिओनार्ड म्लोदिनोव या अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञांचा हा ग्रंथ नऊ सप्टेंबरला प्रकाशित होईल. त्यानंतर या नव्या सिद्धान्तामुळे विश्वनिर्मितीच्या मुद्दयावर पुन्हा महाचर्चेला, विचारमंथनाला आरंभ होईल, हे नक्की.