अपेक्षापूर्ती
उत्पन्नाचे नवे विक्रम रचण्याची अपेक्षा ‘अग्नीपथ’ पूर्ण करू शकणार नसला तरी अपेक्षेप्रमाणे तो 100 कोटींचा धंदा करणारा या वर्षातला पहिला चित्रपट निश्चित ठरणार आहे. त्यामुळे फ्लॉप पण कल्ट चित्रपटांच्या रिमेक्सचा सिलसिला येत्या काही काळात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या वर्षाची सुरुवात चित्रपटसृष्टीसाठी एखाद्या दु:स्वप्नासारखी झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ाने मात्र महिनाभराचे उट्टे काढले. हृतिक रोशनच्या ‘अग्नीपथ’कडून ज्या आभाळाएवढय़ा अपेक्षा त्याच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीने लावल्या होत्या, त्या पूर्ण झाल्यामुळे अनेकांचे जीव भांडय़ात पडले.
‘अग्नीपथ’ हा या वर्षातला 100 कोटीवाला पहिला चित्रपट ठरणार, अशी अनेक ट्रेडपंडितांची आणि चित्रपटव्यावसायिकांची ठाम धारणा होती. ती खरी ठरण्याची दाट शक्यता आहे. चित्रपटाने पहिल्या वीकएंडलाच (गुरुवार ते रविवार) 67.5 कोटींचा खणखणीत ठोक गल्ला (एंटरटेन्मेंट टॅक्स, मल्टिप्लेक्सचा हिस्सा वजा जाता) गोळा केलाय. पुढच्या चार दिवसांत तो आणखी किमान 22 ते 25 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे पहिल्या आठवडय़ातच 90 कोटींची कमाई हा चित्रपट करील. त्यामुळे 100 कोटींचा पल्ला गाठण्यात त्याला फारशी तोशीस पडणार नाही.
निर्माता करण जोहर याच्यासाठी हा चित्रपट पैशांची बरसात करणारा ठरलाय. ‘अग्नीपथ’चं मेकिंग, प्रदर्शन आणि प्रमोशन-प्रसिद्धी यावर एकूण 75 कोटींचा खर्च करण्यात आला. त्यापैकी सॅटेलाइट राइट्स (35 कोटी), म्युझिक राइट्स (9 कोटी) आणि ओव्हरसीज व होम व्हिडिओ राइट्स (12 कोटी) यांच्या माध्यमातून 56 कोटी रुपये निर्मात्याने आधीच वसूल केले होते. उरलेले 19 कोटी वसूल करण्यात करणला कसलीच अडचण येणार नाही, हे पहिल्याच दिवशीच्या कमाईवरून स्पष्ट झालं होतं. वितरकांचा शेअर व अन्य खर्च वगळता पहिल्या चार दिवसांतच करण जोहर नफ्यात आहे.
‘अग्नीपथ’ उत्पन्नाचे नवे विक्रम रचेल, ही अपेक्षा मात्र अंशत:च पूर्ण झाली. हा चित्रपट हृतिकला 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचवणारा ठरेल, हा होरा खरा ठरणार असला तरी सर्वाधिक वेगाने 100 कोटींची कमाई करण्याचा ‘बॉडीगार्ड’चा विक्रम (8 दिवस) तो मोडेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. गुरुवारच्या 26 जानेवारीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या दिवशी त्याने 23 कोटींची ठोक कमाई करत ‘बॉडीगार्ड’ला (21 कोटी) पिछाडीवर टाकलं खरं; पण शाहरुख ‘किंग’ खानच्या ‘रा वन’चा पहिल्या दिवशीच्या कमाईचा (25.10 कोटी) विक्रम मोडणं मात्र त्याला जमलं नाही. त्याही पेक्षा धक्कादायक होते ते शुक्रवारच्या उत्पन्नाचे आकडे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारच्या गल्ल्यात तब्बल 50 टक्क्यांची घसरण (12.75 कोटी) ही ब्लॉकबस्टर होऊ पाहणा-या चित्रपटाला निश्चितच शोभा देणारी नाही. तेही अनेक मल्टिप्लेक्समध्ये सर्वच्या सर्व शो फक्त ‘अग्नीपथ’चेच असताना.
एकावेळी अनेक चित्रपटांची म्हणजेच वेगवेगळ्या पर्यायांची उपलब्धता हे मल्टिप्लेक्सचं सूत्र आहे. ‘रा वन’, ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग’ यांसारख्या बडय़ा चित्रपटांच्या वेळी मात्र हे सूत्र अगदी सहज मोडीत निघतं. ‘अग्नीपथ’च्या वेळीही काही ठिकाणी हाच अनुभव आला. त्या आठवडय़ात ‘अग्नीपथ’वगळता फारसा महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित होणार नव्हता. त्यामुळे ‘अग्नीपथ’ला मोकळं मैदान मिळालं आणि या चित्रपटाविषयी जनमानसात असलेली उत्कंठा लक्षात घेता व्यवहाराचा विचार करून मल्टिप्लेक्सनी या चित्रपटाला प्राधान्य देणं स्वाभाविक आहे. पण ज्या प्रेक्षकांना ‘अग्नीपथ’ पाहायचा नाही, त्यांना चार-चार स्क्रीन्सच्या मल्टिप्लेक्समध्ये अन्य कुठल्याच चित्रपटाचा पर्याय असू नये, हे चित्र मल्टिप्लेक्स या संकल्पनेच्याच विरोधात जाणारं आहे. अर्थात मल्टिप्लेक्स चालकांची याबाबतची भूमिका स्पष्ट आहे.
मल्टिप्लेक्समधील व्यवहार हा ‘रेव्हेन्यू शेअर’च्या तत्त्वावर चालतो. म्हणजे निर्माता किंवा वितरक मल्टिप्लेक्समध्ये आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी भाडं भरत नाही, तर तिकीटविक्रीतून जे उत्पन्न मिळेल, त्यातील ठराविक वाटा मल्टिप्लेक्सला दिला जातो. प्रत्येक आठवडय़ात या वाटय़ाचं प्रमाण बदलतं. त्यामुळे जो चित्रपट जास्त गर्दी खेचणार, त्यालाच आम्ही प्राधान्य देणार, असं मल्टिप्लेक्सवाल्यांचं म्हणणं आहे. तत्त्वत: ते चुकीचं नाही. पण ग्राहक राजा असण्याच्या या काळात प्रेक्षकांच्या बाजूने 100 टक्के विचार करणारी ही भूमिका नाही. ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘अग्नीपथ’ हे चित्रपट कितीही यशस्वी ठरणारे असले तरी ते पाहाण्याची इच्छा नसलेले प्रेक्षकही असतीलच की? अशा प्रेक्षकांची पावलं मल्टिप्लेक्सकडे वळल्यानंतर त्यांना तिथे अन्य काहीच पर्याय न मिळणं हे त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे.
अर्थात ‘ट्रेड’ला या गोष्टींशी काही देणंघेणं नाही. ‘अग्नीपथ’पुरतं बोलायचं झालं तर कल्ट पण फ्लॉप चित्रपटाचाही यशस्वी रिमेक करता येऊ शकतो, हे ‘अग्नीपथ’ने दाखवून दिलंय. त्यामुळे येणा-या काही दिवसांत अशा आणखी रिमेक्सची घोषणा झाली तरी नवल वाटायला नको.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा