‘मराठी’चे पाऊल अडते कुठे?
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून मराठीची गाथा आणि व्यथा सातत्याने मांडलेली दिसते. ‘मराठी वाचवा’ असा या सर्वाच्या कळकळीमागचा हेतू असतो. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे एकतर कुणीच बोलत नाही किंवा अन्य भाषांच्या नावांनी बोटं मोडून मूळ मुद्यालाच बगल दिली जाते.
मराठी भाषादिन तीन दिवसांवर येऊन ठेपलाय. त्या अनुषंगाने ‘महाविद्यालयांमध्ये मराठीला विद्यार्थी मिळेनात, विद्यापीठात मराठीची गळचेपी’ यावर जोरदार चर्चा होण्यास सुरुवात होईल. दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा दिनी मराठीचे गोडवे गायले जातील. फेसबुक, गुगलसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरही मराठीसाठी इतके गळे काढले जातील की, अमराठी व्यक्तींचाही ऊर भरून येईल. पण हे सर्व तेवढय़ापुरतंच. कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन असलेला 27 फेब्रुवारी सरला की, पुढे वर्षभर मराठीबाबतच्या सर्व चिंता दूर होतील. नाही म्हणायला मराठीच्या मुद्यावर राजकारण करणा-या मंडळींसाठी हा मुद्दा ‘हातचा’च असतो. आता तर सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून मराठीची गाथा आणि व्यथा सातत्याने मांडलेली दिसते. ‘मराठी वाचवा’ असा या सर्वाच्या कळकळीमागचा हेतू असतो. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे एकतर कुणीच बोलत नाही किंवा अन्य भाषांच्या नावांनी बोटं मोडून मूळ मुद्यालाच बगल दिली जाते. प्रत्यक्षात मराठीच्या -हासाचं (खरंतर ‘अप्रिय’तेचं) मूळ या भाषेभोवती बांधलेल्या साहित्यकेंद्री चौकटी आणि आजच्या व्यवहारांनुसार तिच्यात बदल करण्याबाबतची अनास्था यात आहे.
आपल्या पाल्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावं, असा अट्टहास हल्ली सर्वच पालकांमध्ये दिसून येतो. पुढचं सर्व शिक्षण इंग्रजीतूनच असतं किंवा व्यवहारासाठी इंग्रजी भाषाच आवश्यक असते. त्यामुळे पालकांनी असा विचार करण्यात गैर काहीच नाही. कारण जवळपास 1300 वर्षाहूनही अधिक काळापासून प्रचलित असलेल्या मराठीला वर्तमानातल्या व्यवहारांशी जुळवून घेणं अद्याप जमलेलं नाही, असं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. शिक्षण पद्धतीतील मराठीचं दुय्यम स्थान याला जबाबदार आहे. जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी यायलाच हवी, हे जितक्या तन्मयतेने मुलांच्या मनावर बिंबवले जाते, तितक्याच कसोशीने मराठीही आवश्यक असल्याचं सांगितलं जात नाही. त्यातच शाळा-कॉलेजातील मराठीचा अभ्यासक्रम नव्या पिढीला डोईजड आणि अव्यवहार्य वाटतो. शालेय स्तरावर मराठीचा अभ्यास साहित्याच्या रूपातून करवून घेतला जातो. त्याच पद्धतीचा म्हणजेच साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाचा पुन्हा महाविद्यालयीन शिक्षणातही समावेश केला जातो. उठताबसता इंग्रजी आणि हिंदी कानावर झेलत मोठय़ा होत असलेल्या नव्या पिढीला बोजड आणि कालबाह्य दाखल्यांनी व्यापलेल्या मराठी साहित्याबाबत ओढ कशी वाटावी?
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची गरज
साहित्यकेंद्री अभ्यासक्रम चुकीचा आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. मात्र, त्या जोडीला व्यवहारी भाषेत मराठी जोपासण्यास प्रोत्साहन देईल, असा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे. मराठी भाषेवर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी अतिशय मर्यादित आहेत. आहेत त्या रोजगार क्षेत्रातही काळानुरूप बदल होत आहेत. या बदलांना सामावून घेईल, असा मराठीचा शिक्षणक्रम शाळा महाविद्यालयांत अंतर्भूत करणं आवश्यक आहे. मात्र, ते आजवर झालेले नाही. मराठी विषयाच्या साहित्य आणि समीक्षाकेंद्री अभ्यासक्रमात सुधारणा करून ते व्यवसायाभिमुख करण्याची सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याने गेल्या वर्षी मांडली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणत्याही विद्यापीठाकडून पुढाकार घेतला गेलेला नाही. मुळातच विद्यापीठाची भाषा विषयाकडे पाहण्याची पारंपरिक पद्धत दीडशे वर्षानंतरही बदललेली नाही. पूर्वी मुंबई विद्यापीठात मराठी विभागच नव्हता. अनेक साहित्यिक, विचारवंतांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठात मराठी शिकवले जाऊ लागले. परंतु, मराठी भाषेच्या विकासाकडेच विद्यापीठाचे दुर्लक्ष झाले, ते आजतागायत. त्याच काळात ग्रामीण भागातील विद्यापीठांनी मराठीच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. मात्र, काळाच्या ओघात त्या विद्यापीठांच्या प्रयत्नांनाही खीळ बसली.
मराठी व्यवसायाभिमुख करणं म्हणजे, इंग्रजीतील अवघडलेपण दूर सारण्यासाठी काढलेला पर्याय असल्याचं म्हटलं जातं. व्यवसायाभिमुख मराठीचा जागतिकीकरणाच्या गराडय़ात किती उपयोग होईल, हे सांगणं कठीण आहे. मात्र, त्यामुळे मराठीचा व्यवहारातील वापर वाढण्यास निश्चितच मदत होईल. आजही विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील अनेक शब्दांना मराठीत प्रतिशब्द सापडत नाही. भाषेच्या संशोधनाचा अभाव याला प्रामुख्याने जबाबदार आहे. इंग्लिश जागतिक भाषा बनली आहे. कारण जगभरातल्या भाषांतील शब्दांना आपल्या भाषेत सामावून घेत इंग्लिशने तेथील संस्कृतीशी, प्रदेशाशी आपले नाते जोडले. बंद, हडताळ, नाकाबंदी.. अशा अनेक मराठी-हिंदी शब्दांना इंग्लिशने आपलंस केलं. त्यामुळे तिच्याबद्दलची आत्मीयता सातत्याने वाढतेय. दुर्दैवाने मराठी विश्वकोशाच्या खंडातच कोंडून पडली आहे. मराठीत वापरलेला अमराठी शब्द म्हणजे भाषेवर आक्रमण झाल्याची ओरड होते. त्यामुळे मराठीला आपलंस करण्याऐवजी तिच्यापासून दूर राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भाषा ही नदीप्रमाणे प्रवाही असली पाहिजे. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक प्रदेशाचा, झाडाझुडपांचा, संस्कृतीचा गंध शोषून घेत तिने अविरत वाहत राहिलं पाहिजे. त्यात साचलेपण आलं की, ते आटण्यास फार वेळ लागत नाही. मराठीबाबतही हेच घडत आहे. ते टाळण्यासाठी तिचं व्यवहारी, व्यावसायिक अस्तित्व वाढवणं, यातच व्यवहारीपणा आहे. मराठी भाषेचा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करून त्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा प्रयत्न राज्यातील विद्यापीठांनी करणे गरजेचं आहे.
मराठी वाङ्मय मंडळ कशासाठी?मराठी शिक्षणाचे माध्यम असले तरी ती व्यवहाराचीही भाषा व्हावी, यासाठी पूर्वीही प्रयत्न करण्यात आले. विविध विषयांवरील ग्रंथनिर्मिती, पारिभाषिक कोश, असे उपक्रम अमलात आणून मराठी भाषा व साहित्याच्या वृद्धीसाठी हातभार लावणे शक्य होते. मात्र, तसे झाले नाही. त्यासाठी खास मराठी विभागांतर्गत मराठी अभ्यास मंडळाची निर्मिती करण्यात आली. तर मागील सहा वर्षापासून प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ बंधनकारक करण्यात आलं. मात्र, अजूनही अनेक महाविद्यालयांमध्ये हे मंडळच नाही. ज्या महाविद्यालयांमध्ये हे मंडळ आहे तेथे काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा असे छोटे-मोठे उपक्रम राबवले जातात. मराठी वाङ्मय मंडळांनी इंग्रजीतल्या नव्या संकल्पना, नवं ज्ञान येईल ते मराठीत आणण्यास मदत करावी. मराठीतही व्यावहारिक ज्ञान आणण्यासाठी संशोधन व्हावं. पण असं होण्याऐवजी हे मंडळ आणि मंडळांतर्गत संशोधनात्मक उपक्रम राबवण्यासच महाविद्यालयांनी अनुत्सुकता दाखवली. परिणामी, मराठी अभ्यास केंद्र आणि विविध राजकीय पक्षांनी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी 2008 मध्ये परिपत्रक काढून वाङ्मय मंडळ बंधनकारक असल्याचं सांगितलं. या परिपत्रकानुसार प्रत्येक महाविद्यालयात मग ते वाणिज्य शाखेचे असो वा विज्ञान शाखेचे मराठी वाङ्मय मंडळ असायलाच हवं. मात्र, या परिपत्रकाला तीन वर्षे उलटल्यानंतरही कित्येक महाविद्यालयांनी मराठी वाङ्मय मंडळाचा ‘म’ही उच्चारलेला दिसत नाही.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा