PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सायकलिंगमध्ये भारताला सुवर्ण सायकलिंगमध्ये भारताला सुवर्ण ================================================================================ पीटीआय on 31 January, 2010 11:55:00 AM ढाका- येथे सुरू झालेल्या ११ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाने खाते खोलले. रामेश्वरी देवी, सुचित्रा देवी काँसम, महिधा मोहन आणि व्ही. रेजनी यांनी महिला गटात सायकलिंगमध्ये (सांघिक) सुवर्णपदक मिळवले. हॉकीमध्ये कमकुवत नेपाळचा २१-० असा धुव्वा उडवत भारताने विजयी सलामी दिली. भारतीय महिला चमूने ४४ मिनिटे आणि २२.१५ सेकंदात ३० किलोमीटर रोडरेस स्पर्धा पूर्ण केली. पाकिस्तानला रौप्य (४७ मिनिटे, ०४.०६ सेकंद) आणि श्रीलंकेला ब्राँझपदकावर (४७ मिनिटे, ०७.०८ सेकंद) समाधान मानावे लागले. हॉकीतही धडाकेबाज सुरुवात करताना भारताने अनुनभवी नेपाळवर २१-० ने मोठा विजय मिळवला. कर्णधार अजितेश रॉयच्या सवरेत्तम पाच गोलांचे भारताच्या विजयात प्रमुख योगदान राहिले. मात्र रोशन मिंझला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आल्याने सर्वानी आश्चर्य व्यक्त केले. आर्टिफिशियल (कृत्रिम) टर्फवर पहिल्यांदाच खेळणा-या नेपाळच्या हॉकीपटूंना भारताच्या आक्रमणाचा अजिबात सामना करता आला नाही. अजितेशने १५ व्या, ५८ व्या, ५९ व्या, ६६ व्या आणि ६८ व्या मिनिटाला गोल केले. आघाडीच्या फळीतील युवराज वाल्मिकी आणि मोहंमद आमिर खानने प्रत्येकी तीन गोल करत भारताला मोठय़ा फरकाने विजय मिळवून दिला. अन्य राउंड रॉबिन लढतीत बांगलादेशने चुरशीच्या लढतीत श्रीलंकेला ३-१ असे हरवले. मध्यंतराला १-१ अशी बरोबरी होती. मात्र उत्तरार्धात आणखी दोन गोलांची भर घालत यजमानांनी सलामीची लढत जिंकली. पुरुष हॉकीत पाचवा संघ पाकिस्तान आहे. राउंड रॉबिन फेरीनंतर अव्वल दोन संघ सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी झुंजतील. तिस-या आणि चौथ्या संघात ब्राँझपदकासाठी लढत होईल.