PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानी खेळाडूंबाबत शाहरुख ठाम पाकिस्तानी खेळाडूंबाबत शाहरुख ठाम ================================================================================ पीटीआय on 02 February, 2010 12:00:00 PM न्यूयॉर्क- आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात यावा या वक्तव्यावर आपण ठाम असून यासंदर्भात माफी मागणार नाही, असे अभिनेता शाहरुख खान याने स्पष्ट केले आहे. भारत हा एक चांगला देश असून तो नेहमीच पाहुण्यांचे स्वागत करतो. त्यामुळे माझ्या मताशी अनेक जण सहमत असतील. परंतु मी अभिनेता असल्यामुळे माझ्या मतावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, असेही शाहरुखने सांगितले. शाहरुखच्या भूमिकेवर आक्षेप घेत शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केले असून त्याची छायाचित्रे व त्याच्या आगामी "माय नेम इज खान' या चित्रपटांची पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. शाहरुखने माफी मागावी अन्यथा त्याचे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.