PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतावर डावाने पराभवाची नामुष्की भारतावर डावाने पराभवाची नामुष्की ================================================================================ एजन्सी on 09 February, 2010 04:35:00 PM नागपूर- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतावर डावाने पराभवाची नामुष्की ओढवली आहे. मंगळवारी, सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारताचा दुसरा डाव 319 धावांवर आटोपला. भारताचा एक डाव आणि सहा धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉलोऑन मिळालेल्या भारताच्या दुस-या डावाची सुरुवातही खराबच झाली. चौथ्या दिवशी सचिन तेंडुलकरने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताचा पराभव लांबला. तेंडुलकरने कारकिर्दीतील ४६वे शतक पूर्ण केले. मात्र शतक पूर्ण होत नाही तोच त्याला पॉल हॅरिसने बाद केले. सचिनने 177 चेंडुत 13 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय मैदानावर सचिनचे हे पहिलेच शतक होय. पहिल्या डावात सात गडी बाद करणा-या डेलने याही डावात तीन गडी बाद केले. सोमवारच्या तीन बाद 66 वरून पुढे खेळताना मुरली विजय 32 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ एस बद्रीनाथला वायन पारनेलने सहा धावांवर बाद केले. त्यानंतर सचिन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांनी पाचव्या गडीसाठी 70 धावांची भागीदारी केली. मात्र शतक झाल्यानंतर लगेच सचिन बाद झाला. त्यानंतर धोणीला पॉलने 25 धावांवर बाद केले.