PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी वर्ल्डकपसाठी भारताची धुरा राजपालकडे हॉकी वर्ल्डकपसाठी भारताची धुरा राजपालकडे ================================================================================ पीटीआय on 07 February, 2010 04:45:00 PM नवी दिल्ली- हॉकी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद अनुभवी आघाडीवीर राजपाल सिंगकडेच कायम ठेवण्यात आले आहे. प्रभज्योत सिंगकडे कर्णधारपद आणि त्याच्या दिमतीला चार उपकर्णधार असतील, अशी चर्चा होती. पण राजपालकडे कर्णधारपद सोपवत हॉकी इंडियाने या चर्चेला पूर्णविराम दिला. वर्ल्डकपसाठीच्या १८ जणांच्या संघात दोन गोलकीपरसह तीन बचावपटू, सहा मिडफिल्डर आणि सात आघाडीवीरांचा समावेश आहे. तीन जणांना राखीव म्हणून स्थान देण्यात आले आहे. माजी कर्णधार संदीप सिंग दुखापतीतून सावरल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या एस. व्ही. सुनीलला संघातून वगळण्यात आले आहे. कर्णधार राजपालसह शिवेंद्र सिंग, तुषार खांडेकर, प्रभज्योत सिंग, दीपक ठाकूरवर आघाडीची फळी आणि गुरबाज सिंग, अर्जुन हलप्पा आणि विक्रम पिल्लेवर मधल्या फळीची जबाबदारी असेल. संघ निवडीवेळी सिलेक्टर बी. पी. गोविंदा, मधू यादव आणि सिता मेहता, सरकारनियुक्त प्रतिनिधी अजित पाल सिंग, झफर इक्बाल तसेच मुख्य प्रशिक्षक होजे ब्रासा आणि राष्ट्रीय प्रशिक्षक हरिंदर सिंग उपस्थित होते. २८ फेब्रुवारी ते १३ मार्च २०१० दरम्यान होणा-या हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची सलामी पाकिस्तानशी २८ फेब्रुवारीला होईल. भारतीय संघ : गोलकीपर - एड्रियन डिसूझा आणि पी. आर. श्रीजेश. डिफेन्डर्स - संदीप सिंग, धनंजय महाडिक, दिवाकर राम. मिडफिल्डर्स - गुरबाज सिंग, सरदार सिंग, भरत, अर्जुन हलप्पा, दनिश मुज्तबा, विक्रम पिल्ले. आघाडीवीर - राजपाल सिंग, शिवेंद्र सिंग, तुषार खांडेकर, प्रभज्योत सिंग, सरवनजित सिंग, दीपक ठाकूर, गुरविंदर सिंग चंडी. ब्रासांची इच्छा अपूर्णहॉकी वर्ल्डकपसाठी प्रभज्योत सिंगची कर्णधारपदी निवड करण्यात यावी, अशी इच्छा भारताचे प्रशिक्षक होजे ब्रासा यांनी व्यक्त केली होती. मात्र निवड समितीने त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले. ‘‘राजपाल सिंगऐवजी प्रभज्योतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवावी आणि संघात चार उपकर्णधार असावेत, अशी ब्रासा यांची इच्छा होती. तसे त्यांनी संघनिवडीआधी हॉकीपटूंनाही सांगितले होते. पण राजपालची निवड करून निवड समितीचे ब्रासा यांना धक्का दिला,’’ असे संघातील हॉकीपटूने सांगितले.