PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: शिवेंद्रवर आता दोन सामन्यांची बंदी शिवेंद्रवर आता दोन सामन्यांची बंदी ================================================================================ पीटीआय on 02 March, 2010 01:05:00 PM नवी दिल्ली- पाकिस्तानच्या हॉकीपटूला जाणूनबुजून धडक मारल्याप्रकरणी भारताचा आघाडीवीर शिवेंद्र सिंगवर तीनऐवजी दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. ज्युरींच्या या निर्णयावर भारतीय हॉकी विशेष समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्पर्धा संचालक केन रीड म्हणाले, ‘शिवेंद्रने ३९व्या मिनिटाला जाणूनबुजून आपली हॉकी स्टिक वर केली. त्यामुळे पाकिस्तानच्या फरीद अहमदच्या डोळ्यावरील भागाला दुखापत झाली. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने याविरोधात कोणतीही तक्रार केली नसली तरी शिवेंद्रने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (एफआयएच) नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घालणे योग्य होते. पण त्याचा पूर्वइतिहास पाहता आम्ही दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली.’ या बंदीमुळे शिवेंद्र सिंगला वर्ल्डकप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया (मंगळवारी), स्पेन (गुरुवारी) सामन्यांना मुकावे लागणार आहे. राजधानी सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी ग्रुप बी मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.