ब्रॅडमन यांच्याशी तुलना योग्य नाही
‘सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही’, असे मत भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
मुंबई- विश्वविक्रमी द्विशतकी खेळीनंतर सचिन हा सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे कौतुक होत आहे. मात्र तुलना करायला मला आवडत नाही. सर्व क्रिकेटपटूंबाबत माझ्या मनात प्रचंड आदर आहे, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.सचिन हा ब्रॅडमन यांच्यापेक्षाही सर्वोत्तम फलंदाज आहे,’’ असे नासीर हुसेनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचे मत होते. याबद्दल सचिन म्हणाला, ‘‘सर डॉन ब्रॅडमन यांच्यासह सर्व क्रिकेटपटूंबद्दल माझ्या मनात आदर आहे. ब्रॅडमन यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. माझ्या कामगिरीमुळे संघाच्या विजयात हातभार लागतो, त्यावेळी मी सर्वात जास्त खूश असतो.’’
‘‘हा विक्रम मी वैयक्तिक साकारला नसून तो देशाचे प्रतिनिधित्व करताना केला आहे. त्यामुळे माझा हा विक्रम देशाच्या नावावर आहे. मैदानावर उतरलो, त्यावेळी मी २०० धावा करेन, असे मला कदापि वाटले नव्हते,’’ असे ऐतिहासिक कामगिरीबद्दल सचिनने सांगितले.
द्विशतकी खेळीनंतर सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी इच्छा भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर, कपिल देव आणि दिलिप वेंगसरकर यांनी केली आहे. ‘‘या क्षणी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा, असे मला वाटत नाही. माझ्यासह सर्व जनतेचे हिरो असलेल्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्या यादीत माझे नाव असावे, अशी इच्छा नाही. मला सध्या क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. हा पुरस्कार मिळायचा तेव्हा नक्कीच मिळेल,’’ असे सचिनने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘उपखंडात २०११मध्ये होणा-या विश्वचषक स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. संपूर्ण देशही विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.’’ हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर ४-१ असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची सचिनने स्तुती केली. ‘‘मी हॉकीमध्ये पारंगत नसलो तरी भारतीय संघाचा चाहता आहे. त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. भारताचा सलामीचा सामना मी पाहिला. टीव्हीवर त्या सामन्याचा थरार पाहतानाही दडपण येत होते. परंतु भारतीय संघ जिंकल्याने मी आनंदी आहे. पुढील सामन्यातही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना भारताच्या पदरी अपयश आले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,’’ असेही त्याने सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा