PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य ================================================================================ एजन्सी on 06 August, 2010 05:40:00 PM कोलंबो- खंद्या फलंदाजांनी भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे नांगी टाकल्यानंतर थिलन समरवीरा आणि अजंथा मेंडिसने नवव्या विकेटसाठी केलेल्या 117 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेने तिस-या क्रिकेट कसोटीत भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य निश्चित केले आहे. चौथ्या दिवसाखेर भारताने तीन बाद 53 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सचिन तेंडुलकर 11, तर नाइट वॉचमन इशांत शर्मा दोन धावांवर खेळत होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात चाललेल्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेची अवस्था दुस-या डावात आठ बाद 125 अशी झालेली असताना समरवीरा (83) आणि मेंडिसने (78) श्रीलंकेला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. दुस-या डावात श्रीलंकेने सर्वबाद 267 धावा केल्या. गुरुवारच्या दोन बाद 45 धावसंख्येवरून डाव पुढे सुरू करणा-या श्रीलंकेला शुक्रवारी भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले. कर्णधार कुमार संगक्कारा, नाइट वॉचमन सूरज रणदीव,महेला जयवर्धने यांना प्रज्ञान ओझाने बाद केले, तर अँजेलो मॅथ्यूज आणि प्रसन्ना जयवर्धनेला अमित मिश्राने लागोपाठच्या चेंडूंवर तंबूत परत पाठवले. मात्र त्यानंतर समरवीरा व मेंडिसने नवव्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. भारताच्या दुस-या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. गेल्या डावातील शतकवीर वीरेंदर सेहवाग या डावात भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर आलेला राहुल द्रविडही सात धावांवर बाद झाला. मुरली विजय 27 धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या सूरज रणदीवने या तिघांनाही बाद केले. शनिवारी सामन्याच्या अंतिम दिवशी भारतीय फलंदाज 257 धावांचे आव्हान पार करू शकतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसरा सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणे भारतीय संघाला भाग आहे.