PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: लक्ष्मणच्या शतकाने साकारला विजय लक्ष्मणच्या शतकाने साकारला विजय ================================================================================ पीटीआय on 07 August, 2010 02:45:00 PM कोलंबो- व्हीव्हीएस अर्थात ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणचे सफाईदार शतक आणि त्याला सचिन तेंडुलकर नि सुरेश रैना यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यांच्या जोरावर भारताने येथील पी. सरा ओव्हल स्टेडियमवर झालेला तिसरा कसोटी सामना पाच विकेट्सनी जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. हा सामना गमावून भारत ही मालिका 0-2 अशी हरला असता, तरी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थानाला धक्का बसला नसता. पण अशा पराभवानंतर अव्वल स्थानावर राहण्याचा नैतिक अधिकार भारताने नक्कीच गमावला असता. तशी फजिती होणार नाही याची काळजी लक्ष्मण, सचिन आणि रैना या त्रिमूर्तीने घेतली. लक्ष्मणने लंकन भूमीवरील त्याचे पहिले शतक झळकावण्यासाठी अतिशय योग्य मुहूर्त शोधला. चौथ्या डावात विजयासाठी 257 धावा जमवण्याचे अवघड लक्ष्य होते आणि भारताने वीरेंदर सेहवागसह तीन मोहरे चौथ्या दिवशी सायंकाळीच गमावले होते. अशा खडतर परिस्थितीत सचिन तेंडुलकरने एक बाजू भक्कम लावून धरली आणि त्यामुळे लक्ष्मणला त्याचा नैसर्गिक सफाईदार खेळ करून दाखवता आला. लक्ष्मण-सचिनच्या सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण शतकी भागीदारीने श्रीलंकेच्या आकाक्षांवर पाणी फेरले. रैनाने आक्रमक खेळून त्यांचा पुरता निकाल लावला. पाठीत चमक येऊनही लक्ष्मणने शतक आणि विजयाचे लक्ष्य गाठले. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर रोखून दाखवले हेही कौतुकास्पद आहे. भारताने पाचव्या दिवशी तीन बाद 53 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. सचिन तेंडुलकरसोबत खेळणा-या नाइटवॉचमन इशांत शर्माला सुरज रणदिवने चार धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिनसोबत 109 धावांची भागीदारी केली. सचिन तेंडुलकरने कसोटीमधील 56वे अर्धशतक झळकावले. उपहारानंतर रणदिवने सचिनला 54 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने लक्ष्मणसह भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताने पहिल्या सत्रात सावध खेळी केली. सचिन आणि लक्ष्मण यांनी संयमी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. सचिन बाद झाल्यानंतर लक्ष्मणने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली संघाला सहज विजय मिळवून दिला. लक्ष्मणने कसोटीमधील 16वे शतक झळकावले. त्यांने नाबाद 103 धावा केल्या. तर सुरेश रैनाने 41 धावा केल्या. श्रीलंकेकडून सुरज रणदिवने पाच बळी घेतले. मालिकेत फलंदाजीबरोबर गोलंदाजीत चांगली कामगिरी करणा-या वीरेंदर सेहवागला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. तर लक्ष्मणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. श्रीलंका पहिला डाव- सर्व बाद 425 भारत पहिला डाव- सर्व बाद 436 श्रीलंका दुसरा डाव- सर्व बाद 267 भारत दुसरा डाव- पाच बाद 258