PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राष्ट्रकुलच्या तयारीसाठी 18 ऑगस्टपर्यंत मुदत राष्ट्रकुलच्या तयारीसाठी 18 ऑगस्टपर्यंत मुदत ================================================================================ पीटीआय on 08 August, 2010 03:35:00 PM नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या सर्व स्टेडियम्सचे काम 18 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रकुल क्रीडा संघटनेने दिले आहेत. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले स्टेडियम्स क्रीडापटूंसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र 18 ऑगस्टपूर्वी देण्याचे निर्देश राष्ट्रकुल क्रीडा संघटनेने आयोजन समितीला दिले आहेत. संघटनेचे अध्यक्ष माईक हुपर यांनी या संदर्भात आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेक्ष कलमाडी यांनी पत्र लिहले आहे. आरोग्य आणि सुरक्षा या दृष्टीने स्पर्धेसाठी बांधण्यात आलेली स्टेडियम्स क्रीडापटूंसाठी सुरक्षित आहेत, या संदर्भातील अहवाल 18 ऑगस्ट रोजी सादर करावा असे हुपर यांनी पत्रात म्हटले आहे. हुपर यांनी राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे प्रमुख माइकल फेनल यांच्याकडे हा अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. फेनल 18 ऑगस्ट रोजी भारतात येणार असून 19 ऑगस्ट रोजी ते स्पर्धेच्या सर्व स्टेडियम्सची पाहणी करणार आहेत. 18 ऑगस्टची वेळ पाळली नाही तर कोणती कारवाई करणार? या प्रश्नाला उत्तर देताना हुपर म्हणाले, स्पर्धेसाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कारवाई करण्याचा विचार करत नाही. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे, त्यांनी सांगितले. संघटनेला मिळलेल्या सीव्हिसी अहवालामध्ये स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या काही स्टेडियस्मच्या बांधकामामध्ये त्रुटी राहील्याचे म्हटले आहे. त्यामुळेच संघटनेच्या समाधानासाठी सर्व स्टेडियम्स पाहणी करणे आवश्यक असल्याचे हुपर यांनी सांगितले. सीव्हिसी अहवालात दोन स्टेडियम्सना अद्याप अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे म्हटले आहे. क्रीडामंत्री एम एस गिल यांनी स्पर्धेसाठीच्या सर्व स्टेडियम्सचे काम वेळेत पूर्ण होणार, असे आश्वासन दिल्याचे हुपर यांनी सांगितले. सीव्हिसी अहवाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी गिल यांची भेट घेतली होती.