PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘स्पॉट फिक्सिंग’च्या जाळ्यात चौथा पाकिस्तानी ‘स्पॉट फिक्सिंग’च्या जाळ्यात चौथा पाकिस्तानी ================================================================================ पीटीआय on 06 September, 2010 12:20:00 AM लंडन- जवळपास प्रत्येक सामन्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू फिक्सिंग करत असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी सलामीवीर यासिर हमीदने केल्यानंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. यासिरच्या या खुलाशामुळे चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू चौकशीच्या जाळ्यात सापडला आहे. सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर हे पाकिस्तानी क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंगच्या कचाट्यात सापडले असतानाच यासिरने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कसोटी सामन्यात मॅचफिक्सिंग करण्यासाठी एका बुकीने मला एक लाख पौंडची ऑफर दिली होती. मात्र मी ही ऑफर नाकारली. पण माझे सहकारी जवळपास प्रत्येक सामन्यात फिक्सिंग करत आलेत,’’ असे यासिरने ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र आपण कोणतीही मुलाखत दिलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. ‘‘पाकिस्तानचे तीन क्रिकेटपटू एकदाच पकडले गेले. मात्र प्रत्येक सामनाच ते ठरवून खेळायचे. देवाला ठाऊक की, ते पुढे काय करणार होते? माझा नेहमी सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न असायचा. मात्र ते मुद्दामहून हरायचे, याचा मला राग यायचा. माजिद त्या तिघांनाही हवे तेवढे पैसे द्यायचा. प्रत्येक ‘नो बॉल’साठी त्यांना 20 ते 25 हजार पौंड मिळायचे,’’ असे यासिरने नॉटिंगहॅममधील एका हॉटेलमध्ये सांगितल्याचे ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ने म्हटले आहे. केवळ 50 सामने खेळून चार घरे बांधत ‘झटपट’ श्रीमंत होणा-या मोहंमद आसिफला यासिरने लक्ष्य केले आहे. ‘‘आसिफने आताच लाहोरमध्ये एक इटालियन पद्धतीचे घर बांधले. त्या घरात गेल्यावर आपण इटलीतच आहोत, असे वाटते. त्याची जवळपास चार घरे आहेत. एवढा पैसा त्याच्याकडे कुठून आला? अनैतिक मार्गानेच कमी कालावधीत इतका पैसा जमा करता येतो,’’ असे यासिरने म्हटले. इंग्लंड दौ-यातील कसोटी सामन्यात ‘स्पॉट फिक्सिंग’साठी बुकी माजिदने आपल्यालाही एक लाख पौंड देऊ केले होते. मात्र ते नाकारल्याचे त्याने यावेळी सांगितले. ‘‘अनैतिक मार्गाने मला पैसे मिळवायचे नाहीत. मला अनेकांनी सामने ‘फिक्स’ करण्यासाठी संपर्क साधला. मोठी रक्कम देऊ केली. म्हणून मी नकार दिला. अशाप्रकारे पैसे कमवून मीही फेरारीतून फिरलो असतो. ऐष-आरामात जगलो असतो. मात्र ‘फिक्सिंग’ करणे मला कधी जमले नाही आणि जमणार नाही. मी मध्यमवर्गीय आणि कष्टाळू कुटुंबातून आलो आहे. माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. ‘बुकी’ना भेटण्यास नकार दिल्यामुळे तसेच त्यांची ‘ऑफर’ नाकारल्याने मला दोन वर्षे संघाबाहेर बसावे लागले. लॉर्ड्स कसोटीत मला खेळण्याची संधी मिळाली. मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परंतु, त्या ‘त्रिकुटा’ला देवाने योग्य ती शिक्षा दिली,’’ असे यासिर हमीदने सांगितले. पाकिस्तानचे क्रिकेटपटू हेल्मेटमध्ये मोबाईल लपवतात पाकिस्तानचे क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामने खेळताना हेल्मेटच्या उजव्या कानाकडील बाजूस मोबाईल लपवतात, असा आरोप पाकिस्तानच्या एका माजी कसोटीपटूने केला आहे. ‘‘स्पॉटफिक्सिंग’ किंवा ‘मॅचफिक्सिंग’ प्रकरणात अफवा अधिक असल्याने त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणे कठीण असते. मॅचफिक्सिंगविषयी मी केलेल्या आरोपांवर कुणाचाही विश्वास बसणार नाही, हे मला ठाऊक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजी करताना हेल्मेटच्या आत मोबाईल लपवल्याचे एका सहका-याने सांगितल्यानंतर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला,’’ असे नाव न छापण्याच्या अटीवर माजी क्रिकेटपटूने ‘द टेलिग्राफ’ला सांगितले. संबंधित क्रिकेटपटूने त्याचे नाव उघड केलेले नाही. मात्र ही माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिल्याचेही त्याने सांगितले. आयसीसी नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामने खेळताना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी क्रिकेटपटूंना नाही. क्रिकेटपटू आणि बुकी यांच्यात ‘थेट’ संवाद होऊ नये म्हणून आयसीसीने क्रिकेटपटूंवर सामना खेळताना ‘मोबाईल बंदी’ घातली आहे. हमीदला समन्स मॅचफिक्सिंगमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड करणा-या यासिर हमीदला पाकिस्तानचे लंडनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी समन्स बजावले आहे. यासिरने रविवारी उच्चायुक्ताच्या कार्यालयात जाऊन हसन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एजाझ बट यांची भेट घेतली. ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ या ब्रिटनमधील दैनिकाला यासिरने मुलाखत दिली होती. त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू सातत्याने सामने ‘फिक्स’ करायचे, असा खळबळजनक खुलासा केला होता. मात्र आपण कोणतीही मुलाखत दिली नाही, असे यासिरने स्पष्ट केले. या दैनिकाने आपल्याला फसवले असून माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही केला आहे. ‘‘ते सर्व रेकॉर्ड करतील, असे मला कधीही वाटले नव्हते. बॅटवर स्टिकर लावण्याच्या स्पॉन्सरशिपबद्दल त्याने माझ्याशी चर्चा केली. त्याने ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’च्या आरोपांबद्दल बोलणे सुरू केले. पण मी त्याच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. आमच्यात स्पॉट फिक्सिंगविषयी काहीही चर्चा झाली नाही,’’ असा दावा यासिरने केला. ‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरणी ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ या दैनिकाला कोणतीही मुलाखत दिलेली नाही, असे पाकिस्तानचा सलामीवीर यासिर हमीदने सांगितले. ‘‘त्या दैनिकाला मी कधीही मुलाखत दिलेली नाही. तसेच ‘मॅचफिक्सिंग’ बद्दल काहीही बोललेलो नाही. सहका-यांवर आरोप करण्याचा मी विचार करू शकत नाही. त्यामुळे ‘व्हीडियो’ प्रसिद्ध झाल्यावर मी पुरता गोंधळून गेलो. या मुलाखतीशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे मी संघ व्यवस्थापनाला कळवले आहे,’’ असे सांगत हमीदने ‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरणी कानावर हात ठेवले. आयसीसीच्या अँटी करप्शन नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सामनानिश्चितीबाबत कुठल्याही अनोळखी इसमाने संपर्क साधल्यास किंवा सामना ठरवून खेळला जाणार असल्याची माहिती असल्यास त्याची माहिती आयसीसीच्या ‘अँटी करप्शन युनिट’च्या अधिका-यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ या दैनिकाने केलेल्या नव्या ‘खुलाशा’त तथ्य आढळल्यास यासिर अडचणीत येऊ शकतो. बंदी घातलेल्या ‘त्रिकुटा’वर 23 आरोप सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर या तिघा पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर ‘स्पॉटफिक्सिंग’बाबत आयसीसीने 23 आरोप ठेवल्याचे ब्रिटिश दैनिकाने म्हटले आहे. प्रत्येक आरोप सहा पानी आहे. क्रिकेटशी संबंध नसलेल्या लोकांना वारंवार संपर्क साधण्यावरून पाकिस्तानचा कसोटी कर्णधार बटला पाच वेळा ताकीद दिल्याचे दैनिकाने म्हटले आहे. पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि बुकींचे प्रत्येक बैठकीतील संभाषण, ई-मेल याविषयीचा सविस्तर अंतर्गत चौकशी अहवाल लवकरच छापून प्रसिद्ध केला जाईल, असे ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ने म्हटले आहे.