सहा कुस्तीपटू ‘बी’ चाचणीतही दोषी
गेल्या आठवडय़ात उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेले सहा कुस्तीपटू राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) घेतलेल्या ‘बी’ सॅँपल चाचणीतही दोषी आढळून आले आहेत.
नवी दिल्ली- गेल्या आठवडय़ात उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेले सहा कुस्तीपटू राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) घेतलेल्या ‘बी’ सॅँपल चाचणीतही दोषी आढळून आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या महिनाभर आधीच ही घटना घडल्यामुळे भारतासमोर कठीण परिस्थिती उद्भवली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या सराव शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या ‘ए’ सॅँपल चाचणीत हे सहाही जण दोषी आढळले होते. जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) बंदी घातलेले मेथीलहेक्झानामाइन हे उत्तेजक त्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. शनिवारी ‘नाडा’ने घेतलेल्या ‘बी’ सॅँपल चाचणीतही हे दोषी आढळले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
‘‘वाडाच्या नियमानुसार, अॅथलीट्सना प्रथम ‘नाडा’च्या चाचणीला सामोरे जावे लागेल. आता त्यांच्यावर बंदी घालायची की नाही, याचा निर्णय ‘नाडा’ला घ्यावा लागेल,’’ असेही सूत्रांनी सांगितले. राजीव तोमर (120 किलो), सुमीत (74 किलो), मौसम खत्री (96 किलो) आणि महिला कुस्तीपटू गुरशरणप्रीत कौर (72 किलो) यांना राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. राहुल मान (60 किलो) आणि जोगिंदर सिंग (120 किलो) हे दोन अन्य कुस्तीपटू उत्तेजक चाचणीत दोषी सापडले आहेत. तीन वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावणा-या राजीव तोमरला गेल्या महिन्यात अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रकुल संघात स्थान मिळवणारा गोळाफेकपटू सौरभ विज आणि थाळीफेकपटू आकाश अंटिल ‘बी’ सॅँपल चाचणीसाठी पुढे सरसावले नाहीत. पहिल्या चाचणीत दोषी आढळल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे सात दिवसांचा अवधी असेल.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा