भारत पराभवाच्या छायेत
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावर 208 धावांची आघाडी घेतली असून दुस-या डावातही फलंदाजी कोलमडल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे.
पर्थ- भारतीय फलंदाजांची पहिल्या डावातील अपयशाची मालिका दुस-या डावातही कायम असून दुस-या दिवसअखेर आघाडीचे फलंदाज स्वस्तात परतल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखले असले तरी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावार 208 धावांची मोठी आघाडी मिळवली आहे. भारताच्या दुस-या डावाचीही सुरुवात खराब झाली असून दिवसअखेर भारताच्या चार बाद 88 धावा झाल्या आहेत. अनुभवी फलंदाज राहुल द्रविड नाबाद 32 व विराट कोहली नाबाद 21 धावांवर खेळत असून आघाडी पार करण्यासाठी भारताला 120 धावांची गरज आहे.
दुस-या डावातही भारताच्या सलामीवीरांनी निराशाच केली. गौतम गंभीरला (14) मिशेल स्टार्कने माईक हसी करवी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर पुढच्याच षटकात धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवागला (10) पीटर सीडलने ब्रॅड हॅडीनकरवी झेलबाद केले. यानंतर वीक्रमवीर सचिन तेंडुलकरला (8) स्टार्कनेच पायचित केले. सचिन बाद झाल्यानंतर शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण डाव सावरेल अशी आशा होती, मात्र त्याला आल्या पावली माघारी धाडत हेल्फिनहॉसने भारताला जोरदार धक्का दिला. लक्ष्मण शून्यावर बाद झाला.लक्ष्मण बाद झाल्यावर आलेल्या विराट कोहलीने आणखी पडझड रोखत द्रविडला चांगली साथ देत दुसरा दिवस पार केला.
तत्पूर्वी सामन्याच्या दुस-या दिवशी उमेश यादवने पाच बळी घेऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 369 धावांवर रोखण्यात यश मिळवले. डेव्हिड वॉर्नरच्या 180 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 208 धावांची आघाडी घेतली. यादवने भेदक गोलंदाजी करीत पहिल्या सत्रातच कांगारुंना तीन झटके दिले. बिनबाद 214 धावसंख्येवरुन अवघ्या 129 धावांमध्ये कांगारुंचे 8 मोहरे भारतीय गोलंदाजांनी तंबूत पाठविले.
कोवॉन(74), मार्श (11) आणि रिकी पांटिंग (7) धावांवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सावधपणे खेळण्यास सुरूवात केली होती. मात्र यादवने 93 धावांमध्ये 5 फलंदाज बाद करुन त्यांचे मनसुबे फधळून लावले.
कर्णधार मायकल क्लार्कने 18, मायकल हसीने 14 तर पीटर सिडलने 30 धावा काढल्या. विरेंद्र सेहवागने शेवटची विकेट घेतली.
भारताकडून यादवने पाच तर झहीर खानने दोन विकेट घेतल्या.
- भारत पहिला डाव- 161
- ऑस्ट्रेलिया पहिला डाव- 369
- भारत दुसरा डाव- 4 बाद 88 ( द्रविड 32 आणि कोहली 21 धावांवर खेळत आहेत)



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा