PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पहिल्या दिवसाखेर श्रीलंका चार बाद 293 पहिल्या दिवसाखेर श्रीलंका चार बाद 293 ================================================================================ पीटीआय on 03 August, 2010 05:50:00 PM कोलंबो- कर्णधार कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि थिलन समरवीराच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने तिस-या व अंतिम क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर चार बाद 293 धावांपर्यंत मजल मारली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना येथील पी सारा स्टेडियमवर चालू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा थिलन समरवीरा 65 धावांवर, तर अँजेलो मॅथ्यूज 26 धावांवर खेळत होते. भारतातर्फे प्रज्ञान ओझाने दोन, तर इशांत शर्माने एक बळी घेतला. त्यापूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या बिनीच्या जोडीला चांगली सलामी देता आली नाही. गेले दोन सामने चमकदार कामगिरी करणारा थरंगा पर्णविताना अवघ्या आठ धावांवर बाद झाला. तिलकरत्ने दिलशानही 41 धावा करून धावबाद झाला. मात्र त्यानंतर संगकारा व जयवर्धने या आजी-माजी कर्णधारांनी अर्धशतकी खेळी करून डावाला स्थैर्य दिले. हे दोघे बाद झाल्यानंतर समरवीराने धावसंख्येला आकार दिला. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून श्रीलंकेने 1-0 आघाडी घेतली आहे, तर दुसरा सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. दुसरा सामना अनिर्णित राखून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावण्याचा धोका टाळला आहे. या कसोटी सामन्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा सामना खेळून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला आहे. सचिनची ही 169वी कसोटी आहे.