पहिले पान | क्रीडाजगत | राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा | 29 सुवर्णपदकांसह भारत दुस-या स्थानी

29 सुवर्णपदकांसह भारत दुस-या स्थानी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image सोमदेव देवबर्मन

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत प्रत्येकी पाच सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकावत भारताने रविवारी पुन्हा दुसरे स्थान पटकावले.

नवी दिल्ली- इंग्लडने मागे टाकलेल्या भारताने रविवारी पुन्हा उसळी घेत दुसरे स्थान हिरावून घेतले. प्रत्येकी पाच सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकावत भारताने जोरदार मुसंडी मारली. दीपिका कुमारी, हरप्रीत सिंग, सुशीलकुमार, राहुल बॅनर्जी आणि सोमदेव देववर्मन यांनी सुवर्णपदके पटकावली.  

सोमदेवच्या विजयामुळे सानिया मिर्झाचे सुवर्णपदक हुकल्याने निराशा झालेल्या टेनिसप्रेमींना दिलासा मिळाला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग जोन्सचा 6-4, 6-2 असा फडशा पाडला. सानियाने रश्मी चक्रवर्तीच्या साथीने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले. पुरुष हॉकी संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 7-3ने नमवून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.  

पदकांचा पंच 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्णभरारी सुरूच आहे. सातव्या दिवशी भारताने प्रत्येकी पाच सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉँझपदके पटकावत पदकांचा पंचक लगावला. दीपिका कुमारी, हरप्रीत सिंग, राहुल बॅनर्जी, सुशील कुमार आणि सोमदेव देववर्मन यांनी सुवर्णपदकी कामगिरी करत भारताची सुवर्णपदकांची संख्या 29 वर नेली. या कामगिरीमुळे भारताने 29 सुवर्ण, 22 रौप्य आणि 22 ब्रॉँझपदकांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदाच टेनिसचा समावेश करण्यात आल्यानंतर, पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावणारा सोमदेव पहिला टेनिसपटू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग जोनसवर 6-4, 6-2 असा सहज विजय मिळवला. सानिया मिर्झाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर सोमदेवने भारताला टेनिसमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. सोमदेवने या स्पर्धेत एकही सेट न गमावता अजिंक्य राहण्याची किमया केली. पहिल्या सेटमध्ये केवळ एक ब्रेकपॉइंट मिळवत सोमदेवने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. पण दुस-या सेटवर त्याने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. प्रतिस्पध्र्याची दोन वेळा सर्विस मोडीत काढत सोमदेवने 5-0 अशी आघाडी मिळवली. दोन गेमनंतर सोमदेवने पुन्हा एकदा सरस कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सानिया मिर्झा आणि रश्मी चक्रवर्ती यांनी आपल्याच देशाच्या निरुपमा संजीव आणि पूजश्री वेंकटेश यांचा 6-4, 6-2 असा पराभव करत ब्रॉँझपदक मिळवले.  वर्ल्ड चॅँपियन आणि ऑलिंपिक ब्रॉँझपदक विजेत्या सुशील कुमारने कुस्तीत सुवर्णपदक पटकावले. त्याने 66 किलो वजनी गटात सुरेख कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिच बार्नेसवर 7-0 असा विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुशीलने बार्नेसवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. देशाला सुवर्णपदक जिंकून दिल्याने मी आनंदी आहे. या स्पर्धेसाठी मी भरपूर मेहनत घेतली होती. आता आगामी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय मी बाळगले आहे,’’ असे सुशील कुमारने सांगितले. कुस्ती स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अनुज कुमार (84 किलो) आणि जोगिंदर कुमार (120 किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या मोहंमद इनामने अनुजला 4-3 असे हरवले. कॅनडाच्या अर्जुन सिंग भुल्लारने जोगिंदरचा 4-0 असा पाडाव केला. अनिल कुमारने 55 किलो वजनी गटात ब्रॉँझपदक पटकावले. त्याला वेल्सच्या क्रेग पिलिंगकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले.  अ‍ॅथलेटिक्समध्ये, महिलांच्या लांबउडी प्रकारात भारताच्या मल्लिआकल प्रजूषाने रौप्यपदक पटकावले.

ट्रॅक आणि फिल्डमध्ये, पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात विकास गौडाने 63.69 मीटर अशी कामगिरी नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली.  तिरंदाजीत रविवारी भारताने दोन सुवर्णपदके मिळवली. पुरुषांच्या रिकव्‍‌र्ह प्रकारात राहुल बॅनर्जीने तर महिलांच्या रिकव्‍‌र्ह प्रकारात दीपिका कुमारीने सुवर्णपदकाची लयलूट केली. बॅनर्जीने अंतिम फेरीत कॅनडाच्या जेसन लिऑनवर 6-5 अशी मात केली. दीपिकाने ऑलिंपिक ब्रॉँझपदक विजेत्या अ‍ॅलिसन विल्यमसन हिच्यावर 6-0 असा विजय मिळवला. डोला बॅनर्जीला ब्रॉँझपदकावर समाधान मानावे लागले. तिने मलेशियाच्या अनबरासी सुब्रह्मण्यमचा 6-2 असा पाडाव केला.  तिस-या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात जयंता तालुकदारने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू ग्रे याच्यावर 6-4 अशी मात करत ब्रॉँझपदक मिळवले. नेमबाज हरप्रीत सिंगने पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची नोंद केली तर विजय कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरप्रीतने 580 गुणांची नोंद करत दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दुस-या क्रमांकासाठी विजयसह सिंगापूरचा लिप मेंग पोह, इंग्लंडचा मायकेल गॉल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेलॅँजेलो गस्टिनियानो यांनी 574 गुण मिळवले. त्यामुळे चौघांनाही प्रत्येकी पाच वेळा वेध घेण्याची संधी देण्यात आली. त्यात विजयने 49 गुणांसह रौप्यपदक मिळवले.  

सायना नेहवालची आगेकूच

जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सायना नेहवालसह अन्य बॅडमिंटनपटूंनी प्रतिस्पध्र्याना धूळ चारत पदकाकडे वाटचाल कायम ठेवली आहे. रविवारी सायनाने वेल्सच्या सारा थॉमसचा 21-5, 21-9 असा फडशा पाडत पहिल्यावाहिल्या सुवर्णपदकाकडे आगेकूच केली. पुरुष एकेरीत चेतन आनंदनेनायजेरियाच्या ओला फॅगबेमीला 21 मिनिटात 21-12, 21-6 अशी धूळ चारली. आदिती मुटाटकर आणि पी. कश्यप यांनीही आपापले सामने जिंकत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सिरी फोर्ट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, कश्यपने जमैकाच्या पाइन चार्ल्सचा 21-5, 21-12 असा पराभव केला. आदितीने श्रीलंकेच्या सुबोधा कुमारीचा केवळ 17 मिनिटांत 21-14, 21-7 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत, भारताच्या दोन्ही जोड्यांनी आपापले सामने सहज जिंकत मोठ्या दिमाखात पुढील फेरीत प्रवेश केला. ज्वाला गुत्ता आणि व्ही. दिजू यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन घडवत हेन्री गॅरेथ आंद्रे थिओदोर आणि क्रिस्टल कारजॉन या जमैकन जोडीचा 21-13, 21-8 असा धुव्वा उडवला. सनावे थॉमस आणि अपर्णा बालन यांनी नायजेरियाच्या फागेबेमी इबेनेझर ओलावूमा आणि ब्रेमाह हाजरा मारिया यांचा 21-10, 21-8 असा पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला. मात्र, रुपेश कुमार आणि अश्विनी पोनप्पा यांना विजयासाठी ऑस्ट्रेलियाच्या जोडीविरूद्ध झगडावे लागले. तब्बल 36 मिनिटे चाललेल्या या लढतीत त्यांनी वीरन राज आणि विथी वीरन यांच्यावर 21-16, 18-21, 21-18, 21-18 अशी मात केली.  

आगेकूच, अखिल पराभूत 

भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगला 75 किलो वजनी गटातील सामन्यात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी अवघे एक मिनिट लागले. मात्र अखिल कुमारला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. जय भगवान, मनोज कुमार आणि दिलबाग सिंग यांनी आपापले सामने जिंकत भारतासाठी पदक निश्चित केले आहे. तालकटोरा स्टेडियमवर चाहत्यांनी विजेंदरचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ते जागेवर बसत नाही तोच विजेंदरने नामिबियाच्या इलियस नाशिवेलाचा पराभव केला. त्याला आता पुढील फेरीत इंग्लंडच्या ब्रॅडले सॉँडर्सचा सामना करावा लागेल. अखिल कुमारला लुइस ज्युलीकडून 5-7 असे पराभूत व्हावे लागले. तत्पूर्वी, जय भगवानने नायजेरियाच्या वाहिद सोंगबामूचा 10-0 असा धुव्वा उडवला. दिलबागने बोत्सवानाच्या मोआबी मोथिबाचे आव्हान 11-3 असे परतवून लावले. मनोजने केनियाच्या ब्लॅकमोसेस मॅथेंगेला 6-2 असे हरवले. 

पाकिस्तानला हरवून भारत उपांत्य फेरीत 

ड्रॅगफ्लिकर संदीप सिंग आणि शिवेंद्र सिंग (प्रत्येकी दोन गोल) यांच्या बहारदार कामगिरीमुळे भारताने गटातील सामन्यात पाकिस्तानचा 7-4 असा धुव्वा उडवत पुरुष हॉकीत उपांत्य फेरीत धडक मारली. पदकांच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पहिल्या 20 मिनिटातच चार गोल नोंदवत भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले.  

भारत आणि पाकिस्तान या जुन्या प्रतिस्पर्धी संघांमध्ये होणारी ही लढत पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यांना भारतीय हॉकीपटूंनी निराश केले नाही. भारताने गटात ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरे स्थान पटकावले. आता गटात अव्वल स्थान पटकावणाऱ्या इंग्लंडशी भारताला उपांत्य फेरीत लढत द्यावी लागेल. दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होईल.

 संदीप सिंगने दुस-या आणि 11व्या मिनिटाला पेनल्टीकॉर्नरवर गोल करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शिवेंद्र सिंगने (19व्या आणि 59व्या मिनिटाला) दोन गोल नोंदवले. सरवनजीत सिंग (20व्या मिनिटाला), दनिश मुज्तबा (40व्या मिनिटाला), धरमवीर सिंग (46व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल लगावले.

पाकिस्तानतर्फे मुहंमद इम्रान (27व्या मिनिटाला), मुहंमद रिझवान (30व्या मिनिटाला) आणि इरफान मुहंमद (57व्या मिनिटाला) तसेच शकील अब्बासी (67व्या मिनिटाला) यांनी गोल नोंदवले. पाकिस्तानच्या कमकुवत बचावफळीचा फायदा उठवत भारताने अनेक वेळा हल्ले चढवले. त्यात भारताला ब-यापैकी यश आले. या सामन्याला कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी उपस्थित होते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट

Common Wealth 2010

Common Wealth 2010
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
2.00