राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिस-या स्थानावर
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील पदकसंख्येत इंग्लंडने भारतावर मात केल्यामुळे भारत पदकतक्त्यात तिस-या स्थानावर गेला आहे
नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील पदकसंख्येत इंग्लंडने भारतावर मात केल्यामुळे भारत पदकतक्त्यात तिस-या स्थानावर गेला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी भारताच्या खात्यामध्ये चार सुवर्णपदके जमा झाली असून भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या 36 झाली आहे. मात्र इंग्लंडने 37 सुवर्णपदके प्राप्त करून पदकतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे.
भारताने टेबलटेनिस क्रीडाप्रकारात प्रथमच सुवर्णपदक पटकावले असून ही किमया अचंता शरथ आणि सुभजीत सहा या जोडीने बुधवारी केली. भारताच्या खात्यात 36 सुवर्ण, 26 रजत आणि 33 कास्य पदक पटकावली असून एकूण पदकांची संख्या 95 झाली आहे. मात्र इंग्लंडने सुवर्णपदकांच्या संख्येत भारतासोबत बरोबरी केल्यामुळे एकंदर पदकसंख्येचा आधारे भारत राष्ट्रकुलच्या पदकतक्त्यात भारत तिस-या स्थानावर गेला आहे.
बॉक्सिंगमध्ये बुधवारी भारताला दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. 64 किलो वजनी गटामध्ये मनोज कुमारने तर 52 किलो वजनी गटामध्ये सुरंजय सिंग याने सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर परमजीत समोतानेही बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले.
भारतीय अथलीट राणी यादव उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी बुधवारी सांगितले.
डोपिंग चाचणीत दोषी आढळलेल्या राणी यादवने 'स्टेरॉईड नॅनड्रोलन' या औषधाचे सेवन केले होते. राणी यादवच्या नमुन्यात नॅन्ड्रोलोन या ऍनाबोलीक स्टेरॉईड सापडल्याची माहिती कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने दिली. राणीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून सुनावणीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत पदकं पटकावणा-या अकरा खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने बक्षिस जाहीर केले असून त्यांचा राज्य सरकारच्या सेवेत प्रथम दर्जाचे अधिकारी म्हणून समावेश करून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणा-या खेळाडूला 10 लाख रुपये, रजत पदक पटकावणा-या खेळाडूला 7.5 लाख रुपये तर कास्य पदक पटकावणा-या खेळाडूला 5 लाखांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा