PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राष्ट्रकुल समितीच्या कोषाध्यक्षांचा राजीनामा राष्ट्रकुल समितीच्या कोषाध्यक्षांचा राजीनामा ================================================================================ पीटीआय on 05 August, 2010 03:40:00 PM नवी दिल्ली- राष्ट्रकुल आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे. टेनिस मैदानामध्ये सिंथेटिक कोर्ट बसवण्याचे काम आपल्या मुलाच्या कंपनीला दिल्याच्या आरोपानंतर खन्ना यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीवर गेले काही दिवस भ्रष्टाचाराचे आरोप होते आहेत. आयोजन समितीच्या गुरुवारी होणा-या बैठकीच्या काही तास आधीच खन्ना यांनी राजीनामा दिला. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या आर के खन्ना टेनिस मैदानातील 14 सिंथेटिक कोर्ट बसवण्याचे काम खन्ना यांनी ऑस्ट्रेलियातील रिबाउंड एस कंपनीला दिले होते. या कंपनीच्या भारतातील शाखेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर खन्ना यांचा मुलगा आदित्य हा आहे. दरम्यान, काही भारतीय टेनिसपटूंनी टेनिस मैदानात बसवण्यात आलेले सिंथेटिक कोर्ट धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी हे सिंथेटिक कोर्ट नाकारले होते. या कोर्टमुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त असल्याचे टेनिसपटूंनी म्हटले आहे.