भारताची फलंदाजी ढेपाळली
भारताचा पहिला डाव अवघ्या 161 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर (नाबाद 104) व कोवान (नाबाद 40) यांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे.
पर्थ- भारताचा पहिला डाव अवघ्या 161 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डेवीड वॉर्नर (नाबाद 104) व ईद कोवान (नाबाद 40) यांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. वॉर्नरने घणाघाती फलंदाजी करत अवघ्या 69 धावांत शतक ठोकले असून पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 149 धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया फक्त 12 धावांनी पिछाडीवर आहे.
पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा बेन हिल्फानहाउस आणि पीटर सिडलने अचूक गोलंदाजी करत तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा पहिला डाव 161 धावात गुंडाळला आहे. बेनने चार तर पीटरने तीन गडी बाद केले. भारताचे आघाडीचे सर्व फलंदाज अपयशी ठरल्याने संघाची अत्यंत दयनीय अवस्था झाली. मात्र याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची पुरती पिसे काढली.
ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची पिसे काढली, त्याच खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज पार निष्प्रभ ठरले आहेत. भारतीय गोलंदाजांच्या नाकावर टिच्चून डेव्हीड वॉर्नर आणि एड कोवान जोडी तुफान फटकेबाजी केली.ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सपशेल शरणागती पत्करल्याने भारताचा पहिला डाव 163 धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर विरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर फलंदाजीसाठी मैदानात आले. हे सलामीवीर भारताला आश्वासक सुरुवात करून देतील अशी चाहत्यांना आशा होती. मात्र ही आशा सपेशल फोल ठरली. सामना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्येच प्रमुख चार फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघाची अवस्था अत्यंत दयणीय झाली.
सकाळच्या सत्रातील चौथ्याच षटकात बेन हिल्फेनहॉसच्या गोलंदाजीवर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणा-या चेंडूचा अंदाज सेहवागला न आल्याने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रिकी पॉन्टींगच्या हातात सोपा झेल देऊन तो परतला. भोपाळही न फोडू शकलेला सेहवाग बाद झाला तेव्हा भारताच्या खात्यात अवघ्या चार धावा जमा होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राहुल द्रविडलाही(9) सूर गवसला नाही आणि पीटर सीडलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. द्रविड बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी आला. सचिन आणि गंभीर मिळून भारताला आश्वासक अशी धावसंख्या उभारून देतील असे अपेक्षा होती. रायन हॅरीसने तेंडुलकरला पायचित बाद करत ही अपेक्षा सपशेल उधळून लावली. तेंडुलकर पाठोपाठ गौतम गंभीरही (31) तंबूत परतला. त्याला हिल्फेनहॉसने बाद केले.
व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि विराट कोहली यांनी संयत फलंदाजी करत संघाला शतकी टप्पा ओलांडून देत भारताचा डाव सावरला. हे दोघे मिळून मोठी धावसंख्या उभारतील असे वाटत असताना विराट कोहलीला (44) सीडलने बाद करत भारताचा पाचवा गडी बाद केला. लक्ष्मण आणि कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. कोहली पाठोपाठ लक्ष्मणलाही (31) सिडलने बाद केले. त्यावेळी भारताची धावसंख्या 138 होती. त्यानंतर भारताचा एकही फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. विनयकुमार (5), महेंद्रसिंह ढोणी (12), झहीर खान (2), इशांत शर्मा (3) असे ठराविक अंतराने बाद झाल्याने भारताचा पहिला डाव 161 धावांवर गुंडाळण्यात कांगारुंना यश आले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा