PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: दक्षिण आफ्रिकी ओपनः बोपण्णा-कुरेशी अजिंक्य दक्षिण आफ्रिकी ओपनः बोपण्णा-कुरेशी अजिंक्य ================================================================================ पीटीआय on 07 February, 2010 10:25:00 PM जोहान्सबर्ग- भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने त्याचा पाकिस्तानी साथीदार ऐसाम कुरेशी याच्या साथीने त्यांचे दक्षिण आफ्रिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले. रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा-कुरेशी जोडीने कॅरल बेक आणि हॅरोल्ड लेव्ही यांचा 2-6, 6-3, 10-5 असा पराभव केला. बिगरमानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीचे हे पहिलेच एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. बोपण्णाने यापूर्वी अमेरिकेच्या एरिक बुटोराकच्या साथीने लॉस एंजेलिस खुल्या स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. 2007 साली मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत, तर 2008 मध्ये न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत बोपण्णा-कुरेशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गेल्या वर्षभरात या दोघांनी तीन एटीपी चॅलेंजर विजेतेपदे मिळवली. मात्र एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याची या जोडीची ही पहिलीच वेळ आहे. . " एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाल्याने आम्हाला दोघांना खूप आनंद झाला आहे. 2009 हे वर्ष आम्हा दोघांसाठी खूप चांगले होते. मात्र एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाले नव्हते. ती कसर या वर्षाच्या सुरुवातीलाच भरून निघाली," असे बोपण्णा म्हणाला. दुहेरी विभागात लवकरच पहिल्या दहांत येण्याचा विश्वास कुरेशीने यावेळी व्यक्त केला.