पाकिस्तानी क्रिकेटला फिक्सिंगचा हादरा
लॉर्डस कसोटीत `स्पॉटफिक्सिंग'साठी पैसे घेतल्याप्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटपटूंची स्कॉटलंड यार्डकडून चौकशी चालू आहे.
लंडन/कराची- ऑस्ट्रेलिया दौ-यात मॅचफिक्सिंगच्या झालेल्या आरोपानंतर ‘स्पॉटफिक्सिंग’च्या आरोपांमुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा हादरले आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना नो-बॉल टाकण्यासाठी बुकींकडून पैसे मिळाल्याचा आरोप लंडनमधील‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ वृत्तपत्राने केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहंमद आसिफ, मोहंमद आमेर आणि अन्य चौघांना यासाठी दीड लाख पौंड देण्यात आले, असाही या वृत्तपत्राचा दावा आहे.
संपूर्ण सामना निश्चित करण्याऐवजी काहीच गोष्टी ठरवून करण्याला‘स्पॉटफिक्सिंग’ म्हटले जाते. त्यासाठी बुकींनी क्रिकेटपटूंशी संपर्क साधला होता. वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशनद्वारे हे प्रकरण उघड आणल्यानंतर स्कॉटलंड यार्ड गुप्त पोलिसांनी ड्रेसिंगरूममध्ये जाऊन सलमान बट, आसिफ, आमेर आणि कामरान अकमल यांची चौकशी केली. या प्रकरणी अटक झालेला बुकी मझर मजीदने क्रिकेटपटूंना पैसे दिल्याचा आरोपही वृत्तपत्राने केला आहे. मजीदचे भारतीय बुकींशी‘कनेक्शन’असल्याचे‘व्हिडीओ फुटेज’द्वारे उघड झाले आहे.
या प्रकरणी कुणालाही अटक केली जाणार नसून टी-20 आणि वन डे मालिका वेळापत्रकानुसार होईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. क्रिकेटपटूंच्या खोलीवर छापा घालून पोलिसांनी फोन, लॅपटॉप, पैसे तसेच अन्य सामग्री जप्त केल्याचा इन्कार पाकिस्तानचे संघ व्यवस्थापक यावर सईद यांनी केला असला तरी हॉटेलमधून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाल्याचे माहीतगारांनी सांगितले. ‘पोलिसांनी माझ्याशीही चर्चा केली. आम्ही सर्वतोपरी सहकार्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना हवी ती माहिती आम्ही देऊ,’ असे सईद म्हणाले.
संकटात सापडलेल्या पाकिस्तान संघाने लंडनमधील उच्चायुक्तांकडे मदतीचा हात पुढे केला आहे. आसिफ आणि आमेरने मजीदच्या सांगण्यावरून नो-बॉल टाकल्याचा आरोप वृत्तपत्राने केला आहे. सलमान बट हा स्पॉटफिक्सिंगचा‘रिंगमास्टर’होता, अशी कबुली मजीदने दिली आहे.‘पोलिसांनी काही क्रिकेटपटूंची चौकशी केली. मजीद हा पाकिस्तानच्या ब-याचशा क्रिकेटपटूंचा मित्र असून तो सध्या लंडनमध्ये स्थायिक आहे. इंग्लंड दौ-यादरम्यान तो सतत पाकिस्तानी क्रिकेटपटूंबरोबर असायचा,’ असेही माहीतगारांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंना इंटरेस्ट पैसा, बाई, खाबुगिरीत
‘स्पॉटफिक्सिंग’मुळे पाकिस्तान क्रिकेट हादरले असून क्रिकेटपटूंच्या अनेक बाबी चव्हाटय़ावर येत आहेत. पाकिस्तानातील अनेक क्रिकेटपटू पैसा, बाई आणि खवय्येगिरी करण्यात सराईत आहेत, असा दावा इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या‘स्पॉटफिक्सिंग’प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बुकीने केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूला नो-बॉल टाकण्यासाठी आपण लाच दिल्याचा खळबळजनक दावा मझर मजीद या बुकीने केला आहे. हे प्रकरण एका ब्रिटिश वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू फक्त पैसा मिळवण्याच्या पाठी असतात, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे.‘पाकिस्तान संघातील मोजके क्रिकेटपटू प्रामाणिक आहेत. क्रिकेटवर त्यांचे खरे प्रेम आहे. पण बरेचसे क्रिकेटपटू मौजमस्ती करण्यात अग्रेसर असतात. पैसा, बाई आणि खवय्येगिरी करण्यावर त्यांचा भर असतो,’ असे ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’या दैनिकाने जाहीर केलेल्या व्हिडियो टेपमध्ये मजीदने म्हटले आहे.
‘मॅचफिक्सिंग करताना त्यांना किती पैसे मिळतात, हा संशोधनाचा विषय आहे. मी फुटबॉल क्षेत्रातून आल्यामुळे फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये फिक्सिंग करताना मिळणा-या रकमेमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. क्रिकेटमध्ये फसवणूक करणे, हा मॅचफिक्सिंगचा प्रकार नाही. पाकिस्तान संघातील गोलंदाज नेहमीच चेंडू कुरतडण्यासारखे प्रकार करत असतात. हादेखील मॅचफिक्सिंगचा भाग आहे. पण त्यांच्यावर कधीही कारवाई होत नाही,’असा दावाही मजीदने केला आहे.
‘क्रिकेटपटूंना पाणी, कोल्ड्रिंक देण्यासाठी मी नेहमी खेळपट्टीवर जायचो. ज्यावेळी आम्हाला विकेट्स मिळायच्या नाहीत, त्यावेळी मी हातावर व्हॅसेलिन लावून जायचो. आणि क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करायचो. गोलंदाज चेंडूच्या एका बाजुला हातावरील व्हॅसेलिन लावायचे. त्यामुळे चेंडू स्विंग होण्यास त्यांना मदत मिळत असे. क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग सुरू ठेवण्यासाठी सलमान बटला दीर्घ काळ पाकिस्तानच्या कर्णधारपदी कायम ठेवावे,’ अशी इच्छा मजीदने व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘सामन्यात काय घडेल, याची माहिती मी सामन्याच्या आदल्या रात्री किंवा सकाळी क्रिकेटपटूंना द्यायचो. सलमान बट पुढील दोन वनडेत कर्णधारपदी राहावा, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा आम्हाला आमच्या मर्जीनुसार सामन्याचा निकाल लावता येणार नाही.’
‘दोषींवर आजीवन बंदी घालावी’
‘इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी ‘स्पॉटफिक्सिंग’ किंवा मॅचफिक्सिंग केल्याचे आरोप उघड झाल्यास, त्यांच्यावर आजीवन बंदी घालावी,’ अशी मागणी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू अॅलन लॅम्ब यांनी केली आहे.
‘या प्रकरणी क्रिकेटपटू दोषी आढळल्यास, त्यांना यापुढे क्रिकेट खेळण्याची परवानगी देऊ नये. मात्र त्यासाठी पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. क्रिकेट खेळ यापुढेही खेळला जाईल. पण क्रिकेटशी गद्दारी करणा-यांवर कठोर कारवाई व्हायला हवी,’ असेही त्यांनी सांगितले.
‘स्पॉटफिक्सिंग’प्रकरणामुळे इंग्लंडच्या मालिका विजयाकडे दुर्लक्ष झाले. ‘इंग्लंडने चौथ्या कसोटीत चांगला खेळ करत मोक्याच्या क्षणी भागीदा-या रचल्या. कसोटीवर स्पॉटफिक्सिंगचे सावट असले तरी इंग्लंडचे प्रयत्न प्रामाणिक होते,’ असेही त्यांनी सांगितले.
‘मी कर्णधारपद का सोडू?’
‘स्पॉटफिक्सिंग’मध्ये नाव गुंतले असले तरी सलमान बटने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास इन्कार केला आहे. स्पॉटफिक्सिंगमध्ये सात क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचे आरोप होत असून यात बट‘रिंगमास्टर’होता, असा दावा मझर मजीद या अटक करण्यात आलेल्या बुकीने केला आहे.
‘सध्या आमच्यावर फक्त आरोप होत आहेत. कुणी कुणाबद्दलही ताशेरे ओढू शकतो. पण त्यात कितपत तथ्य आहे, हे उघड व्हायला हवे. या मालिकेत आम्ही सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. पण अपेक्षित निकाल राखण्यात आम्हाला अपयश आले,’ असे बटने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पाकिस्तानचे संघ व्यवस्थापक यावर सईद उपस्थित होते. ते म्हणाले, ‘या आरोपांमुळे ड्रेसिंगरूममधील वातावरण दूषित झाले आहे. कसोटी मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावलेल्या मोहंमद आमेरचे यात नाव गोवल्यामुळे तो कमालीची निराश झाला आहे.’
झरदारींनी मागवला प्राथमिक अहवाल
‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल मागवला आहे.
‘लंडनच्या गुप्त पोलिसांनी उघडकीस आणलेल्या‘स्पॉटफिक्सिंग’प्रकरणानंतर झरदारी खूप निराश झाले असून एकूण प्रकरणाविषयीचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी पीसीबीचे अध्यक्ष बट यांना केल्या आहेत.’ असे झरदारींचे प्रवक्ते फरहातुल्लाह बाबर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर पुन्हा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर सामना निश्चितीचे आरोप झाल्यानंतर बोर्डाचे आश्रयदाते या नात्याने झरदारी नव्या पीसीबी अध्यक्षांची नियुक्ती करू शकतात. मात्र दोन वर्षापूर्वी नियुक्त केलेल्या बट यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे. पाकिस्तान सरकारनेही ‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी बट आयसीसी पदाधिका-यांशी लंडनमध्ये चर्चा करणार असल्याचे क्रीडामंत्री इजाझ हुसेन जाखरानी यांनी सांगितले. ‘स्पॉटफिक्सिंग’चे आरोप झालेल्या क्रिकेटपटूंना लंडन पोलिस ताब्यात घेऊ नयेत. तसेच त्यांना तातडीने मायदेशी पाठवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘स्पॉटफिक्सिंग’ अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करू. प्रसंगी प्रमुख दोषी क्रिकेटपटूंवर आजीवन बंदी घालू, असे जाखरानी यांनी म्हटले.
आयसीसीचे माजी अध्यक्ष चकित
आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने काही बंधने ठेवली असली तरी बुकी क्रिकेटपटूंना कसे भेटू शकतात, यामुळे आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मणी चकित झाले आहेत.‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर‘स्पॉटफिक्सिंग’चे आरोप होत आहेत. हे प्रकरण धक्कादायक असून यामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो,’ असे मणी यांनी‘जियो सुपर’वाहिनीला सांगितले.‘क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग कसे काय होऊ शकते? पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन आणि आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी पथक हातावर हात धरून बसले होते का? क्रिकेटपटू आणि बुकी यांच्यात चर्चा झाल्याचे एका दैनिकाने उघड केल्यानंतर आयसीसी त्यावर कसा काय विश्वास ठेवू शकते, यामुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. 1990चे दशक मॅचफिक्सिंगने गाजल्यामुळे क्रिकेटची प्रतीमा मलीन झाली होती. ती सुधारण्यासाठी बरीच वर्षे लोटली. आता पुन्हा पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे हात मॅचफिक्सिंगमध्ये रंगले आहेत, असे वृत्त ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटले. क्रिकेटसाठी हा दिवस वाईट आहे. हे सर्व चुकीचे असेल, अशी आशा आहे,’ असे मणी यांनी सांगितले.
लतिफने सात वर्षापूर्वीच इशारा दिला होता
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘स्पॉटफिक्सिंग’ घडवून आणण्याचा प्रयत्न बुकी करत आहेत, असा इशारा पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफने सात वर्षापूर्वीच एका पत्राद्वारे आयसीसीला दिला होता. मात्र यावर कारवाई होण्यापेक्षा आयसीसीला लेखी कळवल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मलाच धारेवर धरले, असे लतिफने सांगितले.
लंडन मेट्रोपोलिटन पोलिसांनी 35 वर्षीय बुकीला अटक केल्याचे आयसीसीने स्पष्ट केल्यामुळे सात वर्षानंतर लतिफने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंड दौ-यात पाकिस्तान संघातील कोणत्या क्रिकेटपटूंशी बुकी संपर्क साधू शकतात, यांची नावेही लतिफने पीसीबीला दिली होती.1990च्या दशकात झालेल्या मॅचफिक्सिंगमध्ये लतिफने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यावेळी लतिफने केलेल्या आरोपांची चौकशी करून पीसीबीने सलिम मलिकवर आजीवन बंदी घातली होती. तसेच अन्य पाच जणांना दंड ठोठावला होता.
‘क्रिकेटमधून भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी अधिका-यांकडून प्रयत्न होत नाहीत. 90च्या मॅचफिक्सिंग प्रकरणातील दोषींवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे असतानाही त्यांना सोडून देण्यात आले,’ असे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बसित अलीने सांगितले.
माजी क्रिकेटपटू आमीर सोहेल म्हणाला, ‘90च्या दशकात जे घडले, ते पुन्हा घडून आले आहे. अधिका-यांनी वेळीच कारवाई केली, तर असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. पीसीबीनेही क्रिकेटपटूंना पाठीशी घालू नये.’
‘स्पॉटफिक्सिंग’ने पाकिस्तान क्रिकेट हादरले
चौथ्या आणि अंतिम कसोटीवेळी झालेल्या‘स्पॉटफिक्सिंग’प्रकारानंतर पाकिस्तान क्रिकेट हादरले आहे. क्रिकेटपटूंवर केवळ आरोप झाले तरी पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. संबधित क्रिकेटपटूंना तात्काळ माघारी बोलावून कारवाईची मागणी माजी कसोटीपटूंनी केली आहे.
‘लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी केवळ बुकीला ताब्यात घेतले तरी त्याचा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंशी संबंध आल्याने पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान बोर्डाचे आश्रयदाते आसिफ झरदारी यांनी एकूण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित क्रिकेटपटू तसेच सपोर्ट स्टाफवर तातडीने कारवाई करावी,’ अशी मागणी पाकिस्तानचा माजी कर्णधार आमीर सोहेलने केली आहे. ‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरणाने धक्का बसल्याचे माजी कसोटीपटू इक्बाल कासिम यांनी म्हटले. ‘पाकिस्तानचे क्रिकेटपटू ‘स्पॉटफिक्सिंग’मध्ये गुंतल्याचे टीव्हीवर पाहिल्यानंतर माझा स्वत:वर विश्वास बसेना. हे सर्व खोटे ठरावे, असे मला वाटते. मात्र पाकिस्तान क्रिकेटसाठी ही लांछनास्पद बाब आहे,’ असे कासिम यांनी सांगितले.
‘स्पॉटफिक्सिंग’ प्रकरणाला पाकिस्तान बोर्ड आणि बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष एजाझ बट असल्याचा आरोप स्थायी समितीचे (स्पोर्ट्स) सदस्य हरून अख्तर आणि तारिक अझीम यांनी केला आहे. ‘गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंवर ‘मॅचफिक्सिंग’चे आरोप झाले. मात्र बोर्डाचे अध्यक्ष बट यांनी त्याविषयी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी विद्यमान क्रिकेट बोर्ड बरखास्त करावे,’ असे अख्तर आणि अझीम यांनी सांगितले. पाकिस्तानमधील क्रिकेटचाहत्यांनी ‘स्पॉटफिक्सिंग’बाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रिकेटपटूंविरोधात तीव्र निदर्शने केली.
टी-20 वर्ल्डकपमध्येही‘ते’बुकीच्या संपर्कात होते
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानचे काही क्रिकेटपटू बुकींच्या संपर्कात होते. वर्ल्डकपच्या काही सामन्यांमध्ये‘स्पॉटफिक्सिंग’करण्यासाठी काही क्रिकेटपटूंची बुकींसोबतच्या संभाषणाची (ऑडियो) टेप ब्रिटनच्या गुप्त पोलिसांना मिळाली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा बुकींशी संपर्क असल्याची कुणकुण वनडे आणि टी-20 कर्णधार शाहीद आफ्रिदीला लागली होती. मात्र त्याच्या सूचनेकडे संघव्यवस्थापनाने दुर्लक्ष केले.
बुकी मजीद मझरकडून लाच घेतल्याप्रकरणी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची चौकशी केल्यानंतर दूरध्वनीवरील संभाषणाची माहिती गुप्त पोलिसांना मिळाली. यातील आवाज पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा असल्याचे पाकिस्तान संघाच्या माहितगारांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौ-यात मझर आणि अझर मजीदपासून क्रिकेटपटूंना दूर ठेवावे, अशी सूचना वनडे कर्णधार शाहीद आफ्रिदीने पाकिस्तान संघव्यवस्थापनाला केल्याचेही त्यांनी यावेळी उघड केले. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या अटकेत असलेला अझर मजीद गेल्या टी-20 वर्ल्डकपवेळी वारंवार पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना संपर्क साधत होता. याची कुणकुण लागताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या निवासाचे हॉटेल तसेच ड्रेसिंगरूमच्या आसपास मजीद बंधूंना फिरकू देऊ नये, अशी सक्त ताकीद तत्कालीन कर्णधार आफ्रिदीने संघव्यवस्थापक यावर सईद आणि सहसंघव्यवस्थापक शफकत राणा यांना दिली होती. ‘मझर आणि अझर हे सलमान बट आणि कामरान अकमल यांच्या संपर्कात असल्याची शक्यता आफ्रिदीने संघ व्यवस्थापनाकडे व्यक्त केली होती. मात्र संघ व्यवस्थापनाने आफ्रिदीच्या सूचनेकडे लक्ष दिले नाही,’ असे माहितगारांनी सांगितले.
लॉर्ड्सवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मजीद बंधूंचा काही क्रिकेटपटूंसोबत संपर्क असल्यावरून आफ्रिदी अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला असावा, असेही माहितगारांना वाटते. बुकी मजीद बंधूंचा पाकिस्तान संघावर इतका प्रभाव होता की, कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर वनडे आणि टी-20 कर्णधारपदी आफ्रिदी नसावा, असे संघातील काही क्रिकेटपटूंना वाटत होते.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा