PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: संशयित क्रिकेटपटूंचा सराव थांबवला संशयित क्रिकेटपटूंचा सराव थांबवला ================================================================================ पीटीआय on 31 August, 2010 06:00:00 PM लंडन/इस्लामाबाद- स्पॉटफिक्सिंग प्रकरणातील संशयित पाकिस्तानी क्रिकेटपटूंना संघ व्यवस्थापनाने मंगळवारी सराव थांबवण्यास सांगितले. कर्णधार सलमान बट्ट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ या तिघांना टॉण्टन येथे चाललेला सराव थांबवून लंडनला स्कॉटलंड यार्डपुढे हजर होण्याची सूचना व्यवस्थापनाने केली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डस येथे झालेल्या कसोटीमध्ये नो बॉल टाकण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पैसे घेतल्याचा आरोप आहे. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी यापूर्वीही या तीन क्रिकेटपटूंची चौकशी केली असून आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. ब्रिटनमधील `न्यूज ऑफ दी वर्ल्ड' या टॅब्लॉइड नियतकालिकाने स्पॉटफिक्सिंगचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संबंधित बुकीला अटक झाली होती. संशयित क्रिकेटपटूंना सराव थांबवून लंडनला पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने दीर्घ बैठकीनंतर घेतला.