PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: डेव्हिस चषक- रशियाची भारतावर 2-0 आघाडी डेव्हिस चषक- रशियाची भारतावर 2-0 आघाडी ================================================================================ पीटीआय on 05 March, 2010 10:50:00 PM मॉस्को- भारतीय टेनिसपटू सोमदेव देवबर्मन आणि रोहन बोपण्णा यांच्या पराभवांमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात रशियाने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय टेनिस संघाने अथक परिश्रम घेऊन तब्बल 11 वर्षांनंतर जागतिक गटात मिळवलेले स्थान या पराभवांमुळे धोक्यात आले आहे. शुक्रवारी सलामीच्या लढतीत भारताच्या सोमदेव देवबर्मनला पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या आयगोर कुनित्सिनने सोमदेवचा 7-6(8) 6-7(4) 3-6 4-6 असा पराभव केला. त्यानंतर रोहन बोपण्णाचाही मिखाइल युझनीने 4-6 2-6 3-6 असा पराभव केला. डेव्हिस चषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला आता पुढील तीनही सामने जिंकणे आवश्यक आहे. शनिवारी होणा-या दुहेरी सामन्यात लिएंडर पेस आणि महेश भूपतीची गाठ तिमुराझ गबानशिवली जोडीशी पडेल. रविवारी सोमदेवचा सामना युझनीसोबत, तर बोपण्णाचा सामना कुनित्सिनसोबत होईल.