ऑस्ट्रेलियन ओपन-नाडालचा हासवर विजय
ऑस्ट्रेलियन ओपनचा तिसरा दिवसही सीडेड टेनिसपटूंच्या नावे राहिला. पुरुष एकेरीत दुसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडालने तिसरी फेरी गाठली तर महिला एकेरीतही सीडेड टेनिसपटूंनी आगेकूच केली. मात्र माजी फ्रेंच ओपन विजेती इटलीच्या फ्रँसिस्का शियावोनला बाहेरचा रस्ता धरावा लागला.
मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनचा तिसरा दिवसही सीडेड टेनिसपटूंच्या नावे राहिला. पुरुष एकेरीत दुसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडालने तिसरी फेरी गाठली. तिसरा सीडेड स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररला ‘बाय’ मिळाल्याने कोर्टवर न उतरताच त्याने दुस-या फेरीचा अडथळा पार केला. महिला एकेरीतही सीडेड टेनिसपटूंनी आगेकूच केली. मात्र माजी फ्रेंच ओपन विजेती इटलीच्या फ्रँसिस्का शियावोनला बाहेरचा रस्ता धरावा लागला.
जर्मनीच्या टॉमी हासवर 6-4, 6-3, 6-3 अशी मात करत नाडालने तिसरी फेरी गाठली. गेल्या दोन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्यास उत्सुक असलेल्या फेडररला पुढे चाल मिळाली. पाठीच्या दुखापतीमुळे जर्मनीच्या अँड्रियास बेकने माघार घेतली. तिसऱ्या फेरीत नाडालला स्लोव्हाकियाच्या लुकास लॅको आणि फेडररला क्रोएशियाच्या इव्हो कालरेविकशी दोन हात करावे लागतील. नाडाल, फेडररसह आठवा सीडेड अमेरिकेचा मार्डी फिश, 11 वा सीडेड अर्जेटिनाचा हुआन मार्टिन डेल पोट्रो, सातवा सीडेड चेक रिपब्लिकचा टोमास बर्डिचने सरळ सेट्समध्ये विजय मिळवत तिस-या फेरीत प्रवेश केला तरी दुस-या फेरीत बुधवारी सात लढती चुरशीच्या झाल्या. युक्रेनचा अलेक्झांड्र डोल्गोपोलोवला जर्मनीच्या टोबियास कॅम्केने पाच सेटमध्ये झुंजवले. 10 व्या सीडेड स्पेनच्या निकोलास अलमॅग्रोला बल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोवविरुद्ध 6-4, 3-6, 7-6(7/4), 4-6, 0-6 असा घाम गाळावा लागला. अर्जेटिनाच्या डेव्हिड नाल्बांडियनने अमेरिकेच्या 16 व्या सीडेड जॉन इस्नेरला सहजासहजी जिंकू दिले नाही.
महिला एकेरीत जवळपास सर्व लढती एकतर्फी झाल्या. अव्वल सीडेड डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने जॉर्जियाच्या अॅना टॅटिश्वलीवर अवघ्या 47 मिनिटांत 6-1, 7-6(7/4) अशी मात केली. तिसरी सीडेड चीनची ना लि, तिसरी सीडेड बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका, आठवी सीडेड पोलंडची अग्निस्झ्का रॅडवँस्कानेही तिसरी फेरी गाठली. आपल्याच देशाच्या रोमिना ऑपरँडीकडून 4-6, 3-6 असे पराभूत व्हावे लागल्याने 10 व्या सीडेड इटलीच्या शियावोनचे आव्हान मात्र दुस-या फेरीत संपुष्टात आले. सहाव्या सीडेड ऑस्ट्रेलियाच्या सामंथा स्टासूरनंतर शियावोनच्या रुपाने ‘टॉप टेन’मधील आणखी एका सीडेड टेनिसपटूला बाहेरचा रस्ता धरावा लागला.


Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा