PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: शिवेंद्र सिंग तीन सामन्यांसाठी निलंबित शिवेंद्र सिंग तीन सामन्यांसाठी निलंबित ================================================================================ पीटीआय on 01 March, 2010 04:15:00 PM नवी दिल्ली- हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणा-या शिवेंद्र सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. रविवारच्या सामन्यात पाकिस्तानी हॉकीपटूला जाणूनबुजून हॉकीस्टिक मारल्याप्रकरणी शिवेंद्रवर बंदी घालण्यात आली आहे. शिवेंद्रने पाकिस्तानी हॉकीपटूच्या डोळ्याला जाणीवपूर्वक हॉकीस्टिक मारल्याचे दिसून आल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे प्रवक्ते अर्जन मीजर यांनी सांगितले. निलंबनाच्या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा अधिकार भारताला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवेंद्रच्या निलंबनाविरोधात भारताने अगोदरच अपिल केले असल्याचे हॉकी इंडियाच्या अधिका-यांनी सांगितले. भारताच्या आघाडीच्या फळीतील हॉकीपटू शिवेंद्र सध्या चांगलाच फॉर्मात असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पहिला गोल त्यानेच केला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4-1 असा विजय मिळवला होता.