PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: माजिदकडून पैसे घेतल्याची क्रिकेटपटूंची कबुली? माजिदकडून पैसे घेतल्याची क्रिकेटपटूंची कबुली? ================================================================================ पीटीआय on 05 September, 2010 11:12:00 AM लंडन : सलमान बटच्या रूममध्ये मिळालेली रक्कम बुकी मझर माजिदकडून घेतल्याची कबुली पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंनी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसमोर दिल्याचे पाकिस्तानचे कायदेशीर सल्लागार तफझ्झुव रिझवी यांनी ‘जियो टीव्ही’ला सांगितले. मात्र ही रक्कम विविध कंपन्यांजवळ केलेल्या स्पॉन्सरशिपबद्दलची होती. तसेच कुठलेही गैरकृत्य केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘‘माजिद हा कंपन्यांसोबतच्या कराराविषयी एजंटचे काम करत होता. तो बुकी आहे, हे आम्हाला ठाउक नव्हते. हे पैसे घेण्यामागे आमचा कुठलाही वाईट उद्देश नव्हता, असे सलमान बट, मोहंमद आमिर आणि मोहंमद आसिफने सांगितल्याचे,’’ रिझवी यांनी म्हटले. माजिदकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याचा इन्कार तिन्ही क्रिकेटपटूंनी यावेळी केला. आपण क्रिकेटपटूंचा बचाव करत नसून चौकशी प्रक्रियेतून पुढे आलेली माहिती सर्वासमोर उघड करत आहोत, असे रिझवी यांनी सांगितले. अँटी करप्शन युनिटने घातलेल्या धाडीत बटच्या रूममध्ये 50 हजार पौंड मिळाले होते. प्रत्येक कंपनीसोबतचा लिखित करार यावेळी तिन्ही क्रिकेटपटूंनी पोलिसांना दाखवला. क्रिकेटपटू त्यांचा एजंट स्वत: निवडतात. त्यात बोर्डाचा काहीच हस्तक्षेप नसता. बहिणीच्या लग्नासाठी सलमान बटने माजिदकडून पैसे घेतले नव्हते, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले. *पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंची केवळ चौकशी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर या तिघा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची शनिवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी करून सुटका केली. ‘‘मेट्रॉपोलिटन पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर आमिर, आसिफ आणि बट शनिवारी किलबर्न पोलिस स्थानकात दाखल झाले. तिथे त्यांना स्पॉट फिक्सिंग विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. तिघांनाही कुठल्याही प्रकारची अटक झाली नाही. त्यांची सुटका करतानाही पोलिसांनी कुठली अटही घातलेली नाही,’’ असे क्रिकेटपटूंच्या वकील इलिझाबेथ रॉबर्टसन यांनी सांगितले. आयसीसी अँटी करप्शन युनिट तसेच पोलिसांना आवश्यकता भासल्यास सर्वतोपरी मदतीचे आश्वासन पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंनी तसेच पाकिस्तान बोर्डाने दिल्याचे रॉबर्टसन यांनी म्हटले. गेल्या आठवडय़ात झालेल्या लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आमिर, आसिफ आणि बटवर ठेवण्यात आला. आयसीसीने याची गंभीर दखल घेताना तिघांवर बंदी घातली. *‘आयसीसीवर कायदेशीर कारवाई करू’ स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून बंदी घालण्यात आलेले तिन्ही क्रिकेटपटू निर्दोष आढळल्यास आयसीसीवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी पाकिस्तान बोर्डाने दिली आहे. ‘‘स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर बंदी घालताना तसेच एकूण प्रकरण हाताळताना त्यांच्याच अनेक नियमांना बगल दिली आहे. आयसीसी आणि त्यांच्या अँटी करप्शन युनिटच्या झालेल्या बैठकीत संबंधित क्रिकेटपटूंविषयी ठोस पुरावे आहेत का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंवरील बंदीमागील कारण आम्हाला समजायला हवे. त्यामुळे आमिर, आसिफ आणि बट निर्दोष ठरल्यास आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार पाकिस्तान बोर्ड (पीसीबी) करत आहे,’’ असे पीसीबीचे सिनियर कायदेशीर सल्लागार तालिब रिझवी यांनी सांगितले. सध्या तिन्ही क्रिकेटपटूंची सुरू असलेली चौकशी म्हणजे ‘क्रिमिनल’ चौकशी नसून प्राथमिक चौकशी असल्याचे त्यांनी म्हटले. ‘‘बट, आमिर आणि बटची सुरू असलेली चौकशी प्राथमिक चौकशी आहे. त्यांना केवळ चौकशीसाठी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी बोलावले. *आयसीसीने केला बचाव ‘स्पॉटफिक्सिंग’च्या आरोपानंतर पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यामागे पाकिस्तानविरुद्ध कुठलेही षडयंत्र नाही, अशा शब्दांत आयसीसीने स्वत:चा बचाव केला. ‘‘तिन्ही क्रिकेटपटूंवर नियम-२ अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व साक्षी घेतल्या जातील आणि पुरावे तपासले जातील. त्यामुळे बंदीमागे कुठलेही षडयंत्र असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपात तथ्य नसल्याचे,’’ आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटनचे प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी सांगितले.