PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आयपीएलवर एमसीएचा बहिष्कार आयपीएलवर एमसीएचा बहिष्कार ================================================================================ पीटीआय on 12 March, 2010 12:55:00 PM मुंबई- इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या शुक्रवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होणा-या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती असोसिएशनचे चिटणीस लालचंद राजपूत यांनी दिली. आयपीएलच्या तिस-या सत्राला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमधील काही सामने मुंबईतील ब्रेबॉर्न तसेच नेरुळ येथील डी.वाय.पाटील मैदानावर होणार आहेत. मात्र या स्पर्धेची तिकीटे मुंबई क्रिकेट असोसिएशनला गुरुवार संध्याकाळपर्यंत मिळालेली नव्हती. त्यामुळे ललित मोदी यांच्या कारभारावर नाराज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर आणि संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्या असल्याचे राजपूत यांनी सांगितले. या प्रकाराबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितल्यावर त्यांनी ही नाराजी व्यक्त करत आपणही या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. पवार यांच्या या निर्णयामुळे मुंबई असोसिएशनचे कुणीही पदाधिकारी शुक्रवारी होणा-या सोहळ्यासाठी आणि त्यानंतर होणा-या सामन्यांना उपस्थित राहणार नसल्याचे राजपूत यांनी सांगितले.