राजस्थानने रणजी चषक पटकावला
तामिळनाडूवर पहिल्या डावात मिळवलेली आघाडी कायम ठेवत राजस्थान क्रिकेट संघाने सलग दुस-यांदा रणजी चषक पटकावण्याची किमया साधली.
चेन्नई- तामिळनाडूवर पहिल्या डावात मिळवलेली आघाडी पाचव्या दिवशीही कायम ठेवत राजस्थान क्रिकेट संघाने सलग दुस-यांदा रणजी चषक पटकावण्याची किमया साधली आहे. विजेत्या राजस्थान संघाला दोन कोटी रुपये तर उपविजेत्या तामिळनाडूला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. राजस्थानचा कर्णधार ऋषीकेश कानिटकरच्या नेतृत्वाखालीच राजस्थानने सलग दोन वेळा चषक पटकावला.
चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानने पहिल्या डावात तामिळनाडूवर 329 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. यानंतर सोमवारी तामिळनाडूला फॉलोऑन न देता राजस्थानने फलंदाजी करुन दुस-या डाव 204 धावांवर घोषित केला. राजस्थानच्या या विशाल धावांसमोर तामिळनाडूला सोमवारी काही औपचारीक षटके खेळणे बंधनकारक होते. अवघ्या 13 षटकांच्या झालेल्या खेळात तामिळनाडूच्या दोन बाद आठ धावा केल्या.
यानंतर दोन्ही कर्णधारांनी मिळून सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राजस्थानने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी करंडकावर आपले नाव कोरले. राजस्थानकडून पहिल्या डावात 257 धावांची खेळी करणा-या विनित सक्सेनाला सामनावीर घोषित करण्यात आले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा