आफ्रिकेचा मोठा विजय
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेत श्रीलंकेचा अवघ्या 43 धावांत धुव्वा उडवत आफ्रिकेने 258 धावांनी मोठा विजय मिळवला.
पार्ल- दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात आफ्रिकेने श्रीलंकेचा अवघ्या 43 धावांत धुव्वा उडवत 258 धावांनी मोठा विजय मिळवला. आफ्रिकेच्या 302 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20.1 षटकांत फक्त 43 धावांत धावांत आटोपला. पाहुण्यांच्या चार फलंदाजांना खातेही खोलता आले नाही, तर सहा फलंदाजांना धावसंख्येचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आफ्रिकेकडून भेदक गोलंदाजी करत चार फलंदाज तंबूत धाडणा-या मोर्नी मॉर्कलला सामनावीराचा किताब देण्यात आला .
दक्षिण आफ्रिकेचा वनडे कारकिर्दीतील हा तिसरा मोठा विजय आहे, तर श्रीलंकेची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या असून वनडेमधील चौथी सर्वात कमी धावसंख्या आहे. एप्रिल 2004 मध्ये श्रीलंकेने झिंबॉब्वेचा 35 धावांवर खुर्दा उडवला होता. ही वनडेमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. तर न्यूझीलंडने आयरलँडवर 290 धावांनी मिळवलेला विजय हा वनडे मधील सर्वात मोठा विजय आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर हशिम आमलाचे (112) दमदार शतक व अष्टपैलू जॅक कॅलिस (72) आणि एबी डिव्हीलियर्स (52) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारीत 50 षटकांत आठ बाद 301 धावा केल्या. कॅलिस व आमला यांनी दमदार फलंदाजी केली. ही जोडी फुटल्यानंतर मग डीव्हीलियर्सने खेळाची सूत्रे हाती घेऊन श्रीलंकन गोलंदाजांची पीसे काढली.
श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने पाच तर नुवान कुलशेखरा व अंजता मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यास आलेल्या श्रीलंकेची सुरुवातच अडखळत झाली. सलामीवीर उपुल थरंगा व स्फोटक फलंदाज दिलशान दोघेही भोपळाही न फोडता माघारी परतले. यानंतर कर्णधार कुमार संघकाराही अवघ्या चार धावां काढून परतला. यानंतर मात्र श्रीलंकेचा संघ सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलाच नाही. पुढचे सर्व फलंदाज फक्त मैदानात हजेरी लावून परतत होते. एक वेळ श्रीलंकेचा सहा बाद 13 अशी बीकट स्थिती झाली होती. मात्र कोसाला कुलसेकरा (19) या एकट्या फलंदाजाने दुहेरी आकडा गाठत संघाला अर्धशतकाजवळ नेले. मात्र आफ्रिकेच्या भेदक मा-यासमोर लंकन फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले अन लंकेची स्थिती सर्वबाद 43 अशी करत आफ्रिकेने मोठा विजय मिळवला.
आफ्रिकेकडून मॉर्कलने चार तर त्सोत्सोबेने तीन विकेट घेतल्या.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा