PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विश्वविक्रमासह दुलीप करंडक पश्चिम विभागाकडे विश्वविक्रमासह दुलीप करंडक पश्चिम विभागाकडे ================================================================================ पीटीआय on 06 February, 2010 05:50:00 PM हैदराबाद- युसूफ पठाणच्या द्विशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जागतिक विक्रमासह दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर तीन गडी राखून विजेतेपद पटकावले. दक्षिण विभागाने पहिल्या डावात ४०० धावा केल्या होत्या. मात्र पश्चिम विभागाचा पहिला डाव २५१ धावांतच संपुष्ठात आला होता. त्यानंतर दक्षिण विभागाने दुसरा डाव ३८६ धावांवर घोषीत केला. विजयासाठी ५३६ धावांचे आव्हान पश्चिम विभागाने सात गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. पश्चिम विभागाच्या या विश्वविक्रमी विजयाचा शिल्पकार ठरला अष्ठपैलू खेळाडू युसूफ पठाण. पठाणने नाबाद २१० धावांच्या जोरावर पश्चिम विभागाने अंतिम दिवशी दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची पश्चिम विभागाची ही १६वी वेळ आहे. याआधी १९३८-३९ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुस-या डावात इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६५४ धावा केल्या होत्या. तर १९४८-४९ साली मुंबई संघाविरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या संघाने दुस-या डावात ६०४ धावा केल्या होत्या. मात्र हे दोन्ही सामन्यांचा निकाल लागला नव्हता.