PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: चौकशीसाठी आयसीसीची स्वतंत्र समिती चौकशीसाठी आयसीसीची स्वतंत्र समिती ================================================================================ पीटीआय on 05 September, 2010 05:40:00 PM न्यूयॉर्क- ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणी नव्हे तर आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांच्या चौकशीसाठी आयसीसी स्वतंत्र समिती नियुक्त करणार असून समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. तत्पूर्वी, आरोप असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना समितीसमोर त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल, असे आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले. ‘‘आयसीसीने ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणी कुठल्याही क्रिकेटपटूवर बंदी घातलेली नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांतर्गत संशयित क्रिकेटपटूंची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आयसीसीने तिन्ही क्रिकेटपटूंना नोटिस पाठवली आहे. मात्र ही नोटिस म्हणजे बंदी नव्हे. या नोटिशीने ‘त्या’ प्रत्येक क्रिकेटपटूला त्याची बाजू मांडण्याची संधी आहे. संबंधित क्रिकेटपटू दोषी नसतील तर त्यांनी तसे सिद्ध करावे,’’ असे पवार यांनी सांगितले. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर घातलेल्या बंदीविषयी पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाजिद शमसुल हसन यांनी ‘आयसीसीचा निर्णय हे पाकिस्तानविरुद्धचे कट कारस्थान’ असल्याचा आरोप करत आयसीसी अध्यक्ष पवार यांना ‘लक्ष्य’ केले होते. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमातील कलम-5 नुसार अँटी करप्शन ट्रायब्युनलच्या स्वतंत्र समितीसमोर सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिरला आपली बाजू मांडता येणार आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू बुकीच्या संपर्कात लंडन : आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी पथक श्रीलंकेच्या एका सिनियर क्रिकेटपटूंवर करडी नजर ठेऊन आहे. या क्रिकेटपटूचे बुकींशी संबंध वाढत असल्याची तक्रार त्याच्याच अन्य सहका-यांनी कर्णधार कुमार संगकाराकडे केली. त्यानंतर संगकाराने संघ व्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब आणून दिली आहे. श्रीलंका पोलिसांनी चौकशी केली असली तरी ‘त्या’ क्रिकेटपटूवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे ‘द गार्डियन’ दैनिकाने म्हटले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या आचारसंहितेनुसार भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिका-यांना ‘त्या’ क्रिकेटपटूविषयी माहिती पुरवली आहे. दरम्यान, श्रीलंका बोर्डाने एकूण प्रकरणी कुठलेही भाष्य केलेले नाही. 2009मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपपासून भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिका-यांची ‘त्या’ क्रिकेटपटूंवर नजर आहे.