पहिले पान | क्रीडाजगत | स्पॉटफिक्सर संघाबाहेर

स्पॉटफिक्सर संघाबाहेर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

स्पॉटफिक्सिंग प्रकरणी वादाच्या भोव-यात सापडलेले पाकिस्तानच्या तिघा क्रिकेटपटूंना इंग्लंडविरुद्ध होणा-या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे.

लंडन/कराची- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) तसेच आयसीसीकडून वाढू लागलेल्या दबावामुळे अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले. स्पॉटफिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर या क्रिकेटपटूंना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र त्यांचा मानसिक छळ होऊ नये, यासाठी आम्ही त्यांना बसवले आहे, असे सांगत पाकिस्तान त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. या प्रकरणातून आरोपमुक्त ठरवण्यासाठी पाकिस्तानने क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला आहे.

 

फिक्सरक्रिकेटपटूंसह खेळणार नाही, अशी भूमिका इंग्लिश क्रिकेटपटूंनी घेतल्यामुळे, आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि ईसीबी यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर क्रिकेटपटूंना वगळण्याचे नाट्य घडून आले. या तिन्ही क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे लंडनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांची भेट घेतल्यानंतर संघ व्यवस्थापक यावर सईद यांनी या तिघांना दोन टी-20 आणि पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतून वगळल्याची घोषणा केली. मात्र काही तासानंतरच त्यांना संघातून बसवण्यात आले आहे, वगळले नाही, असे उच्चायुक्तांनी स्पष्ट केले.

 

या तिघांची स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी गुरुवारी पुन्हा चौकशी केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना लंडनमध्येच राहण्याचे समन्स पोलिसांनी बजावले आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत हे तिन्ही क्रिकेटपटू निष्पाप आहेत, असे सांगत पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी त्यांची पाठराखण केली आहे. क्रिकेटपटूंना पोलिसांनी अटक केली आहे, या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला. ‘‘चौकशीसाठी हे तिघेही अद्याप लंडनमध्येच आहेत. या क्रिकेटपटूंचे पासपोर्टही सईद यांच्याकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जे घडतेय, त्यामुळे हे तिघेही वैतागले आहेत. स्पॉटफिक्सिंगच्या आरोपांमुळे व्यथित झालेले हे क्रिकेटपटू पूर्ण जोशाने कोणत्याही सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी आपला विचार करू नये, अशी विनंती त्यांनी पीसीबीला केली होती,’’ असे हसन यांनी सांगितले.

 

ते म्हणाले, ‘‘तिन्ही क्रिकेटपटूंचे मनोधैर्य खचले आहे. पण ते कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. आपण निष्पाप आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आमिरसारख्या युवा क्रिकेटपटूची कारकीर्द आता सुरू झाली आहे. त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. आपल्यावर गंभीर आरोप लावण्यात आले असले तरी न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. इम्रान खान आणि इयन बॉथम यांच्यात काय घडले, हे तुम्हालाही माहित आहे. इम्रान खान यांनी खटला जिंकल्यामुळे आपण काहीही चुकीचे केले नाही, हे त्यांना सिद्ध करता आले.’’

 

दरम्यान, क्रिकेटपटूंना वगळण्याच्या पीसीबीच्या निर्णयाचे ईसीबीचे अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांनी स्वागत केले आहे. ‘‘आता वनडे मालिका खिलाडीवृत्तीने खेळली जाईल, अशी आशा आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

अद्याप आरोप सिद्ध झाले नाहीत 

नवी दिल्ली- ‘‘स्पॉटफिक्सिंगप्रकरणी फक्त पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे त्यांना दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. आरोपांची चौकशी सुरू आहे. अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही,’’ असे मत भारताचा माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनने व्यक्त केले.

‘‘क्रिकेटपटूना शिक्षा सुनावण्याबाबत कुणी काहीही बोलत आहे. पण क्रिकेटपटूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला घ्यावा लागेल. संपूर्ण फिक्सिंग प्रकरणात एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला दोष देणे चुकीचे ठरेल. बुकींनी आपल्याला संपर्क साधल्याचे बरेच क्रिकेटपटू आता सांगत आहेत. त्यांनी त्याच वेळी हे उघड करायला हवे होते. कारण त्याच वेळी योग्य ती पावले उचलता आली असती,’’ असेही अझरने सांगितले. मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे बीसीसीआयने अझरुद्दीनवर आजीवन बंदी घातली होती.

सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर या पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंवर स्पॉटफिक्सिंगचे आरोप होऊ लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी गेल्या वर्षी आपल्याला बुकींनी संपर्क साधल्याचे जाहीर केले आहे. 

वनडेत खेळू शकतात 

कराची : पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक यावर सईद यांनी मोहंमद आसिफ, मोहंमद आमिर आणि सलमान बट यांना उर्वरित इंग्लंड दौ-यातून संघाबाहेर ठेवण्याची घोषणा केली असली तरी हे क्रिकेटपटू वनडे मालिकेत खेळू शकतात, असे मत पाकिस्तानचे क्रीडामंत्री एजाझ जाखरानी यांनी व्यक्त केले.

 

जाखरानी म्हणाले, ‘‘क्रिकेटपटूंना वगळण्यात आले नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीची उपलब्ध नाहीत. हे तिन्ही क्रिकेटपटू स्कॉटलंड यार्ड पोलिसांना चौकशीत मदत करण्यासाठी लंडनमध्येच राहतील. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्यामुळे ते खेळू शकणार नाहीत. सामने होणाऱ्या ठिकाणापासून ते दूर असल्यामुळे टी-20 सामन्यात खेळू शकणार नाहीत. पण वनडे मालिकेसाठी ते संघात परतण्याची शक्यता आहे.’’

‘‘स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी क्रिकेटपटूंवरील स्पॉटफिक्सिंगचे आरोप सिद्ध केल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हीच पाकिस्तान सरकारची भूमिका असेल. पोलिसांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. त्यानंतरच कारवाईची दिशा ठरवण्यात येईल. स्पॉटफिक्सिंगमध्ये क्रिकेटपटूंचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत,’’ असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

आसिफच्या कारनाम्यांचे पुरावे वीणाने सुपूर्द केले

 

लाहोर- पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहंमद आसिफचे भारतीय बुकींशी संबंध असल्याचे पुरावे त्याची पूर्वीची गलफ्रेंड वीणा मलिकने गुरुवारी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिका-यांकडे सुपूर्द केले.

आसिफ मॅचफिक्सिंगमध्ये आकंठ बुडाला असून त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा वीणा मलिकने केल्यानंतर आयसीसीचे दक्षिण आफ्रिकेतील भ्रष्टाचार विरोधी पथकाचे मुख्य अधिकारी हसन रझा यांनी बुधवारी संध्याकाळी वीणाची भेट घेतली. ‘‘बुकींशी संभाषण झाल्याचे रेकॉर्डिग तसेच या संदर्भातली अन्य माहिती मी आयसीसीच्या अधिका-यांकडे सुपूर्द केली आहे. पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि अधिका-यांचे हात मॅचफिक्सिंगमध्ये रंगले असून ऑस्ट्रेलियन दौ-यावर जाताना मला त्याचा अनुभव आला. बॅँकॉक येथे एका भारतीय बुकीने खराब कामगिरी करण्यासाठी आसिफला 40 हजार अमेरिकन डॉलरची ऑफर दिली. मात्र आसिफने त्या बुकीकडून दोन लाख डॉलर मागितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे याबाबतचे पुरावे आहेत. पण आसिफविरोधात त्यांनी कारवाई केली नाही,’’ असे वीणा मलिकने सांगितले. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0