PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: श्रीलंकेला तिरंगी क्रिकेट स्पर्धेचे जेतपद श्रीलंकेला तिरंगी क्रिकेट स्पर्धेचे जेतपद ================================================================================ पीटीआय on 28 August, 2010 10:45:00 PM डांबुला- भारताविरुद्धची मायदेशातील चार‘फायनल’पराभवांची मालिका श्रीलंकेने शनिवारी रणगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संपुष्टात आणली. भारताला 74 धावांनी हरवून यजमानांनी तिरंगी मालिकेचे जेतेपद पटकावले. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचे (110) झंझावाती शतक श्रीलंकेच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. 300 धावांचे विजयी ‘लक्ष्य’ पार करताना भारताचा डाव 46.5 षटकांत 225 धावांत संपला. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने (67) एकाकी लढत दिली. मात्र डळमळीत सुरुवात आणि मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात आलेले अपयश भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. फॉर्मात असलेला सलामीवीर वीरेंदर सेहवाग (28) धावचीत झाल्याने सामना एकतर्फी होणार, हे निश्चित झाले. तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील भारतापुढे विजयासाठी श्रीलंकाने 300 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावफलकावर भारताच्या नऊ धावा असताना सलामीवीर दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. त्यानंतर भरवशाचा फलंदाज असलेला वीरेंदर सेहेवाग, युवराज सिंग (26) आणि विराट कोहली (37) लवकर बाद झाले. त्यानंतर आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्नात केला पण त्याला कोणत्याही फलंदाजांची साथ लाभली नाही. 46.5 व्या षटकामध्ये 225 धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले. श्रीलंकेच्यावतीने थिसारा परेरा आणि सुरज रणदीव यांनी प्रत्येकी तीन तर लसिथ मलिंगाने दोन तर अँजेलो मॅथ्यूज याने एक गडी बाद केला. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकत श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारीत 50 षटकांत आठ बाद 299 धावांची मजल मारत भारतापुढे विजयासाठी 300 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेचा महेला जयवर्धने याने एकदिवसीय सामन्यांमधील आपला नऊ हजार धावांचा टप्पा पार केला. तर तिलकरत्ने दिलशानने (110) एकदिवसीय सामन्यातील आठवे शतक झळकावले. भारतातर्फे इशांत शर्मा आणि मुनाफ पटेल यांनी दोन तर युवराज सिंग, प्रवीणकुमार सिंग आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.