अभिनंदन!आभार!!
ढोणीची खेळी आज भारताला कप जिंकून देऊन गेली. आपण सगळी स्पर्धा ढोणीच्या कुशल कप्तानी डावपेचांनी जिंकलो. ज्याला माणूस म्हणून भावना आहेत त्याला आजचा दिवस बरेच दिवस स्मरणात राहील.
25 जून 1983 आणि 2 एप्रिल 2011. दोन्ही दिवशी शनिवार! आपण आज दुस-यांदा वर्ल्डकप जिंकलो. त्यानंतर जी काही आतषबाजी झाली ती कदाचित 15 ऑगस्ट 1947 सारखीच असावी. महिनाभर चाललेल्या लढाईत आपण शेवटी बाजी मारली वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या सगळ्यांना धूळ चारून आपण विजेते ठरलो. सचिन तेंडुलकरसाठी सगळ्यांनी जिवाची बाजी लावून कप भारतात आणला. ढोणीने षटकार मारून त्यावर शिक्कामोर्तब केलं. सगळ्यांना लाख लाख धन्यवाद!
आजच्या श्रीलंकेच्या डावातली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी 250 धावा कधी केल्या ते कळलंच नाही. जयवर्धने 25,50,75 धावांचे टप्पे कधी ओलांडत गेला त्याचा जराही वास आला नाही. सुरुवात अत्यंत धीमी झाली. अंतिम फेरीचा तणाव याशिवाय दुसरा शब्द त्याला नाही. आख्ख्या स्पर्धेत एक शंभर वगळता जयवर्धने फार चमकला नव्हता. जणू त्याने आजच्या दिवसासाठी आपली खेळी राखून ठेवली होती. आज मांजरासारखा तो खेळला. चलाख, सावध आणि चपळ! श्रीशांत आजही मागच्या पानावरून पुढे चालू असा होता. त्याचा वेग आणि त्याची आक्रमकता बघता त्याला समोरून तितकीच साथ पाहिजे. पण झहीर बिचारा धावा अडवू की बळी घेऊ? या संभ्रमात दिसला. समोरून मुनाफ पटेल! मुनाफ हा खरं तर त्याच्या धर्मात बाबा वगरे जो काही शब्द असेल तो व्हायला पाहिजे होता. त्याच्या चेह-यावर खेद ना खंत. तरी त्याने शेवटची षटकं वगळता बरी गोलंदाजी केली. आज आपलं क्षेत्ररक्षण चांगलं झालं. हे सगळं 45 षटकं होईपर्यंत ठीक चाललं होतं. पण शेवटच्या पाच षटकांनी सगळ्यांच्या तोंडाची चव घालवली. जयवर्धनेच्या फलंदाजीबद्दल काय बोलायचं? कसोटी संघात कायम स्थान मिळवून असलेला आणि तशीच फलंदाजी करणारा एखादा फलंदाज एकदिवसीय सामन्यात असावा, असं मी मागच्या एका लेखात म्हटलं होतं. त्याचा अर्थ आज जयवर्धनेच्या खेळीने दाखवून दिला. कसलाही ताण-तणाव न घेता तो आपल्या पद्धतीने फलंदाजी करत राहिला. आपण एकदम योग्य गोलंदाजी करत आहोत, असा भ्रम गोलंदाजात निर्माण होईपर्यंत त्याने वाट बघितली आणि अचानक गियर बदलला. 54 चेंडूत 53, मग 79 चेंडूत 79वरून तो थेट 83 चेंडूत 102 वर पोहोचला. त्याची खेळी कशी वाटली सांगू? त्याने गोलंदाजाना तुडवलं आणि ते गारद झाल्यावर तो त्यांच्यासमोर आला तेव्हा त्यांना वाटलं की, हा आपल्याला वर उठायला मदत करतो आहे. असो! पण दिलशान आणि तरंगा आणि संगकारा लवकर बाद झाल्यावर श्रीलंका 245 ते 50 करतील आणि तेही कसेबसे, असं वाटलं, पण त्यांनी 275चं लक्ष्य समोर ठेवलं. आताचा आपला जोश बघता 274 अवघड नव्हत्या.आपल्या डावाला सुरुवात झाली आणि दुस-याच चेंडूवर सेहवाग बाद झाला! अत्यंत सुंदर चेंडू! पण मलिंगा नेहमी असेच चेंडू टाकतो. पण सेहवाग बहुदा ‘शेवटी दादा कोण आहे मीच ना!’ या भावनेत त्याला सुरुवातीलाच बडवायला गेला आधीच्या दोन सामन्यात हे डावपेच त्याने टेट, ली आणि उमर गुलच्या बाबतीत वापरले. ते यशस्वी ठरले होते. लेकीन ऐसा भी होता है! आणि सचिनने काही फटके उत्तम मारले, पण अचानक अपघात व्हावा तसा त्याने बाहेरच्या चेंडूवर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला आणि आपला दुसरा फलंदाज बाद. त्यानंतर गंभीर आणि कोहलीने धावफलक हलता राहील, याची काळजी घेतली. का कुणास ठाऊक, पण 274 धावा अपुऱ्या आहेत, असं श्रीलंकेच्या खेळाडूंच्या देहबोलीवरून वाटत होतं आणि पाकिस्तानविरुद्ध आपण खेळताना 261 धावा पुरेशा आहेत, या भावनेनं खेळत होतो, हा मुख्य फरक दोन संघात होता. गंभीर आज फार सुंदर खेळला. त्याचा फक्त एक फटका क्षेत्ररक्षकाच्या जवळून गेला. एरवी त्याने अप्रतिम डाव खेळला. नंतर ढोणीने जरा वर खेळलं पाहिजे, असं मी जे म्हणत होतो, ते आज त्याने केलं. यासाठी याहून उत्तम दिवस त्याला मिळाला नसता. एवढय़ा धावसंख्येचा पाठलाग जर एकेरी आणि दुहेरी धावांनी केला तर एक-दोन षटकं 12-14 धावांची मिळतात आणि सगळं गणित बरोबर जुळून येतं. आज ढोणीने ते गणित बरोबर सोडवलं. 9 चेंडूत पहिली धाव आणि शेवटी 79 चेंडूत 91 धावा अशी त्याची खेळी आज भारताला कप जिंकून देऊन गेली. आपण सगळी स्पर्धा ढोणीच्या कुशल कप्तानी डावपेचांनी जिंकलो. ज्याला माणूस म्हणून भावना आहेत त्याला आजचा दिवस बरेच दिवस स्मरणात राहील. माझा आजचा शेवटचा लेख. ‘प्रहार’च्या परिवाराने मला त्यांच्यातला एक समजून लेखनाची संधी दिली आणि वाचकांनी माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या भावना वारंवार कळवल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार!जाता..जाता..
आज कपिलला त्याच्या यशोमहालात एक जोडीदार लाभला!ताजा..ताजा..
सचिन 2015 चा वर्ल्ड कप खेळणार! जय हिंद जय महाराष्ट्र!Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा