पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | गेस्ट पॅव्हेलियन | ...आणि मला इंदूरचं बालपण आठवलं!

...आणि मला इंदूरचं बालपण आठवलं!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

वर्ल्डकपच्या निमित्ताने इंदूरमधल्या गल्ली क्रिकेटच्या आठवणी जागवल्या आहेत, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी...

माझ्या लहानपणी क्रिकेटचं वातावरण खूप चांगलं होतं. गल्ली क्रिकेट तर सॉलिडच एंजॉय केलंय. इंदूरला आम्ही मुलं मिळून वाडय़ामागच्या मोकळय़ा जागेत हाफ पीच क्रिकेट खेळायचो. खूप छान भट्टी जमायची आम्हा मुलांची. खिडक्यांच्या, गाडय़ांच्या काचा फुटून आमचं क्रिकेट बंद होईल, या भीतीने अंडरआर्म क्रिकेटच खेळलं जायचं. समोरच्या गाडीच्या टायरला लागला तर चौकार, कुंपणातल्या आंब्याला बॉल लागला तर षटकार, एक टप्पा पडून कॅच पकडला तर आउट, कुंपणाला बॉल लागला तर आउट..असे विचित्र नियम असायचे. खेळताना ते कुणी मोडले आणि आऊट होऊनही बॅटिंग सोडायला तयार नाही झाला, तर गोंधळ घालून बॅटिंग सोडायला लावणं वगैरे खूप धमाल त्यावेळी केली. सुट्टीच्या दिवसांत आमच्या आवाजाने पूर्ण परिसर दणाणून जायचा.

 

शाळा-कॉलेजात असतानाही मी क्रिकेटचा शौक जोपासला. तुम्हाला वाटेल, सतत खेळून मी ग्रेट खेळाडू झालो असेन. पण तसं काहीच नाही. केवळ हौसेखातर खेळायचो. कधी कधी ऑफ स्पिन बोलिंग करायचो. त्यामुळे शाळा-कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये माझा सहभाग असायचा. बारावा खेळाडू म्हणून मित्रांना मदतही करायचो. टीममध्ये नसलो तरी चिअरअप करण्यासाठी मैदानात जायचो. आमच्या वेळी कपिल देव-सुनील गावस्करचा काळ होता. मुलांनाही त्यांची क्रेझ होती. पेपरमध्ये त्यांचे फोटो आले की, ते नीट कापून वहीत चिकटवण्याचा आम्हा मुलांचा त्यावेळचा अनोखा छंद असायचा. अभ्यास उरकला, पोटभर खेळून झालं की, उरलेल्या वेळात चिकटवह्या तयार करण्याचं काम आम्ही मन लावून करायचो. कोणा मित्राकडे एखाद्या पोझचे बरे फोटो असले की, त्याला चॉकलेट देऊन त्याच्याकडून मागून घ्यायचे, आपल्याकडचे त्याला द्यायचे, हेही उपद्व्याप मी केले आहेत. भारतीय संघाची मॅच असली की, रेडिओला कान लावून ऐकायचो. कारण त्यावेळी इंदूरमध्ये फारसा कुणाकडे टीव्ही नव्हता.

 

इंदूरमध्ये राहत असताना तिथे मोठय़ा मॅचेस कधी झाल्या नव्हत्या; पण प्रॅक्टीस मॅचेस, रणजी सामने, विल्स ट्रॉफी सामने व्हायचे आणि त्याचीही मजा लुटली आहे. आल्विन कालीचरणची वेस्ट इंडिजची टीम एकदा इंदूरला आली होती. त्या टीमला जवळून बघण्याचा योग आयताच चालून आला होता. त्या टीमला याचि देही याची डोळा बघून आम्हाला कोण आनंद झाला होता. आजही माझं क्रिकेटचं वेड कायम आहे. माझ्या गाडीत नेहमी बॅट आणि बॉल असतो. कुठेही शूटिंगला गेलो, वेळ असला की, सेटवरचे पाच-सहा जण एकत्र येऊन मनसोक्त क्रिकेट खेळतो. इंदूरमधल्या आमच्या अंडरआर्म क्रिकेटच्या नियमांनुसार..

 

क्रिकेटमधले बदल एक्सायटिंग वाटतात आणि ते मी खूप एन्जॉय करतो. म्हणजे आधी टेस्ट, नंतर वन डे आणि आता टी-20. जेव्हा वनडे क्रिकेट सुरू झालं तेव्हा टेस्ट क्रिकेटचं काय होणार, याची चिंता लागून राहिली होती; पण टेस्टना काहीच फरक पडला नाही. त्यामुळे टी-20 आल्यामुळे वन डेलाही फरक पडणार नाही. वन डेमध्ये साडेतीनशे धावा करणंही सहज शक्य झालं आहे आणि एवढय़ा धावांचा पाठलाग करून जिंकताही येतं. मला  टी-20चा फॉर्मही खूप आवडतो.

 

परवाचा मोहालीतला भारतविरुद्ध पाकिस्तान सामना मस्तच झाला. बोले तो झक्कास! हातातली कामं आधीच संपवून टीव्हीसमोर बसलो होतो. टॉस जिंकून आपण बॅटिंग घेतली, तेव्हा समाधान वाटलं. देवा, आपल्या टीमने साडेतीनशे धावा करू दे’, अशी मनोमन प्रार्थना करत मॅचचा आस्वाद लुटण्यासाठी बसलो खरा..पण पहिल्या टप्प्यात पदरात दारुण निराशा पडली. एक एक जण आउट होत गेला, तसा माझ्या पोटात खड्डा पडू लागला. रस्त्यावरचा शुकशुकाट वाढू लागला. कधी नव्हे ती संध्याकाळी सात वाजता मुंबई रात्री अकरा वाजताइतकी शांत वाटली; पण नंतर आपल्या बोलर्स आणि क्षेत्ररक्षकांनी अशी काही जादू केली, पूर्ण मुंबईचा नव्हे तर देशाचाच नूर पालटवला. क्रिकेटरसिकांनी जो काही गिल्ला केला तो विचारू नका. त्या जल्लोषाने मला इंदूरचं बालपण आठवलं.

 यंदाचा वर्ल्डकप भारताने जिंकावा, असं मला वाटतंय. आपल्या टीममध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपल्या टीममधल्या सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त मला युवराज सिंग आवडतो. गौतम गंभीरचीही बॅटिंग चांगली आहे. विराट कोहलीचा अ‍ॅटिटय़ूड आवडतो. श्रीलंकेतही चांगले खेळाडू आहेत. मलिंगाची बोलिंग चांगली आहे. आता बघू या फायनलसाठी आपली काय व्यूहरचना असेल.

     

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0