कांगारुंवरील विजय हा टर्निंग पॉइंट- लक्ष्मण
गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर भारताने उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय हा वर्ल्डकप स्पर्धेतील टर्निंग पॉइंट ठरला, असे मत भारताचा कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने रविवारी व्यक्त केले.
कोलकाता- गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर भारताने उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय हा वर्ल्डकप स्पर्धेतील टर्निंग पॉइंट ठरला, असे मत भारताचा कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने रविवारी व्यक्त केले. भारताने ऑस्ट्रेलियासारख्या संघावर अत्यंत सफाईदार विजय मिळवून वर्ल्डकप विजयाचा पाया रचला, असे लक्ष्मण म्हणाला. ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटमधील साम्राज्य संपवण्यात लक्ष्मणचा वाटा मोठा आहे. वर्ल्डकप उपांत्यपूर्व सामन्यातील विजयाने भारताने वनडे क्रिकेटमध्येही कांगारुंची सद्दी संपवली.
शैलीदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मणने टीम इंडियाची प्रशंसा तर केलीच, शिवाय या विजयाचे श्रेय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाही जाते, असे तो म्हणाला.
साखळी सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजीवर टीका होत होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले आणि पुढे पाकिस्तानविरुद्धही घोडदौड चालू ठेवली, असे लक्ष्मणने नमूद केले.
"1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकल्याने माझ्यासह, अनेक मुलांना क्रिकेट करिअर म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली होती. तीच किमया महेंद्रसिंग ढोणीच्या संघानेही 2011 मध्ये साधली आहे," असे लक्ष्मण म्हणाला.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा