महासंग्रामाची रणांगणे
यंदाचा वर्ल्डकप कोण जिंकणार याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका ऑस्ट्रेलिया की आणखी कोण? यावरून मोठमोठय़ा पैजा लावल्या जात आहेत. पण नव्या विश्वविजेत्याचे भवितव्य ठरवण्यासाठी स्टेडियम्सची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. खेळपट्टी कोणाला अनुकूल ठरणार, होम ग्राउंडचा फायदा यजमान संघाला कितपत होणार, कोणत्या मैदानावर प्रेक्षकांचा दबाव जाणवण्याऐवजी खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक वाढेल, याचा धावता अंदाज घेणारा हा वर्ल्डकप स्टेडियम्सचा आढावा.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
स्थापना- 1974
प्रेक्षक क्षमता- 45,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी- न्यूझीलंड वि. कॅनडा (13 मार्च), न्यूझीलंड वि. श्रीलंका (18 मार्च), अंतिम सामना (2 एप्रिल)
क्रिकेटची प्रतिपंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमने खास वर्ल्डकपसाठी कात टाकली आहे. अद्ययावत सुविधा, सुटसुटीत आसनव्यवस्था करण्यात आलेल्या या स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, हे सांगणे सध्या कठीण आहे. पण समुद्रकिना-यालगत असल्याने तेथून वाहणा-या वा-यांमुळे याठिकाणी स्विंग गोलंदाजांना चांगला फायदा मिळू शकतो.
फॅक्टफाइल
वानखेडेवर1987 पासून 15 वनडे सामने खेळवण्यात आले. त्यापैकी नऊ सामने प्रथम फलंदाजी करणा-या संघाने जिंकले. भारताने येथे खेळलेल्या 14 सामन्यांपैकी आठ सामन्यांत विजय मिळवला आहे.
फिरोजशा कोटला स्टेडियम, दिल्ली
स्थापना- 1883
प्रेक्षक क्षमता- 48,000
वर्ल्डकपचे सामने- गट फेरी- दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज (24 फेब्रुवारी), वेस्ट इंडिज वि. हॉलंड (28 फेब्रुवारी), कॅनडा वि. केनिया (7 मार्च), भारत वि. हॉलंड (9 मार्च)
सुमारे साडेसहाशे वर्षे जुन्या किल्ल्याच्या आवारातील मैदानातून क्रिकेट स्टेडियममध्ये रूपांतरित करण्यात आलेले फिरोजशाह कोटला स्टेडियम भारतातील दुस-या क्रमांकाचे सर्वात जुने मैदान आहे. फिरकीला अनुकूल असलेल्या याच खेळपट्टीवर भारताच्या अनिल कुंबळेने कसोटीत एका डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. मात्र 2009 मध्ये या खेळपट्टीचे स्वरूप इतके बदलले की चेंडू भयंकर उसळी घेत असल्याचे पाहून भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा एक वनडे सामनाच रद्द करावा लागला. त्यानंतर घालण्यात आलेल्या १२ महिन्यांच्या बंदीनंतर हे स्टेडियम वर्ल्डकपसाठी सज्ज झाले आहे.
फॅक्टफाइल
भारतीय संघासाठी सर्वात लकी (10 विजय) ठरलेले हे मैदान सुनील गावस्करच्या 29 शतकांच्या विक्रमापासून सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमी 35व्या कसोटी शतकाचे साक्षीदार बनले आहे. या मैदानावर झालेल्या 17 वनडे सामन्यांपैकी दोन सामने रद्द करण्यात आले, तर उरलेल्या 15 पैकी 7 सामने प्रथम फलंदाजी करणा-या व 8 सामने धावांचा पाठलाग करणा-या संघाने जिंकले आहेत.
ईडन गार्डन्स, कोलकातास्थापना- 1864
प्रेक्षक क्षमता- 67 ते 90 हजार
वर्ल्डकपचे सामने- गट फेरी - आयर्लंड वि. दक्षिण आफ्रिका (15 मार्च), आर्यलड वि. हॉलंड (18 मार्च), केनिया वि. झिम्बाब्वे (20 मार्च)
भारताचे लॉर्ड्स अशी ओळख असलेल्या कोलकाताच्या ईडन गार्डन्सची पत गेल्या काही वर्षापासून पूर्णपणे घसरली आहे. 1996चा उपांत्य सामना भरवणा-या या मैदानाच्या वाटय़ाला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केवळ चार गटफेरीतील सामने आले होते. मात्र स्टेडियम पूर्णपणे बांधून तयार नसल्याने याठिकाणी होणारा इंग्लंड वि. भारत हा महत्त्वपूर्ण सामना बंगळूरुला हलवावा लागला.
फॅक्टफाइल
1996च्या उपांत्य सामन्यात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे श्रीलंकेविरुद्ध भारताला पराभव पाहावा लागला. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीमधील व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 281 धावांच्या मॅचविनिंग खेळीचा साक्षीदारही हेच मैदान आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 22 वनडे सामन्यांतील 11 सामने (श्रीलंकेच्या उपांत्य सामन्यातील विजयासह) प्रथम फलंदाजी करणा-या संघाने जिंकले आहेत.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु
स्थापना-1969
प्रेक्षक क्षमता- 40,000
वर्ल्डकपचे सामने- गट फेरी - भारत वि. इंग्लंड (27 फेब्रुवारी), इंग्लंड वि. आयर्लंड (दोन मार्च), भारत वि. आयर्लंड (सहा मार्च), ऑस्ट्रेलिया वि. केनिया (13 मार्च), ऑस्ट्रेलिया वि. कॅनडा (16 मार्च)
भारताची ‘टेकसिटी’ म्हणून ओळखल्या जाणा-या बंगळूरुत वसलेले हे स्टेडियम दक्षिणेतील क्रिकेटरसिकांची जान आहे. भारत आणि पाकिस्तानमधील 1996 वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्यांदा याठिकाणी प्रकाशझोत यंत्रणेचा वापर करण्यात आला. हा ऐतिहासिक सामना भारताने जिंकला. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देणारी ही खेळपट्टी फिरकीलाही अनुकूल मानली जाते.
फॅक्टफाइल
या मैदानावर खेळवण्यात आलेल्या 18 वनडेपैकी दोन सामने रद्द झाले, तर 11 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. या मैदानात प्रथम आणि दुस-यांदा फलंदाजी करणा-या संघांनी समान 8-8 सामने जिंकले आहेत.
पंजाब क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, मोहाली
स्थापना- 1993
प्रेक्षक क्षमता- 30-35 हजार
वर्ल्डकपचे सामने- गट फेरी - दक्षिण आफ्रिका वि. हॉलंड (तीन मार्च), आर्यलड वि. वेस्ट इंडिज (11 मार्च), उपांत्य सामना (30 मार्च)
भारतातील सर्वात चांगले आणि जागतिक दर्जाचे स्टेडियम म्हणून पीसीए, मोहाली स्टेडियमचे नाव घेतले जाते. चंडीगड शहराच्या बाहेर शिवालिक टेकडय़ांच्या परिसरात वसवण्यात आलेले हे स्टेडियम अनेक परदेशी संघांचे फेवरिट मैदान आहे. काही वर्षापूर्वी येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशी होती पण कालांतराने त्यात बदल झाला असून आजघडीला ती फलंदाजांसाठी पोषक मानली जाते.
फॅक्टफाइल
1996च्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिजदरम्यानच्या रोमांचक उपांत्य सामन्याची साक्ष असलेल्या या मैदानात आजवर 16 सामने झाले, त्यापैकी तब्बल 11 सामने पहिल्यांदा फलंदाजी करणा-या संघाने जिंकले. भारतासाठी हे मैदान फारसे लकी नाही. याठिकाणी खेळलेल्या नऊ पैकी पाच सामने भारताने गमावले आहे, याउलट ऑस्ट्रेलियाने येथे पाच पैकी चार सामने जिंकले आहेत.
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
स्थापना- 1916
प्रेक्षक क्षमता- 50,000
वर्ल्डकपचे सामने गट फेरी- न्यूझीलंड वि. केनिया (20 फेब्रुवारी), इंग्लंड वि. द. आफ्रिका (सहा मार्च), इंग्लंड वि. वेस्ट इंडिज (17 मार्च), भारत वि. वेस्ट इंडिज (20 मार्च)
गेल्या पाऊणशे वर्षापासून क्रिकेट सामन्यांचे नियमित मैदान असलेल्या या मैदानात होणारे सर्वच सामने अटीतटीचे होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीचीही प्रशंसा करणारी प्रेक्षकांची खिलाडूवृत्ती हे या स्टेडियमचे एक वैशिष्टय़च म्हणावे लागेल. फिरकीला अनुकूल अशी येथील खेळपट्टीची ओळख असलेल्या येथील खेळपट्टीला ‘स्पोर्टिग’ बनवण्यात आल्याचा क्युरेटरचा दावा आहे.
फॅक्टफाइल
सईद अन्वरची भारताविरुद्धची 194 धावांची खेळी याच मैदानातील. या मैदानात झालेल्या 14 सामन्यांतील सात सामने प्रथम फलंदाजी करणा-या संघाने जिंकले, तर पाच सामने धावांचा पाठलाग करणा-या संघाने जिंकले. भारताने येथे खेळलेल्या आठ सामन्यांपैकी दोन अनिर्णित राहिले, तर तीन भारताने जिंकले आहेत.
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद
स्थापना- 1982
प्रेक्षक क्षमता- 54,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी- ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे (21 फेब्रुवारी), न्यूझीलंड वि. झिम्बाब्वे (चार मार्च), उपांत्यपूर्व सामना (24 मार्च)
कपिलदेवचा 432 बळींचा विश्वविक्रम आणि सुनील गावसकरने ओलांडलेल्या 10,000 धावांच्या टप्प्याचा साक्षीदार असलेले हे स्टेडियम कसोटी सामन्यांसाठी अधिक वापरण्यात आले. येथील खेळपट्टीही सुरुवातीला गोलंदाजांसाठी अनुकूल होती. मात्र हळूहळू तिचा दर्जा खालावल्याने आता ती फलंदाजांचे आणि मोठमोठय़ा धावसंख्येचे नंदनवन ठरली आहे.
फॅक्टफाइल
2006मधील चँपियन्स ट्रॉफीपूर्वी अद्ययावत करण्यात आलेल्या या मैदानात चँपियन्स ट्रॉफीतील 15 पैकी पाच सामने खेळवण्यात आले होते. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 19 सामन्यांपैकी 10 सामने प्रथम फलंदाजी करणा-या संघांनी जिंकले आहेत. भारताने या मैदानात 13 सामने खेळले, मात्र अवघ्या पाच सामन्यांत विजय मिळू शकला.
शेर ए बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका, बांगलादेश
स्थापना- 2006
प्रेक्षक क्षमता- 25,000
वर्ल्डकप सामने- भारत वि. बांगलादेश (19 फेब्रुवारी), बांगलादेश वि. आर्यलड (25 फेब्रुवारी), बांगलादेश वि. वेस्ट इंडिज (चार मार्च), बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका (19 मार्च), उपांत्यपूर्व सामने (23 मार्च आणि 25 मार्च)
ढाका शहरापासून 10 किमी अंतरावर वसलेल्या या स्टेडियमची गणना जगातील सर्वात चांगल्या सुविधा असलेल्या क्रिकेट स्टेडियम्समध्ये होते. या मैदानातील पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणाही उत्तम आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतरही मैदान फारकाळ ओले राहत नाही. येथील खेळपट्टी सपाट आणि धीमी असल्याने फलंदाजांसाठी ती फायद्याची ठरते. या मैदानातच वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना भारत वि. बांगलादेश असा होणार आहे.
फॅक्टफाइल
या मैदानात खेळवण्यात आलेल्या 42 सामन्यांपैकी 27 सामने धावांचा पाठलाग करणा-या संघाने जिंकले आहेत.
पल्लकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडी, श्रीलंका
स्थापना- 2009
प्रेक्षक क्षमता- 35,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी -पाकिस्तान वि. न्यूझीलंड (आठ मार्च), श्रीलंका वि. झिम्बाब्वे (10 मार्च), पाकिस्तान वि. झिम्बाब्वे (14 मार्च)
कँडीतील असगरिया स्टेडियमला पर्याय म्हणून या स्टेडियमची दोन वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली. असगरिया स्टेडियम हे एका शाळेचे मैदान असल्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दृष्टीने याठिकाणी नवीन स्टेडियमची स्थापना करणे श्रीलंकन क्रिकेट मंडळाला भाग पडले. जगविख्यात फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने या स्टेडियमच्या उभारणीकरीता विशेष प्रयत्न केले असून या स्टेडियमला त्याचेच नाव देण्याची श्रीलंकन जनतेची मागणी आहे.
फॅक्टफाइल
या मैदानात आजवर केवळ एक कसोटी सामना झाला. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यानचा हा सामनाही अनिर्णितच राहिलेला आहे.
झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव, बांगलादेश
स्थापना-2004
प्रेक्षक क्षमता- 20,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी - बांगलादेश वि. इंग्लंड (11 मार्च), बांगलादेश वि. हॉलंड (14 मार्च)
2004मध्ये खेळवण्यात आलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेसाठी हे स्टेडियम उभारण्यात आले होते. जानेवारी 2006 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.
फॅक्टफाइल
या स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या 11 सामन्यांपैकी दोन सामने रद्द करण्यात आले, तर चार सामने बांगलादेशने जिंकले. या ठिकाणीही धावांचा पाठलाग करणा-या संघाने सहा सामन्यांत विजय मिळवला आहे.
महिंदा राजपक्षे इंटरनॅशनल स्टेडियम, हंबानटोटा, श्रीलंका
स्थापना- 2009
प्रेक्षक क्षमता- 35,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी - श्रीलंका वि. कॅनडा (20 फेब्रुवारी), पाकिस्तान वि. केनिया (23 फेब्रुवारी)
वर्ल्डकपसाठी बनवण्यात आलेले हे स्टेडियम श्रीलंकेच्या दक्षिण टोकाकडील शहर हंबानटोटा जिल्ह्यात वसवण्यात आले आहे. या मैदानात आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आलेला नाही. मात्र येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असण्याची शक्यता आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
स्थापना-2008
प्रेक्षक क्षमता- 45,000
वर्ल्डकप सामने- इंग्लंड वि. हॉलंड (22 फेब्रुवारी), ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड (25 फेब्रुवारी), कॅनडा वि. झिम्बाब्वे (28 फेब्रुवारी), भारत वि. दक्षिण आफ्रिका (12 मार्च)
यापूर्वी नागपूर शहरात असलेले स्टेडियम हलवून शहराबाहेर उभारण्यात आलेले व्हीसीएचे स्टेडियम अद्ययावत सोयी आणि हिरव्यागार मैदानासाठी प्रसिद्ध आहे.
फॅक्टफाइल
या मैदानात आजवर दोनच वनडे सामने झाले त्यापैकी एका सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 99 धावांनी पराभूत केले, तर दुस-या सामन्यात श्रीलंकेने भारतावर तीन विकेट्सनी विजय मिळवला.
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका
स्थापना- 1986
प्रेक्षक क्षमता- 35,000
वर्ल्डकप सामने- गट फेरी - श्रीलंका वि. पाकिस्तान (26 फेब्रुवारी), श्रीलंका वि. केनिया (एक मार्च), पाकिस्तान वि. कॅनडा (तीन मार्च), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका (पाच मार्च), ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान (19 मार्च), उपांत्यपूर्व सामना (26मार्च), उपांत्य सामना (29 मार्च)
पूर्वी खेत्तरामा स्टेडियम या नावाने ओळखल्या जाणा-या या स्टेडियमचे 1994मध्ये श्रीलंकेचे माजी अध्यक्ष आर. प्रेमदासा यांच्या नावाने नामकरण करण्यात आले. श्रीलंकेत आलेल्या त्सुनामीत स्टेडियमची नासधूस झाली होती. वर्ल्डकपसाठी या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले.
फॅक्टफाइल
या स्टेडियमवर आतापर्यंत 94 सामने खेळवण्यात आले, त्यापैकी सहा सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. श्रीलंकेने याठिकाणी खेळलेल्या 78 सामन्यांपैकी 48 सामने जिंकले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणा-या संघांसाठी हे मैदान भलतेच फलदायी ठरले आहे. अशा संघांनी याठिकाणी 55 सामने जिंकले आहेत.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा